Wednesday, January 3, 2018

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची दोन्ही चित्रे अस्सलबरहुकुम आहेत.
18 वर्षे झाली आम्ही सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात तेव्हा खंत वाटते.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा काचेच्या भल्यामोठ्या अस्सल कृष्णधवल निगेटिव्हवरील ग्रुपफोटो जुना आणि अस्पष्ट झालेला असल्याने आमच्या समितीतर्फे त्यावरून जसेच्या तसे रंगित तैलचित्र तयार करून घ्यायचे ठरवले.
चित्रकारांबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यांनीही जीव ओतून सुरेख तैलचित्र [ हुबेहुब कृष्णधवल निगेटिव्हनुसार ] तयार केले.
3 जानेवारीला नायगावच्या [ सावित्रीबाईंचे माहेर ] जयंती कार्यक्रमात ते प्रकाशित करायचे ठरवले. नानाविध अडचणींमधून वाट काढावी लागली. त्यावेळच्या एका उपसचिवाने खूप खोडे घातले. त्यासाठी त्याने कागदोपत्री चक्क लबाड्याही केल्या. मुख्यसचिव अरूण बोंगिरवारही आपल्या प्रशासनाच्या चुकीच्या बाजूनेच उभे राहिले.
खुप झटापट झाली. बड्यांशी झुंजावे लागले.
तीनच दिवस शिल्लक असताना योग्य तो निर्णय झाला. त्यातले दोन दिवस शासकीय मुद्रणालयाला सुट्टी होती.
मात्र संचालक मित्रांनी अपार मेहनत केली आणि तिसर्‍या दिवशी अस्सल तैलचित्र प्रकाशित झाले.
त्या आधी सावित्रीबाईंची दोन काल्पनिक चित्रे प्रसिद्ध झाली होती. एकामागे सदभावना होती तर एकामागे पत्नीप्रेम!
एकाने सावित्रीबाईंचे चरित्र लिहून त्यावर पहिले चित्र छापले.
एकदा एका कार्यक्रमाला त्यांच्या गावात गेलो असताना त्यांनी दुसर्‍या दिवशी घरी चहाला बोलावले.
चहा पोहे द्यायला त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी त्यांना प्रथमच भेटत होतो.
तरिही त्यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचा भास होत राहिला. तो ओळखीचा वाटत राहिला.
घरी आल्यावर हे पुस्तक परत पाहिले आणि सगळा उलगडा झाला!
दुसरे तैलचित्र बनवणारे चित्रकार माझ्या ओळखीचे होते, पण त्यांनी एखाद्या सरदारपत्नीचे काढावे असे "वजनदार तैलचित्र" रंगवलेले होते.
18 वर्षे झाली आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात तेव्हा खंत वाटते.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
माझं असे मत आहे की संशोधनाची कोणतीही शिस्त न पाळता, केवळ आंधळी भक्ती आणि जातीप्रेम यातून त्या विद्वानांकडून ही चूक झाली असणार.
......................
निळ्या साडीतले तरूण सावित्रीबाईंचे तैलचित्र अधिकृत आहे. ते मुळच्या अस्सल कृष्णधवल छायाचित्रावरून काढलेले आहे.
ते विलास चोरमले, अभिनव चित्रकला महाविद्यालय, पुणे, यांनी काढलेले आहे.
लाल काठाच्या साडीतले तैलचित्र हे त्यावरूनच परंतु वयस्कर सावित्रीबाईंचे तैलचित्र आहे.
ते सुधीर काटकर, जे.जे. मुंबई, यांनी काढलेले आहे.
ते पुण्यात फुलेवाड्यात व नायगावला सावित्रीबाई फुले स्मारकात लावलेले आहे.
-प्रा.हरी नरके- Hari Narke

No comments:

Post a Comment