Monday, February 27, 2012

अभिजात मराठी

अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. संपन ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभवांची धर्मभाषाही आहे. मराठीतील साहित्यसंपदा अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. मराठ्यांनी भारतभर राज्य केले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठी सत्तेची पताका फडकत होती. ही भाषा बोलणारे लोक देशभर आहेत. त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे.
...........

मराठीत दरवर्षी सुमारे दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल वीस ते पंचवीस कोटी रुपयांपर्यंत असून, पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे दोनशे कोटींपर्यंत असावी, असा एका पाहणीचा निष्कर्ष आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

अशा अभिजात मराठी भाषेला केंद्र सरकारने 'अभिजात' भाषेचा दर्जा मात्र दिलेला नाही. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या चार भाषांना तो मिळालेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधी केंद्र सरकारचे चार निकष आहेत. १) भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी. २) ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे. ३) भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी. ४)भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपांहून भिन्न असले, तरी चालेल; पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे. हे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते. प्राचीन महाराष्ट्री भाषा- अपभ्रंश भाषा- मराठी असा मराठीचा प्रवास आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू यांसारखे श्रेष्ठ ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती त्याच्याआधी किमान हजार-बाराशे वर्षे समृद्ध भाषा होती.

मराठी भाषेचा जन्म नेमका केव्हा झाला याबाबत कृ. पां. कुलकर्णी यांनी 'मराठी भाषा उद्गम आणि विकास' या १९३३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात म्हटले आहे, 'सर्व प्राकृत भाषा, अपभ्रंश आणि संस्कृत या भाषांनी आपापल्या परीने मराठीस जन्माला आणण्यास हातभार लावलेला दिसतो. निरनिराळ्या प्राकृतभाषा बोलणारे निरनिराळे समाज निरनिराळ्या काळी वरून आर्यावर्तातून अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात उतरले आणि तेथे स्थायिक झाले. त्यांच्या संमिश्र बोलण्यानेच मराठी भाषा बनली. महाराष्ट्र देश ज्याप्रमाणे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, अश्मक, कुंतल, विदर्भ, कोकण इत्यादी लहान लहान देशविदेशांचा मिळून बनला आणि महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली, त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या विशेषत: माहाराष्ट्री व अपभ्रंश ह्यांच्या मिश्रणाने बनली. महाराष्ट्र देश, मराठा समाज आणि मराठी भाषा ह्यांची घटना वर दिल्याप्रमाणे ख्रिस्तोत्तर ६००-७००च्या सुमारास झाली.

इसवीसनपूर्व ६०० पासून प्राकृत भाषांचा काळ सुरू होतो. तो इस ७००पर्यंत टिकतो. भगवान बुद्ध, महावीर, अशोक यांच्यावेळी प्राकृतांची भरभराट होती बृहत्कथा (इसपू १००) ह्याच काळात लिहिली गेली. वररूचीचा 'प्राकृतप्रकाश' हा व्याकरणग्रंथ याच काळातील होय. अश्वघोषाने आपली नाटके याच काळात लिहिली. या काळानंतर पुढे दोनतीनशे वर्षे प्राकृत भाषा वापरात होत्या, हे नाटकांत वापरलेल्या प्राकृतांवरून सिद्ध होते. इ.स. ४०० ते ७०० या काळात महाराष्ट्री अपभ्रंश प्रचलित होती. 'श्री चावुण्डराये करवियले, गंगराजे सुत्ताले करवियेले' हा श्रवणबेळगोळ येथील इ. स. ९८३चा शिलालेख हा मराठीच्या अस्तित्वाचा एक हजार वर्षे जुना पुरावा होय. 'एपिग्राफिआ इंडिका' व 'इंडियन अॅक्टिवेरी' या नियतकालिकांच्या निरनिराळ्या अंकांत जे ताम्रपट आणि शिलालेख प्रसिद्ध झाले आहेत, त्यात मराठी शब्द वापरलेले दिसतात. हे शब्द इ. स. ६८०पासून प्रचलित असल्याचे स्पष्ट होते.

उद्योतनसुरीने इ. स. ७७८मध्ये 'कुवलयमाला' हा ग्रंथ लिहिला. त्यात 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आहे. या ग्रंथात पुढील वर्णन मिळते. 'दढमडह सामसंगे सहिरे अहिमाण कलहसीले य। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।' (बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मराठ्यांस त्याने पाहिले.)

मराठीच्या वयाबाबत (१) डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरलिखित 'प्राचीन महाराष्ट्राचे २ खंड', (२) 'हाल सातवाहनाची गाथा सप्तशती' - संपा. स. आ. जोगळेकर (३) गुणाढ्याचे 'बृहत्कथा' (४) राजारामशास्त्री भागवत यांचे 'मराठ्यासंबंधी चार उद्गार' आदी ग्रंथ महत्त्वाचे पुरावे देणारे आहेत. गुणाढ्याच्या बृहत्कथेवरून सोमदेवाने 'कथा सरित्सागर' हा महाग्रंथ निर्माण केला. डॉ. केतकर म्हणतात, 'पैशाचीतील मुख्य विश्रुत ग्रंथ म्हटला म्हणजे बृहत्कथा होय. तो करू युद्धोत्तर इतिहासाचा संरक्षक आणि त्याबरोबर इतिहास विपर्यासाचा संरक्षक आहे. बृहत्कथेत प्रतिष्ठानकथा व दक्षिणापथकथा, कुंडिनपूर कथा येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासास त्या संग्रहाचा उपयोग करणे प्राप्त झाले. वररुचीची महाराष्ट्री बुद्धपूर्व आहे आणि वररुचीचे व्याकरण पाली किंवा अर्धमागधी या भाषांच्या उदयापूवीर्चे आहे, असे आमचे मत आहे. त्या काळात महाराष्ट्री भाषा प्रगल्भ झाली होती आणि प्राकृत भाषांत तीच प्रमुख होती, हे स्पष्ट आहे. ते पुढे म्हणतात, 'महाराष्ट्री भाषा वररुचीच्या काळी होती आणि ती संवर्धित झाली होती. महाराष्ट्राची स्वतंत्र भाषा अगोदर दोनतीनशे वर्षे तरी विकसित होत असली पाहिजे, म्हणजे ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या पूवीर्च, म्हणजे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकात महाराष्ट्राचा आद्यविकासाचा काल जातो. या भाषेच्या नावास कारण झालेले जे महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण जे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकात झाले असावे, असे दिसते. अश्मक राजा कुरु युद्धात पडला आणि कुरु युद्धापासून अश्मकांचे सातत्य आहे, तर महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण आणि अश्मक राजाचे सातत्य याची संगती लावण्याचा प्रयत्न अवश्य होतो. अश्मक राज्य सुरू होण्यापूवीर्च महारांच्या देशात रठ्ठांचा प्रसार होऊन महाराष्ट्र बनले असावे आणि त्यांच्या संयुक्त जनतेत अश्मक राजकुल उत्पन्न झाले असावे, असाच इतिहास असावा असे दिसते.' (पृ. १३)

महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणजे हालांची सप्तशती होय. राजारामशास्त्री भागवत म्हणतात, 'बावीसशे वर्षांचा 'मरहठ्ठ' किंवा 'महाराष्ट्र' शब्द आहे असे म्हणण्यास हरकत नाही. संस्कृतात नाटके ज्यावेळी होऊ लागली, त्यावेळी कुलीन व वरिष्ठ जातीच्या बायकांची भाषा 'शौरसेनी' होती. या 'शौरसेनी' भाषेची एक प्रकृती जशी संस्कृत तशीच दुसरी प्रकृती माहाराष्ट्री उर्फ अतिप्राचीन मऱ्हाठी, असे कात्यायन म्हणतो. तर मग सर्व बालभाषांचे मूळ प्राचीन मराठी असा सिद्धांत केल्यास काहीच प्रत्यवाय नाही.' मूळचा शब्द पाहू गेले असता 'पाअड' होय. 'पाअड' शब्दाच्या जवळजवळ संस्कृतात 'प्रकट' हा शब्द येतो. 'पाअड' भाषा='प्रकट' भाषा. म्हणजे अर्थात सर्व लोकांचा व्यवहार व दळणवळण जीत चालते ती. पाअड भाषा पडली वाहत्या पाण्याप्रमाणे. ते सर्वांचे जीवन तेव्हा सर्वांचाच संबंध तिच्याबरोबर. सहजच तीस 'पाअड' म्हणजे सर्वांस समजण्यासारखी असे अन्वर्थक नाव मिळाले. काही काळाने संस्कृत या शब्दाबरोबर मेळ दिसावा म्हणून 'पाअड' शब्दाचे प्रकट रूप न करता 'प्राकृत' असे रूपांतर केलेले दिसते. त्यामुळे प्राकृत हा शब्द संस्कृतात दररोज पाहण्यात येणारे, अर्थात 'क्षुल्लक' या अर्थाचा वाचक झाला. 'शिक्षा' म्हणून वेदाचे एक अंग आहे. त्यात 'प्राकृते संस्कृते चापि' (प्राकृत भाषेत व संस्कृत भाषेत) असा लेख आला आहे. त्यापक्षी प्राचीन काळीही 'प्राकृत' ही स्वतंत्र भाषा समजण्याचा संप्रदाय पुष्कळ दिवसांपासून होता, हे उघड होय. तेव्हा माहाराष्ट्री, सौरसेनी, मागधी व पैशाची या सर्व जितक्या पाअड भाषा होत्या, तितक्या प्राकृत झाल्या व या प्राकृत भाषांचे 'प्राकृतप्रकाश' नावाचे सूत्रमय व्याकरण कात्यायनाने पहिल्यांदा लिहिले. वर लिहिलेल्या पाचही भाषा या पाअड भाषा. इतकेच, की सर्वांत प्राचीन व सर्वांची प्रकृती माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मऱ्हाठी. महाराष्ट्रीपासून निघाली शौरसेनी. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हणजे प्राचीन मऱ्हाठी भाषा.

हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलीत असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राज्यांच्या दरबाराचे चित्र नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहायला मिळते. लिलावती ही अद्भूतरम्य कथा हाल राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नाहणाऱ्या, अंगाला हळद फासणाऱ्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला 'मरहठ्ठ देसी भाषा' असे नाव देतो.

दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे.


महाराष्ट्री भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.