डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, साहित्य आणि जीवन म्हणजे धगधगता अंगार. ते एकमेव असे महापुरूष आहेत की ज्यांच्या वाट्याला कोट्यावधी सामान्य लोकांचे तुफान प्रेम आलेले आहे, पण त्याचवेळेला त्यांच्याबद्दलची अढी मनात असलेलाही फार मोठा जनसमुदाय अस्तित्वात आहे. मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणार्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : गौरवगाथा महामानवाची" या लोकप्रिय मालिकेचे (बायोपिकचे) बघताबघता ३२५ एपिसोड पुर्ण झाले. विविध सामाजिक स्तरातील (लिंगभाव, वर्ग व जातीय भेदभाव विसरून) प्रेक्षकांचे अमाप प्रेम या मालिकेला लाभले याचा मालिकेचा प्रमुख संशोधन सल्लागार म्हणून मला आनंद आणि अभिमान वाटतो. यापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळालेल्या काही मराठी मालिका असतील. याच्यापेक्षाही जास्त समाजमान्यता मिळालेल्या काही मोजक्या बायोपिकही असू शकतील.
टिपीकल मध्यमवर्गीय सासूसुनेचा विषय नाही, कटकारस्थाने, निर्बुद्ध करमणूक नाही, टिव्हीच्या मुख्य प्रवाहाला सुखावणारी, तिचा दळभद्री अनुनय करणारी मांडणी नाही तरिही लोकप्रियता, समाज प्रबोधन, विद्वतमान्यता आणि वादंगरहितता यात अव्वल असलेली आजवरची एकमेव मराठी मालिका असावी गौरवगाथा.
दशमी क्रिएशनचे मित्रवर्य नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी या विषयावर मालिका करण्याचे ठरवले तेव्हा अनेक जाणत्यांनी अशा अस्मितापुर्ण, ज्वलंत किंबहुना सदास्फोटक विषयावर कशाला हात पोळून घेताय असा सज्जड इशारा दिलेला होता. कितीही अडचणी आल्या तरी मालिका पुर्ण करायचीच असा आमचा गौरवगाथा टिमचा निर्धार होता. तो आज सफल होतोय याचे नक्कीच समाधान आहे. बाबासाहेब हा महाकाव्याचा विषय आहे. यावर चारपाच वर्षे चालेल अशीही मालिका करणे शक्य आहे. नव्हे सोयीचेही आहे. मात्र तरिही अतिशय गोळीबंद अशी फक्त २०० एपिसोडचीच मालिका करायची असे ठरवून आम्ही कामाला सुरूवात केली. चां.भ.खैरमोडे यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या चरित्राच्या १२ खंडांवर प्रामुख्याने ही मालिका आधारित असली तरी बाबासाहेबांच्या साहित्य व भाषणांचे २२ खंड आणि बाबासाहेबांवर लिहिली गेलेली किमान १५०० पुस्तके आम्ही या मालिकेसाठी धुंडाळली. या रिसर्चचा सुयोग्य वापर केला. या सार्या साहित्यावर आधारलेला हा मालिकामय महाप्रकल्प आज शेवटाच्या जवळ पोचला आहे. आजवर अनेक स्पीडब्रेकर आले. कारणपरत्वे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, संवादलेखक आणि इतर अनेकांमध्ये बदल झाले. मात्र दशमीची वरील त्रिमुर्ती, अक्षय पाटील, सोहम देवधर, पटकथाकार शिल्पा कांबळे, प्रसिद्धीप्रमुख वैभव छाया, स्टार प्रवाह वाहिनीचे सतिश राजवाडे, अभिजीत खाडे, नरेंद्र मुधोळकर आणि मालिकेचा प्रमुख संशोधन सल्लागार म्हणून मी, ३२५ एपिसोड सोबत होतो. आहोत. मालिका संपेपर्यंत राहू.
मालिका म्हटले की वेळेची लगीनघाई असते. रविवार वगळता सोमवार ते शनिवार दररोज एपिसोड सादर व्हायलाच हवा असा दट्ट्या असल्याने इच्छा असूनही परिपुर्ती साधता येत नाही. सादरीकरणात काही उणीवा, त्रुटी, काही दोष राहून जातात. कोणतीही मालिका ही पब्लिक प्रॉपर्टी असते. त्यामुळे तिच्यावर बोलण्याचा, लिहीण्याचा, टिका करण्याचा प्रत्येक प्रेक्षकाला/नागरिकाला अधिकार असतो. तो अधिकार काहींनी अवश्य बजावला, त्यासाठी त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो. त्यातनं आम्हाला अधिकाधिक सुधारणा करता आल्या.
कोणतेही मोठे वादंग (कॉन्ट्रोव्हर्सी) न होता ही मालिका शेवटाजवळ पोचली, या मालिकेने इतर भाषांमधील बाबासाहेबांवरील मालिकांचे दरवाजे उघडले, एका मौलिक तथापि उपेक्षित/वर्जित विषयाकडे जाणत्यांचे लक्ष वेधले, एक दर्जेदार मालिका यावर होऊ शकते याचे तगडे प्रात्यक्षिक सादर केले याचे सार्थक शब्दात न मावणारे आहे.
१७ मे २०१९ ला बुद्धजयंतीच्या दिवशी ही मालिका सुरू झाली. लॉकडाऊनचा चार महिन्याचा काळ वगळता २०२०च्या ऑक्टोबर मध्यापर्यंत (धम्मचक्र प्रवर्तनदिनापर्यंत) ही मालिका चालेल असा अंदाज आहे.
बाबासाहेबांच्या साहित्य आणि लेखणाचे खंड प्रकाशित करायला वसंत मून यांच्या निधनानंतर कोणीही पुढे यायला तयार नसताना, वीस वर्षांपुर्वी त्याकामासाठी मी माझी टेल्कोतली भरपूर पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी सोडून मंत्रालयात गेलो. सरकार मला त्या कामाचे दरमहा रुपये दोन हजार एव्हढे मानधन देत असे. बाबासाहेबांच्या लेखण आणि भाषणांचे खंड १७ ते २२ चे अकरा ग्रंथ तसेच आवृत्ती संपलेले आणखी बारा ग्रंथ मी प्रकाशित करू शकलो, गौरवगाथा या महामालिकेच्या माध्यमातून मराठी भाषक महिला, ओबीसी, अल्पसंख्यक, शेतकरी, कामगार, बहुजन, श्रमिक आणि बुद्धीजिवी अभिजन या संमिश्र वर्गापर्यंत बाबासाहेबांचे जीवनकार्य आमच्या तोकड्या कुवतीनुसार आम्ही पोचवू शकलो याचे अतिव समाधान वाटते.
- प्रा. हरी नरके,
२९/९/२०२०
No comments:
Post a Comment