आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.
१९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.
जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.
बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.
बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."
राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.
बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.
- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०
No comments:
Post a Comment