कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवलेले गुणी फ्रेंच दिग्दर्शक टोनी गॅटलीफ हे सर्वोत्तम संगितमय चित्रपटांसाठी विख्यात आहेत. त्यांचा प्रसन्न शैलीतला, दर्जेदार गितांची बहार उडवून देणारा ताजा आणि धमाल चित्रपट आहे "जॅम."
जॅम ही एक हसरी ग्रीक युवती आहे. तिला देखणा गळा लाभलेला आहे. तिची आई उत्तम गायिका होती. ही मुलगी जिथे जाते तिथे आनंद निर्माण करते. सतत हसतखेळत जगणार्या या तरूणीवर एक कामगिरी सोपवली जाते. इस्तंबूलला जाऊन जहाजाचा एक तुटलेला पार्ट तिला नव्यानं बनवून आणायचा असतो.
प्रवासात तिला अॅव्हरिल ही 19 वर्षीय उदास, दु:खी, अडचणीत सापडलेली मुलगी भेटते. ती निर्वासीत आहे. फ्रान्सवरून आलीय. तिच्याकडे पैसे नसतात आणि तुर्कस्थानात तिच्या ओळखीचेही कोणी नसते, जॅम तिला सोबत घेते. दोघींची सहजच मैत्री जमते.
दोघींचा हा प्रवास म्हणजे अडचणी, संकंटं, धावपळ आणि केवळ धमाल.
जॅमनं अनेक कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी वेळोवेळी केलेला संगिताचा वापर, तिचा हजरजबाबीपणा, तिच्या नकला, नृत्य, गमतीजमती हा अखंड सुखाचा वर्षाव असतो. मानवी जीवनप्रवासाचं अफलातून प्रतिक म्हणजे हा बहारदार चित्रपट.
लोकसंगितावर आधारलेली यातली सुमधूर गाणी ही भारतीयांसाठी मेजवानीच होय.
जॅमची भुमिका करताना अभिनेत्री डेफनी पटाकिया हिनं अभिनयगुणांची जी उंची गाठलीय ती थक्क करणारी आहे.
या भुमिकेला अनंत शेड्स आहेत. त्यातल्या प्रत्येकात ती समरसून काम करते.
चार्ली चॅप्लीनच्या तोडीची आजच्या काळातली ही मुलगी आहे. तिला उज्ज्वल भवितव्य आहे.
ती बंडखोर आहे आणि प्रसंगी शत्रूशी दोन हात करणारीही.
तिच्यावर सोपवलेली कामगिरी ती फत्ते करते का?
तिच्या मैत्रिणीचं रहस्य काय असतं?
जॅमच्या हुकुमशाहीवृत्तीच्या आजोबांनी जॅमच्या आईला गायला बंदी घातलेली असते. ती आजोबांचा सूड कसा घेते?
पिफमध्ये मी पाहिलेला सर्वाधिक प्रसन्न चित्रपट जॅम.
अनेक महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजतोय. पिफमध्येही हा पुरस्कारांमध्ये बाजी मारेल अशी आशा होती.
तिच्याबरोबर गप्पा मारणं हा मस्त अनुभव होता. मुलगी खूपच टॅलेंटेड आहे. खुप पुढे जाईल.
निर्मितीमुल्ये अर्थातच एकदम भारी.
आयुष्य कसं जगावं याचा वस्तूपाठ देणारा हा भारीच सिनेमा आहे. संधी मिळाली तर पाह्यल्याशिवाय राहू नका.
"जॅम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स, Djam, Directed by Tony Gatlif, France, 2017. 97 Minutes.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment