Sunday, July 5, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर













डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था : संस्थेकडे जगातला सगळ्यात मोठा प्राचीन हस्तलिखितांचा खजिना- प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान  प्राच्यविद्या पंडीत, स्कॉलर आणि बौद्ध साहित्याचे विद्वान संशोधक असल्याने त्यांना सर रा.गो. भांडारकर यांच्याविषयी आदर होता. भांडारकर हे मुंबई विद्यापीठाचे दुसरे भारतीय कुलगुरू होते. ते संस्कृत स्कॉलर, इतिहासकार व बौद्ध साहित्याचे जाणकार होते. थोर बौद्ध विद्वान राहुलजी सांकृत्यायन, धर्मानंदजी कोसंबी यांनी जगभरातून जमवलेले प्राचीन बौद्ध ग्रंथ व हस्तलिखिते यांचा मोठा संग्रह भांडारकर संस्थेकडे आहे. बाबासाहेबांनी भांडारकर संस्थेला भेटी दिलेल्या असून त्यांच्या सह्या संस्थेच्या भेट पुस्तकात आहेत. त्यांच्या भेटीची एक आठवण,        " समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या महत्वाच्या ग्रंथात थोर आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सन्मित्र विजय सुरवाडे यांनी प्रकाशित केलेली आहे. बाबासाहेबांचे निकटवर्ती भास्करराव भोसले यांनी लिहिलेल्या या आठवणीत दोन गोष्टींची नोंद महत्वाची आहे. (१) संशोधनपर लेखनासाठी बाबासाहेब भांडारकर संस्थेच्या दस्तऎवजांचा उपयोग करीत. (२) बाबासाहेबांना या संस्थेच्या कामाबद्दल कौतुक आणि आस्था होती.

भोसले लिहितात, " (बाबासाहेबांची) मोटार भांडारकर रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये जात होती. मी लगेच तिकडे मोर्चा वळवला व मोटारीतून डॉ.साहेबांसहीत उतरलेल्या माझ्या मित्रमंडळीत सामील झालो. डॉ. साहेबांना काही जुन्या प्रती चाळावयाच्या होत्या. पैजवन नावाच्या राजाचा उल्लेख कितीवेळा व कोणकोणत्या प्रतीत कोणत्या अर्थाने आला आहे, याचा त्यांना तलास लावावयाचा होता.

ते काम झाल्यावर आम्ही बाबासाहेबांसोबत मोटारीत बसलो. डॉ.साहेब आम्हाला म्हणाले, " पहा, जगाला विसरून हे लोक विद्याव्यासंगात निमग्न आहेत. सर्व्हन्टस ऑफ इंडीया सोसायटीचे लोकही याच प्रकारचे!"


त्यांना (बाबासाहेबांना) ब्राह्मण लोकांतील चांगल्या गुणांबद्दल आदर होता. विरोधकांच्या चांगल्या गुणांबद्दल आदर असणे लोकशाही यशस्वी होण्यासाठी अत्यंत जरूरीचे आहे, असा बाबासाहेबांच्या बोलण्याचा निष्कर्ष भोसले यांनी काढलेला आहे. आमच्या काही मित्रांना भांडारकर संस्थेबद्दल काही  वाजवी कारणांनी अढी आहे. त्यामुळे तिथल्या पाली व संस्कृतमधील प्राचीन बौद्ध साहित्याबद्दल त्यांना माहिती घ्यावीशी वाटत नाही, हे विद्याव्यासंगाला घातक आहे.


रा.गो. भांडारकर हे प्रार्थना समाजाचे होते. ते पुरोगामी होते. त्यांचा जीवन आदर्श संत तुकाराम हा होता. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मध्ये तिनदा भांडारकरांचा गौरव केलेला आहे. पृ.४८, २६२ व ३३८ वर ते उल्लेख तुम्हाला वाचायला मिळतील. बाबासाहेब भांडारकरांना किती मानत होते, ही माहिती घेण्यासाठी आम्ही राज्य शासनातर्फे बाबासाहेबांचे जे साहित्य प्रकाशित केलेले आहे त्यातला " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक" हा मोठ्या आकारातील खंड अवश्य वाचा.


राज्यशासनातर्फे पाच प्रतिनिधी भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळावर नेमले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना डॉ. आ. ह. साळुंखे, मुस्लीम समाजातील संस्कृत विद्वान गुलाम दस्तगीर, डॉ. सदानंद मोरे, सुचेता धडफळे व मला शासनाने या संस्थेवर नेमले. " आंबेडकर आणि मार्क्स " या महाग्रंथाचे लेखक, सगळ्या डाव्यांचे महागुरू आणि माझे मार्गदर्शक डॉ. रावसाहेब कसबे यांनी या संस्थेच्या अधिकार मंडळावर अनेक वर्षे काम केलेले आहे.


या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना संस्थेकडुन मानधन म्हणुन कोणतीही रक्कम दिली जात नाही. मी काही वर्षे भांडारकरचा उपाध्यक्ष होतो तरी मला भांडारकरकडुन एक रुपयाही मिळालेला नाही. आपण संस्थेकडुन माहिती अधिकारात ही माहिती घेऊ शकता.


ज्यांना माझा चेहरा आवडत नाही अशा अतिडाव्या आणि अतिउजव्या दोघांनीही फक्त माझ्या एकट्याच्याच नावाने शंख केलेला आहे. उरलेल्या चार बहुजन विद्वानांच्या भांडारकर संस्थेसोबत काम करण्याबद्द्ल ( जे मलाही आदरणीय आहेत ) संपुर्ण मौन बाळगलेले आहे.


त्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्याबद्दलचा तीव्र आकस.


साळुंखेसर व  कसबेसरांनी वयाच्या सत्तरीनंतर बहुतेक सर्वच संस्थांवरून निवृत्ती स्विकारली. डॉ. सदानंद मोरे व मी आजही या संस्थेच्या नियामक मंडळावर काम करतो.


आम्हाला विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पात रस आहे. या संस्थेकडे अरबी, अवेस्ता, पाली, जैन महाराष्ट्री, संस्कृत व महाराष्ट्री प्राकृत या भाषांमधली ३० हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. एव्हढी मौलिक आणि प्राचीन हस्तलिखिते जगात दुसर्‍या कोणत्याही संस्थेकडे नाहीत. संस्थेच्या " महाभारत" व "हिंदु धर्माचा इतिहास" या खंडांना जागतिक मान्यता मिळालेली आहे.


ज्यांना धर्मशास्त्र, इतिहास, भाषा, संस्कृती यांच्या अभ्यासाचे मोल कळते ते या संस्थेबद्द्ल अतिशय आदराने बोलतात.


संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ भांडारकरने सर्वप्रथम १९२६ मध्ये प्रकाशित केलेला आहे, हे माझ्या किती मित्रांना माहित आहे?

ज्यांच्या मनात भांडारकर संस्थेबद्दल काही वाजवी कारणांनी आक्षेप आहेत त्यांनी शांत डोक्याने संस्थेच्या प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील संशोधनपर कामांची माहिती घ्यावी व आपला गैरसमज दूर करावा असे मी नम्र आवाहन करतो... संस्थेत काम करणार्‍या काही व्यक्तींवर तुमचा राग असू शकतो. पण तिबेट, ब्रह्मदेश, भुतान, श्रीलंका, चीन, जपान अशा देशांमधून धर्मानंद कोसंबी, राहूल सांकृत्यायन यांनी प्रचंड मेहनतीने जमवलेल्या प्राचीन बौद्ध ग्रंथांवर राग ठेवू नका. माझ्या ज्या अल्पशिक्षित मित्रांना प्राचीन बौद्ध साहित्याच्या संशोधनातले फारसे कळत नाही त्यांना मी याबाबत दोष देणार नाही, त्यांचा राग मी समजू शकतो.


-प्रा. हरी नरके, ५/७/२०२०


टीप- जेम्स लेनने राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची भयंकर बदनामी केलेली असून मी त्या लेखनाचा व लेनचा तीव्र निषेध करतो.


संदर्भासाठी पाहा- १. "समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर", संपादक विजय सुरवाडे, लोकवाड्मय गृह, कॉ. भुपेश गुप्ता भवन, मुंबई, २००३, पृ. १२३/१२४

२. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक", महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९०, पृ.४८/२६२/३३८

No comments:

Post a Comment