Sunday, March 1, 2015

जगणे समृद्ध करणारे एका नाटकवाल्याचे प्रयोग


हे एका नाटकवाल्याचे प्रयोग.
नाटकाचे प्रयोग आणि जगण्याचे प्रयोग.
समाजाच्या आणि नाटकाच्या गाभ्यापर्यंत जाण्याचे प्रयोग.
नाटकाइतकाच जिवंत आणि रसरशीत अनुभव.प्रतिभावंत दिग्दर्शक श्री.अतुल पेठे यांच्या पुस्तकाचे २४ तासांपुर्वी प्रकाशन झाले. दिग्गज अभिनेते नसिरूद्दीन शहा, किशोर कदम, सदानंद मोरे आणि मकरंद साठे यांच्या उपस्थितीत काल खचाखच भरलेल्या एस.एम.जोशी सभागृहात हा सोहळा झाला. रंगभुमी, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक चळवळी या क्षेत्रातील डा.श्रीराम लागू, अजित दळवी, राजीव शारंगपाणी आणि कितीतरी मान्यवर कार्यक्रमाला श्रोते म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चळवळीतले प्रकाशक, मनोविकासचे अरविंद पाटकर यांनी इतके प्रभावी आणि मन:पुर्वक केले की पुढचा सगळा कार्यक्रम एखाद्या मैफिलीसारखा रंगत गेला. चारही वक्त्यांनी नव्या परिमाणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. स्वत: उत्सवमुर्ती पेठे यांनी यानिमित्ताने अनेकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुत्रसंवादक  संध्या टाकसाळे यांनी कार्यक्रम आणि वक्ते यांच्याविषयी जो साधाच परंतु गोळीबंद गोफ विणला तो अतिशय हृदयस्पर्शी होता. हा कार्यक्रम अविस्मरणीय होता. अद्भुत होता. तो एक विलक्षण रंगलेला प्रयोगच होता.

२१६ पृष्ठांचे हे सोलवटून काढणार्‍या अनुभवांचे जगणे समृद्ध करणारे पुस्तक एका बैठकीत वाचून काढले.खरे तर एकदा हातात धरल्यावर ते खाली ठेवताच येत नाही.

पुस्तक गुणवत्तेने अतिशय दर्जेदार आहे आणि त्याची निर्मितीमुल्येही देखणी आहेत.
कालच्या दिवसात पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली.

अतुल पेठे हे मिशनरी झिल असलेले रंगधर्मी आहेत. त्यांच्या आजवरच्या अद्भुत प्रवासाचा त्यांनी चित्रशैलीत रेखाटलेला हा आलेख वाचकावर गारूड करून जातो. पेठे नावाच्या या ध्येयवादाचा { पेठे स्कूलचा } जो लेखाजोखा त्यांनी या पुस्तकात मांडलाय, ते सत्याचे प्रयोग मेंदूला झिनझिण्या आणतात. काळजाला आरपार भिडतात.

त्यातला आतला आवाज, सच्चेपणा आणि संयतपणा यांनी हे पुस्तक श्रेष्ठ दर्ज्याचे झालेले आहे.
पुस्तकाची रचना सहा भागात करण्यात आलेली आहे.१.प्रयोगविचार, २.प्रयोग अनुभुती, ३.प्रयोगाचे अर्थशास्त्र, ४.चौकटीबाहेरचे प्रयोग, ५.तीन प्र-योगी, आणि ६.आरोग्य आणि अंधश्रद्धा विषयक प्रयोग हे सगळेच विभाग विलक्षण वाचनीय आहेत.

चेस, क्षितिज, शीतयुद्ध सदानंद, मामका: पाण्डवाश्चैव,वेटींग फो‘र गोदो,ऎसपैस सोयीने बैस,ठोंब्या, प्रेमाची गोष्ट,सुर्य पाहिलेला माणूस,उजळल्या दिशा, आनंद ओवरी,चौक,गोळायुग, दलपतसिंग येती गावा, सत्यशोधक, आषाढातील एक दिवस, अशी चाकोरीबाहेरची नाटके दिग्दर्शित करणार्‍या या प्रतिभावंताची ही सगळी कहाणी चटका लावणारी आहे. त्यांच्या कोसलाचे वाचन, इतर कार्यक्रम आणि कचराकोंडी व इतर लघुचित्रपटांविषयीचे अनुभव एकीकडे सुन्न करणारे आहेत आणि त्याचवेळी त्यांच्या प्रांजळपणाविषयी आदर निर्माण करणारे आहेत. हलवणारे, काळीज ढवळून काढणारे असंख्य अनुभव आपल्याला अस्वस्थ करून जातात. लेखनाचा पोत प्रवाही, संवादी, चित्रशैलीतला आणि रसायन अतिशय भन्नाट. अगदी आरभाट. या व्रतस्थ नाट्कवेड्याचा हा सगळा धडपडनामा प्रत्येकाने वाचायलाच हवा.
.
अतुल पेठे तुम्हाला सलाम.

पुस्तकाची किंमत अवघी २२० रूपये आहे. तुमच्या संग्रही हे पुस्तक हवेच.