"हरी तुझी जात कोणती रे?" प्रसिद्ध साहित्यिक ह.मो.मराठे मला विचारत होते. आजवर आडवळणानं अनेकांनी हा प्रश्न विचारलेला होता. पण असा थेट प्रश्न आणि तोही एका मोठ्या संपादक, लेखकाकडून प्रथमच विचारला जात होता. हमोंनी हा प्रश्न विचारावा हे मला आवडलेले नव्हते.
ह.मो. यांच्याशी माझा किमान 30 -35 वर्षांचा परिचय होता. मैत्री होती. माझ्या लग्नाला ते आवर्जून आले होते.
करियरच्या सुरूवातीला साप्ताहिक साधनेत नोकरी करणारे, "नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’’, एक दिवस : एक माणूस, पोहरा, बालकांड, अशी सरस पुस्तकं लिहिणारे, किर्लोस्कर, लोकप्रभा, घरदार, मार्मिक, पुढारी यांचे संपादक राहिलेले मराठे मी जवळून बघितलेले होते. नि:ष्पर्ण वृक्षावर ही मराठीतली अतिशय दणकट कलाकृती. लोकप्रभाला त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. घरदारने तर अल्पावधीत जोरदार मुसंडी मारली. त्यांची शैली वेगवान आणि प्रसन्न होती. लोकप्रभानं हमोंच्या लोकप्रियतेत खूप मोठी वाढ झाली. काही स्पर्धक संपादकांनी डुख धरून त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही घटनांबद्दल त्यांच्यावर चिखलफेक सुरू केली, हे सारं मी पाहात होतो.
मी शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेला ते परीक्षक होते. मला त्यांनी पहिले पारितोषिक दिले होते. स्पर्धा संपल्यावर त्यांनी मला किर्लोस्करवर भेटायला ये असे सांगितले.
मी गेलो. ते खूप जिव्हाळ्यानं विचारपूस करीत राहिले. परत परत भेटी होत राहिल्या. गप्पा रंगत गेल्या. खरंतर ते खूप मोठे संपादक -लेखक आणि मी एक किरकोळ विद्यार्थी होतो. ते माझ्याशी अतिशय आपुलकीनं वागत असत. त्यांनी किर्लोस्करमध्ये एका अंकात ज्योत्स्ना भोळे, माधव गाडगीळ आणि मी अशा तिघांवर एकत्रितपणे लिहिलं होतं. ती दोन उत्तुंग माणसं आणि मी एक छोटासा पोरगा. मी झोपडपट्टीत चालवित असलेली बालवाडी, माझी चालू असलेली इतर सामाजिक कामं, वादविवाद- वक्तृत्व स्पर्धांमधली बक्षिसं, माझी कबरस्थानातली नोकरी, झोपडपट्टीतील घरात मी जमवलेली शेकडो पुस्तकं असं बरंच त्यांनी कौतुकानं लिहिलेलं होतं. माझ्याबद्द्लच्या किर्लोस्करमधील हमोंच्या त्या लेखनात समता प्रतिष्ठानचा उल्लेख नसल्याबद्दल डॉ. अनिल अवचट बरेच नाराज झालेले होते. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं.
लोकप्रभाचे संपादक असताना हमोंच्या कौटुंबिक आयुष्यात काही वादळं आली. काही वर्तमानपत्रांनी त्यांना खूप झोडपलं. हमों खूप दुखावले गेले. तो राग त्यांनी कायम जपून ठेवला. तोवर प्रागतिक विचारांचे असलेले ह.मो. चक्क जातीच्या गडाला शरण गेले. एका जातीच्या नावानं काम करणार्या संघटनेचे गडकरी झाले. विद्वेषाच्या विरोधात अशी टॅगलाईन घेऊन एका जात संघटनेचं जोशात नेतृत्व करू लागले. पुस्तिका लिहून प्रकाशित करू लागले. तिथून हमोंचा आलेख घसरत जातीय झाला.
त्यांचे मला अनेकदा फोन येत. मी खूप लिहावं म्हणून फोनवरून व पत्रांद्वारे ते मला आग्रह करीत. भेटले की खूप बोलत. ’महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन’ या माझ्या पुस्तकावर त्यांनी जिव्हाळ्यानं आणि विस्तारानं लिहिलं. माझ्या इतरही पुस्तकांवर ते लिहित राहिले. त्यांचे एसेमेस नियमितपणानं येत असत. अलिकडेच त्यांचा एक एसेमेस आला नी नंतर लगेच फोन आला. हरी, अरे तुला माहित आहे का तुझ्या नावानं व्हाट्स अॅपवर एक पोस्ट फिरतेय. लताबाईंबद्दलची. तुच लिहिलेयस का तुझ्या नावावर कोणीतरी हा उद्योग केलाय? ती पोस्ट मीच लिहिलेली आहे असं सांगताच ते त्यात भर घालणारी बरीच माहिती मला सांगत बसले. एक चौकस पत्रकार त्यांच्यात कायम दडलेला असे. समोरच्याकडून आपल्याला हवी ती माहिती ते खुबीनं काढून घेत. तिचा आपल्या लेखनात वापर करीत. त्यांची अनेक पुस्तकं त्यांनी मला सप्रेम भेट दिलेली आहेत. मी त्यांच्या लेखणाचा चाहता आहे हे माहित असल्यानं माझ्या प्रतिक्रिया समजून घेण्यात त्यांना रस असायचा. सर, दर्जेदार लिहिलंय तुम्ही असं मी म्हटलं की खुलायचे, मात्र जमलं नाही सर, असं म्हटलं की "असं म्हणतोस? आता काय वय झालं रे आमचं", असं म्हणून दुसरा विषय काढायचे.
पुढं मराठीच्या अभिजात दर्जासाठी मी केलेलं काम ऎकून, वाचून महाराष्ट्र साहित्य परिषदेतील बैठकीत त्यांनी जाहीरपणे त्या कामाचं कौतुक केलं. फोनवरही त्याबद्दल ते माझ्याशी बरंच शाबासकी देणारं बोलले.
खाजगी गप्पातील काही ’ऑफ द रेकॉर्ड’ संदर्भ सार्वजनिक लेखनाद्वारे त्यांनी मुद्दाम प्रसिद्ध करून माझ्या एका साहित्यिक मित्राला अडचणीत आणल्यापासून मी त्यांच्यापासून सावध राहू लागलो. आजारपणांनी हमोंची घसरण आणि चिडचिड वाढतच गेली. ते अधिकाधिक जातीय होत गेले. विद्वेशकारी लिहू लागले. दरम्यान त्यांच्या लेखनातला सकस वाड्मयीन दर्जा त्यांना सोडून गेलेला होता.
गेल्यावर्षी दसर्याला पुस्तकपेठेच्या उद्घाटनाला ते आले होते. बर्याच गप्पा झाल्या. त्यांना लवकर घरी जायचं होतं, पण रिक्षा मिळेना. आनंद अवधानींनी आपल्या गाडीतून त्यांना घरी सोडलं. मीही सोबत होतो. मला आपलं घर दाखवून, हरी, येत जारे माझ्या घरी गप्पांना, असं ते म्हणाले. पण जाणं झालं नाही. तीच त्यांची शेवटची भेट ठरली.
तरूणपणी प्रागतिक असलेल्या मोठ्या कल्पक संपादकाची, ताकदीच्या लेखकाची आयुष्याच्या उत्तरार्धात झालेली ही जातीय गडावरची वाटचाल चटका लावणारी ठरली. ही शोकांतिका वयाची, व्यक्तीगत जीवनातल्या बदलत्या परिस्थितीची की कायापालट होत असलेल्या सामाजिक पर्यावरणाची?
- विनम्र आदरांजली.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment