Tuesday, July 14, 2020

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)









माझ्या घरात महात्मा फुले व बाबासाहेबांचे फोटो मी इयत्ता चौथीत होतो तेव्हापासून लावलेले आहेत.


मी इयत्ता सहावीत असताना काढलेला फोटो. हातातले घड्याळ फोटो स्टूडीओतले असून, अंगठा तुटलेली प्लॅस्टीकची चप्पल माझीच आहे. जुन्या बाजारातून बारा आण्याला घेतलेली.सर्वात महत्वाचे हातातले पुस्तक- माझे सर्वाधिक आवडते पुस्तक "महात्मा फुले : समग्र वाड्मय"


इथून मी सुरूवात केली. नरकेवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे येथील १९८० च्या काळातील माझं घर आणि गोठा-



मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला टेल्कोतून मंत्रालयात वि.का.अ. म्हणुन घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी सम्पादित केलेला अंक-



नामांतर आंदोलनातल्या तुरूंगवासाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या हस्ते सत्कार


ओबीसीत जाऊन काम करा असा मला अनाहूत सल्ला देणार्‍या "मित्रांसाठी खास", हे माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे.


जेव्हा दोनचार सरंजामदार तथाकथित डावे मला रा. स्व. संघाचा हस्तक म्हणुन हिनवत होते, वाळव्यात मला रितसर निमंत्रित करून त्यांच्याच स्टेजवर बोलू देत नव्हते, बाबरी विध्वंसनाला उत्तर म्हणुन तेव्हा मी भाई वैद्य आणि विलास वाघ यांच्यासमवेत सम्पादित केलेला ग्रंथ- धर्मनिरपेक्षता




श्री.छगन भुजबळ, प्रा.ना.स.फरांदे, श्री. मुकुंदराव ठकोजी पाटील, डी.के. माळी  आणि इतर नेत्यांसोबत १९९०



माझा जन्म निरक्षर शेतमजूर-मोलकरीण आईवडीलांच्या पोटी झोपडपट्टीत झाला. कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत पुणे मनपाच्या मुंढवा शाळेत शिकलो. माझा पहिल्या महिन्याचा पगार होता रुपये पाच. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा दरमहा पगार होता साठ रूपये. माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. त्यामुळेच इतक्या लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली.


मार्च १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफटिए म्हणून टेल्कोत शिकायला गेलो आणि फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. म्हणता म्हणता याला  ४० वर्षे कधी झाली कळलंच नाही. मी " डीकास्ट"  झालोय, जातीबाहेर पडलोय अशाच गोड समजुतीत मी होतो. सामाजिक कामात तुम्ही तुमची जात विसरून गेलात तरी काही "ज्ञानीजन" तुम्हाला तुमची जात विसरू देत नाहीत. ते तोंडाने "जातीनिर्मुलनाची" भाषा करीत पुन्हापुन्हा तुम्हाला तुमच्या जाती-धर्मात ढकलायचा प्रयत्न करीत असतात.


हे लोक मूठभरच असतात. आहेत. त्यांना आपण अपवादात्मक लोक समजू शकतो. ते सर्वच जाती-धर्मात आहेत. एकुण समाजाचा विचार केला तर असे लोक एका लाखामागे एखाददुसरासुद्धा भरणार नाहीत. उरलेला सारा समाज माझ्यावर नितांत प्रेम करतो. जिवाला जीव देतो. त्यामुळे या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या अपवादात्मक लोकांचा राग मी समजून घेऊ शकतो. त्या माझ्या मित्रांचे तीन बारकुलेसे गट पडतात.

१. जे लोक तरूणतुर्क, अगदी नवे आहेत, ते अलिकडेच सोशल मिडीयात आलेले आहेत. त्यांनी माझे फारसे काहीच वाचलेले/ऎकलेले नाही. त्यांनी मी संपादित केलेले बाबासाहेबांचे रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचे खंड १७ ते २२ बघितलेलेही नाहीत. जे खुद्द बाबासाहेबांचेही वाचत नाहीत त्यांनी माझी इतर पुस्तकं वाचली असण्याची सुतराम शक्यता नाही. एकुण ते मला ओळखतच नाहीत.

२. ज्यांनी मला अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना बोलावलं, पण मी त्यांना एकदाही वेळ देऊ शकलो नाही म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. गेली ४० वर्षे, वर्षाकाठी मला ५५० ते ६०० निमंत्रणं येतात. त्यातली वेळेअभावी ९० टक्के निमंत्रण मी स्विकारू शकत नाही. मी वर्षाकाठी अवघी ५० ते ५२ निमंत्रणं स्विकारू शकतो. उरलेले नाराज होतात. त्याला माझा नाईलाज आहे.

३. जे लोक मला स्पर्धक समजतात, याला कार्यक्रमला बोलावू नका, आम्हाला बोलवा, असं समाजाला सांगसांगून ते दमलेत. पण समाज त्यांचं ऎकतच नाही. त्यामुळे ते समाजावर संतापून आहेत. माझ्यावर डुख धरून आहेत. असो.

ही सारी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली दु:खी माणसं आहेत. चिडखोर माणसांसारखीच ती वागतात ह्यात आश्चर्यकारक असं काहीही नाही. शिवाय कशीही वागली तरी ती सारीच माझी भावंडं असल्याने मला त्यांचा राग नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, दोस्तहो, आपण सोबत प्रवासाला सुरूवात केली होती, तुम्ही मागे पडलात हा माझा दोष नाही. तुमचे अपयश हा माझा गुन्हा नाही. तुमची म्हैस भाकड आहे म्हणून माझ्या दुभत्या म्हशीला शिव्या देऊन काय साध्य होणार? तुम्हाला परीक्षेत कधीही सेकंड क्लाससुद्धा मिळवता आला नाही म्हणून तुम्ही माझ्या सुवर्णपदकांवर जळता हे मला माहित आहे. तुमचा माझ्यावरचा जळफळाट मी अगदीच समजू शकतो. पण, मत्सराने प्रगती होत नाही, उलट मन आणि शरीर अधिक रोगट बनत जाते. मला तुमच्याबद्दल अपार कणव आहे. करूणा-मैत्रीभाव आहे. लवकर बरे व्हा भावंडांनो. Get Well Soon..


मी सम्यक सम्बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रवासी आहे. आज जरी ते माझा रागराग करीत असले तरी उद्या तेही माझ्यावर प्रेम करतील असा मला विश्वास आहे. अनित्यता सिद्धांतावर माझा विश्वास आहे. मी माझ्याबाजूने त्यांच्यावर प्रेमच करतो.


माझं पहिलं पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक बाळ गांगल यांच्यावर होतं. त्यांच्या महात्मा फुल्यांवरील गलिच्छ टिकेचा २२५ संदर्भांसह सप्रमाण प्रतिवाद करणारं ते पुस्तक आहे. १९८९ च्या मार्चमध्ये ते पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते चंद्रपूरला प्रकाशित झालं. तेव्हा मी टेल्कोची रात्रपाळी करून विद्यापीठात एम.फिल. करीत होतो. त्यावेळी माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, नामवंत आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पु.लं.च्या भाषणाची जादू अशी की पुस्तकाच्या ५०० प्रती या कार्यक्रमातच संपल्या. महिनाभरात तीन हजार प्रतींची आवृत्ती संपली. पुस्तकाला अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अनेक मान्यवरांनी त्या पुस्तकावर लिहिले. त्यावर्षीचे ते सर्वाधिक लोकप्रिय व विद्वतमान्य पुस्तक ठरले.


तेव्हापासून आजवर सातत्याने मी संघाचं पोलखोल करणारं सर्वाधिक लेखन केलेलं आहे. अगदी परवा १४ एप्रिल २०२० ला जेव्हा रा.स्व.संघाने बाबासाहेब आमचेच असा दावा केला तेव्हासुद्धा दि प्रिंटमध्ये मी २ लेख लिहून संघाला उत्तर दिलंय. एप्रिल ते मे २०२० मध्ये मी संघाविरूद्ध सुमारे २५ लेख लिहिलेत. आणि संघाच्या बाबतीत संपुर्ण निष्क्रीय असलेले माझे काही मित्र मी संघाचा असल्याची आवई उठवतायत. सामान्य माणसं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतील? मग त्यांचा अधिकाधिक चडफडाट, तिळपापड होतो.


मी संघाचा असतो तर वर मोदींचे आणि खाली फडण२० यांचे  सरकार असताना त्यांनी मला
" १. महात्मा फुले ग्रंथ समिती,
२. राज्य मागासवर्ग आयोग,
३. महात्मा फुले अध्यासन,
४. बालभारती,
५. मराठी भाषा सल्लागार समिती,
६. अभिजात मराठी समिती,
या सर्वच शासकीय आस्थापनांवरून काढून का टाकलं असतं?


मी त्यांचा असतो तर उलट मला प्रमोशन, पदोन्नती मिळायला हवी होती.


आणि त्यांचं सरकार असताना मी त्यांचे " दि टाइम्स ऑफ इंडीया, डि.एन.ए, लोकसत्ता, म.टा. लोकमत, सकाळ, पुढारी, बेळगाव त.भा, दिव्य मराठी, आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, झी २४ तास, दिव्य मराठी, साम टिव्हीवर तसेच माझ्या फेसबुक, ट्विटर, ब्लॉगवर अनेकवार वाभाडे काढले असते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात राजेहो? ऎन लढाईच्या वेळी जे कायम झोपी गेलेले असतात, होते, त्यांना जनता आणि जाणते मोजत नसतात.


मी महात्मा फुले समता परिषदेचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी आहे. १९९२ पासून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून श्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लक्षावधी ओबीसींच्या अनंत चळवळी केल्या. " ओबीसी बजेट,"  "ओबीसी जनगणना" असे प्रश्न आम्ही देशपातळीवर प्रथमच ऎरणीवर आणले. त्यावर सर्वथरात रान उठवले. ओबीसी जनगणनेवरचं माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे. माझ्या ओबीसी आरक्षण विषयक एका पुस्तकाचे प्रकाशक कॉ. गोविंद पानसरे होते, तर दुसर्‍याचे मकरंद सावे. माझी अनेक पुस्तकं मुंबईला कम्युनिस्टांच्या कॉ. भुपेश गुप्ता भवनमध्ये छापली गेलेली आहेत.


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही ओबीसींचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेत. आजही नियमितपणे घेत असतो. मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली, पाटना, जयपूर, गोवा, हैद्राबाद, हजारीबाग अशा कितीतरी ओबीसी मेळाव्यांना ५ - ५ लाख इतर मागासवर्गीय बांधव उपस्थित होते. ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात शंभराहून अधिक शिबिरं घेतलेली आहेत. माझे काही मित्र  "तुम्ही ओबीसीत का काम करीत नाही? तिकडे जा, आमच्याकडे येऊ नका." असा सल्ला मला देत असतात. त्यांच्या या मौलिक सल्ल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली तर त्यांना ओबीसींच्या प्रबोधनाशी संबंधित माझे किमान २०० लेख ब्लॉगवर दिसतील. इंग्रजी पेपर " दि हिंदू " पासून मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये माझे ओबीसीविषयक लेखन प्रकाशित होत असते. झालेले आहे. माझा ब्लॉग वाचणारांची संख्या आज आठ लाख इतकी आहे.


ओबीसींच्या प्रबोधनावर मी जितके लिहिलेय, लिहितोय, बोललोय, बोलतोय त्यापेक्षा जास्त काम या मित्रांनी केलेले असणार! असे मी समजतो. तेव्हा त्यांचा प्रत्येक सल्ला मला शिरसावंद्य मानयलाच हवा! माझ्या मित्रांनो, तुमचा हा सल्ला मी नक्कीच अंमलात आणीन.


१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.
कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.


तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.


कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.


ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.


ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.
तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.
त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.


मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?


जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.


दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.


जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे  माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.


१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)


- प्रा. हरी नरके,

१४/७/२०२०

संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२


पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी पदवीचे शिक्षण घेत असताना ३ वर्षात आंतर राज्य, आंतर विद्यापीठीय पातळीवरील १३३ वादविवाद-वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. देशाचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना-



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी रेग्युलर बी.ए. केलं. पुणे विद्यापीठात पहिला आलो. तेव्हा राज्यपाल न्या. एस. के. देसाई यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि २५ पुरस्कार स्विकारताना- (१६/१०/१९८७)


सामाजिक-सांस्कृतिक कार्याबद्दलचा राज्यव्यापी महानगर पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांच्या हस्ते स्विकारताना, शेजारी गो.रा.खैरनार व इतर मान्यवर


रतन टाटा यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार स्विकारताना, शेजारी जे. ई. तळौलीकर

No comments:

Post a Comment