Wednesday, October 18, 2017

दारू नी जुगारात सगळं गेलं-


खोपोलीला एसटी बस चहाला थांबली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यात अमाप खड्डे असल्यानं बहुतेक पॅसेंजरांची हाडं एव्हाना खिळखिळी झालेली होती. ते 1991 मधले दिवाळीचे दिवस होते. थकलेले प्रवासी खाली उतरले. दिवाळीच्या सुट्ट्या चालू असल्यानं गाडीला बरीच गर्दी होती. चहा पिताना माझ्या लक्षात आलं, समोरचा एक माणूस पुन्हापुन्हा माझ्याकडे बघत होता. मलाही त्याचा चेहरा परिचयाचा वाटत होता. पण नाव काही आठवत नव्हतं. त्याच्या चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढलेले होते. डोक्यावरचे केस अनेक महिने कापलेले नसावेत. त्याला तेलही लावलेले नसणार. मळलेला पायजमा, अंगातला शर्ट बर्‍याच ठिकाणी फाटलेला. एकूण अवतार कळकट्ट होता. त्यानं माझ्याजवळ येऊन थेट विचारलं, " काय मग ओळखलं का मला? अरे हरी, मी अण्णा. मुंढव्याच्या शाळेत आपण एका वर्गात होतो." आणि मला त्याची ओळख पटली. हा अण्णा एका बागायतदार कुटुंबातला होता. श्रीमंत असामी. त्याचं आजचं हे दारिद्र्य आणि आजार्‍यासारखा दीनवाणा चेहरा बघून मला कळवळायला झालं.
त्याच्या पेरूच्या बागांमध्ये आम्ही शनिवारी दुपारी शाळा सुटली की जाऊन पोटभर पेरू खायचो. त्याच्या फुलांच्याही बागा होत्या. तेव्हा मोगरा, गुलाब, झेंडू, तेरडा, गुलछडी तोडायच्या कामावर त्याच्याकडे अनेक मजूर असायचे. मीसुद्धा एखाद्या रविवारी सकाळी त्याच्या शेतात जाऊन रोजानं मोगरा तोडायचो. अनेक मुलं, बायका तिकडं काम करीत असत. दररोज किमान  चारपाच पोती मोगरा नी ही फुलं टेंपो किंवा ट्रकनं पुण्याच्या मार्केटला पाठवली जायची. मला मोगर्‍याचा तो घणदाट सुगंध फार आवडायचा. टोपलीभर मोगरा तोडला की त्याचे वीस पैसे मिळायचे. एकेकाळचा हा लक्षाधीश मित्र आज वीसेक वर्षांनी भेटला तो अशा विपन्नावस्थेत.
आमच्या दोघांच्या चहाचे पैसे मी दिले आणि आम्ही दोघेही बसमध्ये येऊन बसलो. त्याला ही गरीबी कशी काय आली हे मला त्याला विचारायचं होतं. पण तो मलाच कायकाय विचारत होता. त्यात हा प्रश्न विचारायचं जमतच नव्हतं.
मध्ये थोडी सापट सापडताच मी त्याला विचारलं, इकडं कुठं गेला होतास?
तो म्हणाला, आजारी असल्यानं ट्रीटमेंटसाठी टाटा हास्पीटलला गेलो होतो. मी चरकलो. इतक्या तरूण वयात त्याला कॅन्सर झाला असणार. खुपच वाईट वाटलं. माझ्याशी बोलत असताना
तो सारखा एस.टी.च्या सामान ठेवलेल्या जागेकडे बघायचा. त्या सामानाकडे, विशेषत: एका फाटक्या पोत्याकडं तो अधूनमधून बघतोय हे माझ्या लक्षात आलं. त्या पोत्याला बराच चिखल लागलेला दिसत होता. बोचकं चांगलं मोठं होतं. त्यात कायय एव्हढं? असं मी विचारल्यावर तो म्हणाला, माझे काही कपडे, औषधं आणि दिवाळीसाठी मुलांना घेतलेले फटाके नी थोडासा खाऊ आहे.
अण्णा, तुझी आर्थिक परिस्थिती तर चांगली होती रे, मग असं अचानक काय झालं?
तो, म्हणाला, काय विचारू नकोस. दारू नी जुगारात सगळं गेलं.
पुणे स्टेशनला एस.टी. पोचल्यावर आम्ही एसटीतनं उतरलो. त्यानं ते कळकट्ट बोचकं घेतलं नी तो मला हळू आवाजात म्हणाला, तू कुठं राहतोस. मी म्हटलं, कोथरूडला. तो म्हणाला मला खराडीला जायचंय. थोडं उलटं पडेल पण मी तुला सोडतो. मला काय कळेना, हा फाटका माणुस रिक्षानं जाणार आणि तेही मला कोथरूडला सोडुन त्याला परत पुणे स्टेशनला यावं लागणार. कारण नसताना रिक्षाचा खर्च वाढणार. मी म्हटलं, अरे नको. मला डायरेक्ट बस आहे. तू त्रास घेऊ नकोस अण्णा.
तू कसा जाणारेस? बसनं की रिक्षानं?
तो म्हणाला, पार्कींगमध्ये माझा ड्रायव्हर गाडी घेऊन आलेला असेल.
मी चकीत झालो. ड्रायव्हर, गाडी, मी ऎकतच राहिलो.
म्हटलं, लेका चेष्टा करतोस काय रे? तो म्हणाला, चल तुला गाडीत बसल्यावर सगळं खरं सांगतो.
त्याची टोयोटा घेऊन त्याचा ड्रायव्हर समोरच आला. आम्ही दोघं बसलो. ते पोतं अण्णानं जपून शेजारच्या सीटवर ठेवलं. मी म्हटलं, हे काय हिंदी सिनेमासारखं चाललंय तुझं?
तो म्हणाला, मी आजारीबिजारी काही नाहीये. दारूला मी शिवतही नाही नी जुगाराचा तर प्रश्नच नाही.
अरे, आपली सगळं फुलं आपण डायरेक्ट बॉम्बे मार्केटला पाठवतो. मी महिन्यातून एकदा वसुलीला जातो. टोटल कलेक्षन सातआठ लाखाचं अस्तंय. फाटके कपडे, वाढवलेली दाढी,केस, चिखलाचं पोतं हे बोचकं हे सारं नाटक करावं लागतंय बाबा. मागे एकदा टोयोटानं पैसे घेऊन येताना घाटात एका टोळीनं अडवून लुटलं. तेव्हापासून मी एसटीनंच मुंबईला जातोयेतो. पोत्यामुळं नी या फाटक्या मळक्या कपड्यांमुळं कोणालापण डाऊट येत नाही.
मला सांग, मी तुला हे सांगेपर्यंत तुला तरी डाऊट आला होता का? की अण्णा सात लाख रूपये या बोचक्यातून घेऊन चाललाय म्हणून?
मी म्हणलं, लगा पण माझी फिरकी घ्यायची काय गरज होती?
तो हसला नी म्हणला, बाबा, आजुबाजुचे पॅसेंजर ऎकत असतात आपलं बोलणं. फुगीरी लय म्हागात पडतीया. गरिबीनं राह्यलं की सेफ अस्तंय. येडा बनके पेढा खानेका. क्या? आणि त्यानं त्याच्या फाटक्या पायजम्याच्या खिशातनं पिस्तूल काढून माझ्या हातात दिलं. ते भलतंच वजनदार होतं.
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment