टेल्कोच्या नोकरीतनं मला जी अतिशय अस्सल बावन्नकशी आणि अव्वल प्रतिभावंत माणसं मिळाली त्यात प्रमोदचं स्थान पहिलं होतं. प्रमोदचं जाणं माझ्यासाठी आरपार दु:खद आहे.
प्रमोद 24 तास 365 दिवस गडकिल्ल्यांमध्ये, आकाश दर्शनात आणि इतिहास संशोधनात रमलेला असायचा. आम्ही 21 वर्षे टेल्कोत एकत्र काढली. प्रमोद भीडभाड न ठेवणारा नी अतिशय स्पष्टवक्ता होता. कमालीचा मनस्वी. एखाद्याला स्विकारलं तर त्याच्यावर जीव ऒवाळून टाकायचा. चिडला तर मात्र मग खैर नाही. कोणतीही गोष्ट हात राखून करणं त्याला साफ नामंजूर होतं. आम्ही कंपनीत आठ तासाच्या काळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकत्र गप्पा मारत असू. वाचन, गप्पा, अखंड भ्रमंती हे जगणे. जेवायला जातायेताना तर आम्ही हमखास बरोबर असू. आम्ही दोघेही मुळचे वेल्डर कम गॅस कटर. त्यामुळंच बहुधा इतिहास नी वर्तमान हा भविष्याशी जोडायचा छंद दोघांनाही होता. तो आधी सोमवारात 15 ऑगष्ट चौकात एका खोलीत राहायचा.मी खुपदा त्याच्या घरी जायचो.
प्रमोद पहिल्यांदा शिवसैनिक होता. त्याच्या अतिव आग्रहाखातर मी एकदा त्याच्याबरोबर दसर्याला शिवाजी पार्कवरच्या शिवसेनेच्या मेळाव्यातले बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऎकायला सुद्धा गेलो होतो. छत्रपती शिवाजी राजे नी बाळासाहेब हे त्याचे विक पॉईंट.
तो अजमेरा कॉलनीत राहायला आला तेव्हा माझ्या अगदी शेजारच्याच इमारतीत राहायचा. तो नियमितपणे घरी सामना घ्यायचा. एकदा त्याच्या घरी गेलो असताना सामना दिसला नाही. मी म्हटलं कारे बंद केलास की काय सामना? म्हणाला,हो रे. दोन दोन पेपर परवडत नाहीत.
म्हटलं, दोन दोन कशाला घ्यायला हवेत?
तो म्हणला, अरे बाबा, आजकाल सामनातल्या बातम्या खर्या की खोट्या ते शोधायला दुसरा पेपर घ्यावा लागतो ना, त्यापेक्षा डायरेक्ट दुसराच घेतलेला काय वाईट?
प्रमोद तसा अतिशय फटकळ. शिवसेनेच्या गारूडातून लवकरच तो बाहेर पडला. शिवरायांच्या प्रेमात मात्र कायम आकंठ बुडालेला राहिला.
18 डिसेंबर 2016 ला त्याच्या वाढदिवसाला मी त्याच्या फेसबुकवर लिहिलं. त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला किती मनापासून आनंद झाला. तो त्यानं व्यक्तही केला. तो मला "माझा प्राचीन काळापासूनचा मित्र " असं म्हणायचा.
मी लिहिलं होतं,
"प्रमोद मांडेसर,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
जीवेत शरद: शतम!
एक जबरदस्त उत्साही आणि समर्पित माणूस आहेत मांडेसर. लय भारी.
मी त्यांना गेली 38 वर्षे ओळखतो.
तुमच्या बरोबर टेल्कोत शेकडो वेळा मारलेल्या गप्पा आज आठवतात.
सर, तुमच्या स्कुटरवर मागे बसून म.सा.प. निवडणुकीत केलेला प्रचार,प्रवास आठवतो.
करपे वाडा, 15 ऑगष्ट चौक ते अजमेरा कॉलनी येथील त्यांच्या घरी झालेल्या असंख्य भेटी स्मरतात.
बालगंधर्व कला दालनातील त्यांची शहीदांवरील प्रदर्शनं, अभ्यासपुर्ण भाषणं, जोरकस युक्तीवाद यांचा मला लाभ झालाय.
माझ्या अनेक कार्यक्रमांना, भाषणांना आवर्जून उपस्थित राहून त्यांनी दिलेली दाद मला बळ देऊन गेलीय.
किल्ले, ट्रेकिंग, शिवराय, सह्याद्री, तारांगण आदींचे चालतेबोलते विद्यापिठ म्हणजे मांडे सर. त्यांचे लेखन संदर्भमुल्य असलेले भरिव लेखन आहे.
त्यांच्याबरोबर एका साध्याश: ट्रेकला मला यायचंय, अशी इच्छा मी व्यक्त केल्यावर त्यांनी मला ट्रेकला नेले. पावसाळा, अमावस्येची भीषण रात्र, सह्याद्री, जमीन निसरडी आणि माझा पहिला ट्रेक सरांसोबत. लिंगाणा!
केवळ अविस्मरणीय.
चालताना साधारणपणे अडीच हजार वेळा घसरून आपटलो.
पुढची सहा महिने दररोज रात्री झोपलो की लिंगाण्यावरून मी खाली दरीत पडतोय अशी स्वप्नं मला पडत होती.
माझा आयुष्यातला तो पहिला ट्रेक
आणि अर्थातच शेवटचा. [ गंमत सोडा ]
मित्रा, यशवंत झालास, किर्तीवंत झालास. आणखी मोठा हो.
असा मित्र मला मिळाला, ज्याचा मला अभिमान वाटतो."
तेव्हा माहित नव्हतं, हा गडी आपल्याला असं मध्येच सोडून जाणार आहे.
मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. माझा मतदारसंघ खुप मोठा होता. प्रमोद अनेकदा त्याची स्कूटर काढायचा आणि मग त्याच्यासोबत मी प्रचाराला जायचो. मतदारांना भेटून तो ह्याला मत द्यायचं बरं का असं आग्रहानं सांगायचा. त्याचे शेकडो फॅन्स होते. एक माजी खासदार त्याचे चाहते होते. ते पहिलवान होते. स्टार्चचं धोतर, टोपी, कोल्हापुरी चपला, गंधाचा टिळा असा जोरदार मामला. या प्रचारादरम्यान त्यांची अचानक भेट झाली. प्रमोदनं त्यांची माझी ओळख करून दिली. निवडणुक म्हणताच ते म्हणाले, " तुम्ही एक काम करा. मतदारांची मला एक लिस्ट द्या. आपुण त्यांना उचलून डायरेक्ट आमच्या साखर कारखाण्याच्या गेस्ट हाऊसवर नायतर एखाद्या रिसॉर्टवर नेऊन ठेऊ. नरकेसर, काय काळजी करायची नाय. मांडेसाहेबांचे तुम्ही मित्र म्हणल्यावर म्या समदं इलेक्शान हातात घेतो मायला. आपल्याला लई अनुबाव हाय."
प्रमोद म्हणाला, " नाय नाय, तुम्ही यात पडू नका. हे वेगळं प्रकरण आहे. अशानं मामला बिघडून जाईल सगळा." ते नाराज झाले. म्हणाले, " काय राव. परचेसिंग नाय, टेंडर नाय, बजेट नाय असल्या फुसक्या इलेक्षणला तुम्ही लोकांनी उभारलाच कशाला?"
तो माझ्या भाषणांना आवर्जून यायचा. शिवाजी मराठामधल्या एका भाषणात मी शिवरायांच्या काही पत्रांवर बोललो होतो. महाराजांच्या एका पत्रात त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला कसे खडसावले होते त्याचा महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे त्याची चर्चा केली होती.
"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" असं महाराज सुनावतात हे संदर्भासहीत मी स्पष्ट केलं.
कार्यक्रम संपल्यावर प्रमोद मला म्हणाला, हरी, तू दिलेला संदर्भ बरोबर आहे. पण तुमच्याबाबतीत तुम्ही केवळ ब्राह्मण आहात म्हणून मी कसलीही सवलत देणार नाही, मुलाहिजा, पर्वा करणार नाही असं महाराज का म्हणतात? कारण त्याकाळात सामाजिक, राजकीय जीवनात ब्राह्मण म्हणून विशेष वागणूक मिळत असणार असं तुला वाटत नाही का?"
त्याचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म असायचं. तो जातीपातीच्या भावनेला मूठमाती दिलेला फार मोठ्या जिंदादिल मनाचा माणूस होता. वक्ता नी इतिहासकार होता.
प्रमोदनं लिहिलेली सगळीच पुस्तकं महत्वाची आहेत-
1. स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका,
2. गडकिल्ले महाराष्ट्राचे,
3. स्वातंत्र्य संग्रामातील समिधा,
4. स्वातंत्र्य संग्रामातील अंगार,
5. सह्याद्रीतील रत्न भांडार,
6. 111 क्रांतिकारकांचे संक्षिप्त जीवन.
प्रमोदचं वक्तृत्व अमोघ होतं. त्यानं हजारो भाषणं दिली.
अभ्यासकांची,ट्रेकर्सची, गडकिल्ले प्रेमींची पिढी घडवली. त्याला उत्तम स्मरणशक्ती लाभलेली होती. अर्थात सतत किल्ल्यांवर फिरण्यात आणि सह्याद्रीच्या भटकंतीत त्याच्या शरीराची खुप आबाळ झाली. तो बेदरकार असायचा. गडकिल्ले हाच श्वास होता.
माझी मुलगी प्रमिती लहान असताना एकदा प्रमोदसोबत सिंहगडावरील एका मोहिमेत सहभागी झाली होती. प्रमोदनं दाखवलेला किल्ला, रात्री घडवलेलं तारांगण दर्शन, त्याचं चित्रशैलीतलं इतिहास कथन यानं ती इतकी भारावून गेली की तिला त्या कार्यक्रमाच्या आठवणी एव्हढी वर्षे उलटून गेली तरी आजही लख्ख आहेत.
प्रमोद, लगा, तू फार मोठ्या ट्रेकला एकटाच पुढं निघून गेलास हे काय तू बरोबर केलेलं नाय गड्या! हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाय!
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment