Friday, August 8, 2014

शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य












http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune//articlelist/2429654.cms?curpg=1 Maharashtra Times,Pune, 8Aug.2014, pg 12
महाराष्ट्र टाइम्स, पुणे दि.८ ओ‘गष्ट, २०१४, पान न. १२
उद्या शनिवारी दि.९ ओ‘गस्ट २०१४ रोजी पुणे विद्यापिठाचा "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ" असा नामकरण सोहळा राज्यपाल श्री. शंकर नारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्व.बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने प्रा. हरी नरके यांनी शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत... ..............................................
शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले 
यांचे कार्य
देशविदेशात गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून पुर्वेकडील ओ‘क्सफर्ड असा नावनौलिक मिळवलेल्या पुणे विद्यापिठाचे नामकरण उद्यापासून "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ " असे करण्यात येत आहे. हा या शहराच्या दृष्टीने ऎतिहासिक क्षण आहे. एकोणीसाव्या शतकातील प्रमुख शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे नाव या विद्यापिठाला देऊन विद्यापिठाचे अधिकारमंडळ आणि राज्य शासन यांनी स्त्रीशिक्षण, ज्ञाननिर्मिती आणि दलित-बहुजन वर्गाच्या मानवी हक्कांचा सन्मान केलेला आहे. आजवर त्यांची ओळख प्रामुख्याने महात्मा जोतीराव फुल्यांची पत्नी आणि सहकारी अशी झालेली आहे. ती अपुरी आहे. मुळात त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व आणि शैक्षणिक योगदान नीटपणाने अधोरेखित करण्यात आलेले नाही.त्या एक प्रतिभावंत शिक्षणतज्ञ आणि नामवंत कवयित्री होत्या. त्यांच्याठायी कुशल नेतृत्वाचे अनेक गुण होते. त्या उत्तम संघटक होत्या. प्रभावी वक्त्या होत्या. खुद्द जोतीरांनी केलेल्या नोंदी आणि इतर महत्वपुर्ण दस्तावेज यांमधून हे सगळे संदर्भ आता उपलब्ध झालेले आहेत.
सुरूवातीला जोतीरावांची विद्यार्थिनी, पुढे कवयित्री, शिक्षिका, मुख्याध्यापिका, नेता, शिक्षणतज्ञ, विचारवंत असा त्यांचा झालेला विकास आणि प्रवास मनोज्ञ आहे. आज सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनींची नावे केंब्रीज, हार्वर्ड, ओ‘क्सफर्डला गाजत आहेत. आद्य स्त्रीवादी लेखिका - विचारवंत ताराबाई शिंदे यांचा "स्त्री पुरूष तुलना " हा १८८२ सालचा ग्रंथ केंब्रीजच्या डो‘.रोझालिंड ओ’हेन्लन यांनी इंग्रजीत भाषांतरित केला. तो ओ‘क्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केल्यानंतर अनेक पाश्च्यात्त्य संशोधकांचे आणि त्यामुळे भारतीय अभ्यासकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. डो‘. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा समावेश आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारात केला. पहिल्या भारतीय महिला संपादक तान्हुबाई बिर्जे, आद्य दलित लेखिका मुक्ता साळवे, पहिल्या दलित महिला संपादक आणि नेत्या सावित्रीबाई रोडे या सगळया सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी होत्या.
सावित्रीबाई पहिली भारतीय शिक्षिका झाल्या तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिकवण्याचे काम जोतीरावांनी केले. मात्र त्यांचे पुढील शिक्षण सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि केशव शिवराम जोशी {भावाळकर} यांनी केल्याची नोंद ”बो‘म्बे गार्डीयन ” या वर्तमानपत्राने २२ नोव्हेंबर १८५१ रोजी केलेली आहे. पुराभिलेखागारातील मुंबई इलाख्याच्या बोर्ड ओ‘फ एज्युकेशनच्या १८५२-५३ च्या अहवालात जोतीरांनी स्वत:च्या पत्नीला शिक्षिका म्हणून तयार केल्याची नोंद आढळते. भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा,महार -मांग मुलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि पहिले वाचनालय यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे या सरकारी अहवालात म्हटलेले आहे. अहमदनगरच्या मिशनरी मिस फरार यांच्या महाविद्यालयातून सावित्रीबाईंनी शिक्षकेचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती गार्डीयनने दिलेली आहे. "शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षणमार्ग हा! शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा" असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. त्यांचा "काव्यफुले" हा १८५४ साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार यांनाच वाहिलेला आहे.
मुंबईच्या शासकीय पुराभिलेखागारात त्यांनी स्थापन केलेल्या २ शिक्षण संस्थांची कागदपत्रे उपलब्ध झालेली आहेत. "नेटीव्ह फिमेल स्कूल्स " आणि "दि सोसायटी फो‘र प्रमोटिंग दि एज्युकेशन ओ‘फ महारस, मांग्जस अ‘ण्ड आदर्स" या २ संस्थाचे अनेक अहवाल त्यात मिळालेले आहेत. त्यानुसार दयाभावनेने सुरू केलेले एक शैक्षणिक काम असे त्याचे स्वरूप नसून त्यामागे एक स्वतंत्र विचारधारा, एक सुस्पष्ट शैक्षणिक तत्वज्ञान असल्याचे स्पष्ट होते. "आपल्या देशात अज्ञान, जातीभेद, भाषाभेद हे दुष्ट रोग आहेत.जातीभेदामुळे ज्यांना अनिवार्य दु:खे भोगावी लागतात त्यांच्यासाठी शिक्षण सुरू करणे हे खरे देशकार्य असल्याने आपण ते सुरू केले." "जे लोक या देशाच्या सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तमावस्थेत यावा यासाठी बायकांना विद्या शिकवली पाहिजे." या हेतूने ह्या दोन्ही संस्था संचालकांनी सुरू केल्याचे या अहवालात नमूद केलेले आहे. या शाळांमध्ये विनावेतन काम करताना "या पतीपत्नींना अनेकदा जेवायलाही फुरसद मिळत नसे" असे निरिक्षण वर्तमानपत्रांनी नोंदवले होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी देशातील आणि आशिया खंडातील पहिली मागणी १९ ओ‘क्टोबर १८८२ रोजी हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी केली होती. त्या मागणीपत्रात जोतीरावांनी सावित्रीबाईंचा स्वतंत्र उल्लेख केलेला आहे.
त्यांच्या मुलींच्या शाळांच्या परिक्षा बघायला १२ फेब्रुवारी १८५३ रोजी विश्रामबागवाडा चौकात पुण्यात ३०००हून अधिक लोक जमल्याची नोंद मिळते. प्रथम क्रमांक मिळवलेली मुलगी अस्खलित इंग्रजीत बोलली आणि तिने खाऊ,खेळणी, कपडे यांच्याऎवजी ग्रंथालयाची मागणी केली असे शासकीय अहवाल म्हणतो. गळतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गरिब मुला-मुलींना दरमहा पगार दिला जात असे असेही त्यात नमूद करण्यात आलेले आहे.
शाळेतील सर्व मुलामुलींना जीवनात पुढे स्वतंत्र आणि स्वावलंबी होता यावे, मजेत जगता यावे यासाठी उद्योगाचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा द्रष्टेपणा त्यांच्याकडे होता."Industrial Departments should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently" आजच्या काळात त्यांचा हा द्रष्टेपणा पाहून थक्क व्हायला होते.निरक्षर पालक हा शिक्षणातला मोठा अडथळा असतो हे ओळखून स्वत:च्या घरात सावित्रीबाईंनी १८५४ साली प्रौढ स्त्रियांसाठी रात्रशाळा सुरू केल्याची माहिती खुद्द जोतीरावांनी दिलेली आहे.
पुढील अनेक चळवळींमध्ये जोतीराव अनुयायी आणि सावित्रीबाई नेत्या असल्याची लेखी कबुली देऊन जोतीरावांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केलेली आहे."स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा अर्पाया न भी किमपिही सर्वस्व माझे कदा! अशी वराला मंगलाष्टकामधून प्रतिज्ञा वदवायला लावणारी सत्यशोधक विवाह पद्धती, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी "बालहत्या प्रतिबंधक गृह", सुरु करून त्यात ३५ स्त्रियांची बाळतपणे पोटच्या मुलीच्या मायेने त्यांनी केली. दुष्काळात सुमारे एक हजार मुलांमुलींच्या मदतीसाठी छावणी सुरू करून, विधवांच्या केशवपनाविरुद्ध ना.मे.लोखंड्याच्या साथीने केलेला नाभिकांचा संप घडवला. या कामांच्या वेळी जोतीरव फुले हयात होते. सावित्रीबाई त्यांच्या नेत्या होत्या.
जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले. स्वत: टिटवे धरले. अग्नी दिला. ओतुर, सासवड आदी सत्यशोधक परिषदांचे अध्यक्षपद भुषवले. सहा पुस्तके लिहिली. त्या अर्धशतकभर ज्ञानार्जन, अध्यापन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करीत राहिल्या. फेब्रुवारी - मार्च १८९७ च्या प्लेगच्या भयंकर साथीत रुग्णांना मदत करण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांनी औषधोपचार केले. पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुंढव्याच्या महार समाजातील मुलाला पाठीवर घालून त्या हडपसरला ससाणे मळ्यात डो‘.यशवंतच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. त्याला बरे केले. आणि स्वत: याच संसर्गजन्य आजारात १० मार्च १८९७ ला बळी पडल्या.शहीद झाल्या.
अशा स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या एका समर्पित, द्रष्ट्या शिक्षणतज्ञाचे नाव विद्यापिठाला दिले जाणे हा विद्यापिठाचा गौरव आहे. ज्या पुण्यात त्यांचा कामाला आधी १८४८ ला विरोध झाला त्याच कर्मभुमीत शतकानंतर १९४८ साली पुणे विद्यापिठ उभे राहिले. सावित्रीबाईंच्या नावाने ओळखले जाणारे हे विद्यापिठ ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, सामाजिक न्याय आणि धर्मचिकित्सा यांचे केंद्र बनावे अशी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment