Sunday, October 15, 2017

पु.लं.नी मिळवून दिलं कार्ड-

माझ्या शालेय जीवनात मला लाभलेल्या चार शिक्षकांनी मला घडवलं. मुंढव्याच्या मनपा शाळेतले ल.रा. वाडेकर, पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयातल्या सौ.सुचेता श्रीकांत निंबवीकर, सौ.मालती माधव भाटे आणि कृ.पं. देशपांडे या चौघांचा माझं वाचनवेड वाढवण्यात फार मोठा वाटा आहे.
निंबवीकरबाई आम्हाला हिंदी शिकवायच्या. त्यांच्या घरी प्रेमचंद आणि इतर हिंदी लेखकांची मोठी ग्रंथसंपदा होती. त्या ती पुस्तकं मला वाचायला द्यायच्या. त्यांच्यामुळेच शाळेत असतानाच माझा आख्खा प्रेमचंद वाचून झाला होता.
भाटेबाई ईंग्रजीच्या तर देशपांडेसर मराठीचे. या भाषा शिक्षकांनी मला या तिन्ही भाषांची अपार गोडी लावली. यांनी सार्‍यांनी मला आपल्या पोटच्या मुलांसारखंच वाढवलं. मायेनं शिकवलं. संस्कार केले. खर्‍या अर्थानं माणूस म्हणून घडवलं.
भाटेबाई विश्रामबाग वाड्यातील शासकीय ग्रंथालयाच्या सदस्य होत्या. या ग्रंथालयात लाखो पुस्तकं आहेत आणि त्याचं सदस्यत्व मोफत मिळतं. त्यामुळे त्याला हजारोंची प्रतिक्षासुची असते. भाटेबाई त्यांचं कार्ड मला देत असत. या ग्रंथालयात बसून वाचण्याची उत्तम सोय होती. दररोज संध्याकाळी शाळा सुटली की मी तिथं जाऊन वाचत बसायचो. नोट्स काढायचो.
तिथले मुख्य ग्रंथपाल श्रीकृष्ण उजळंबकर हे स्वत: मोठे लेखक होते. ते नेहमी मला बघायचे. मी कोणती पुस्तकं वाचतोय त्याची विचारपूस करायचे. मला त्यांनी सभासदत्व द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. ते म्हणाले, आपण विद्यार्थ्यांना सभासदत्व देत नाही. पण मी खास बाब म्हणून तुला नक्की देईन. दोन महिन्यांनी मला भेट.
नंतर वार्षिक परीक्षेच्या गडबडीत त्यांना भेटता आलं नाही. मी त्यांना जेव्हा भेटायला आणि चौकशीला गेलो तोवर ते निवृत्त झाल्याचं मला सांगण्यात आलं. नव्या आलेल्या संचालकांना मी भेटलो. त्यांनी मला हुसकावून लावलं. माझं काहीएक ऎकुणच घेतलं नाही.
एकदा पु.ल.देशपांडे यांच्या भेटीत मी हा विषय त्यांच्या कानावर घातला. ते म्हणाले, त्यांना कायकाय कागदपत्रे हवीत त्याची माहिती घे नी मला सांग. तिकडे नोकरीचं प्रमाणपत्र हवं होतं. मी सकाळी कबरस्थानात आणि रात्रपाळीला एका पोल्ट्रीत काम करायचो. पण तिथले मॅनेजर म्हणाले, तू बालकामगार असल्यानं आम्ही अडचणीत येऊ. प्रमाणपत्र देता येणार नाही.
मी पु.लं. ना ही अडचण सांगितली. त्यांनी त्यांचे मित्र सुप्रसिद्ध उद्योगपती नंदा नारळकर यांना फोन केला. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून काम केलेलं असल्यानं नारळकर मला ओळखत होते. शिवाजीनगरचं महाराष्ट्र बॅंकेचं मुख्यालय आणि बालगंधर्व पुल ही बांधकामं केलेले नारळकर. त्यांनी त्वरीत तसं प्रमाणपत्र मला दिलं. पण नवे ग्रंथपाल म्हणाले, पार्टटाईम काम याला मी नोकरी मानत नाही. तुला सभासदत्व मिळणार नाही. चल निघ.
एकुणात खडूस माणुस. कार्पोरेशनमध्ये जकात कारकून व्हायच्या ऎवजी ग्रंथपाल झालेले असणार. मी फारच हिरमुसलो.
मात्र दररोज संध्याकाळी नियमितपणे त्या ग्रंथालयात बसून वाचन करीतच होतो. रात्री आठ वाजता ग्रंथालय बंद होत असे. तिथून शेवटी बाहेर पडणारे आम्ही दोघे असायचो. एक तिथले शिपाई सोनावणे आणि दुसरा मी. सोनावणे मांजरीला राहायचे तर मी साडेसतरा नळीवर हडपसरला. आम्ही दोघे सोबत गप्पा मारत मारत जायचो. सायकलने घरी पोचायला रात्रीचे 9:30 व्हायचे.
अलिकडेच सोनावणेंची भेट झाली. ते आता पार थकलेत पण त्यांनी मला बरोबर ओळखलं. मी कसली कसली जाडजाड पुस्तकं वाचायचो ते त्यांनी सोबत असलेल्या माणसांना सांगितलं.
सभासदत्व मिळवण्यासाठी मी केलेले उद्योग सोनावणेंच्या भाषेत पराक्रम त्यांनी मीठ मसाला लावून सगळ्यांना ऎकवला.

मी परत पु.लं.कडे गेलो. मग पुलंनी थेट राज्याच्या ग्रंथालय संचालक पुराणिकांना फोन केला. उत्तम वाचणार्‍या विद्यार्थ्यांना तुम्ही सभासदत्व देत नसाल तर मग ग्रंथालयाचा काय उपयोग? असं भाईंनी त्यांना सुनावलं.
पुराणिक भाईंना खुप मानत होते. त्यांनी तातडीनं सुत्रं फिरवली.
त्याच दिवशी सोनावणे मला सदाशिव पेठेतल्या माझ्या शाळेत येऊन भेटले. म्हणाले, आमच्या साह्यबांनी तुला ताबडतोब बोलावलंय. जेवत असशील तर हात धुवायला ग्रंथालयात घेऊन ये म्हणालेत. त्यांच्या **** बुडबुडे आलेत.
सोनावणेंसोबत मी लगेच गेलो. त्या साहेबांनी आधी मला खुर्चीत बसवलं. चहा मागवला. नविन कोरं सभासद कार्ड बनवून माझ्या हातात दिलं.
मला म्हणाले, अरे तुझी पुलंशी एव्हढी दोस्ती आहे हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? मला आमच्या डायरेक्टरसाहेबांनी किती झापलं माहिती आहे काय?
मी म्हणालो, अहो, तुम्ही माझं ऎकुणच घेत नव्हतात. मी तुम्हाला म्हणालो होतो की उजळंबकरसाहेब मला सभासदत्व देणार होते. पण तुम्ही मला हुसकलत. शिवाय माझं नोकरीचं सर्टीफिकेट पण तुम्ही फेकुन दिलंत.
ते म्हणाले, थोडक्यात वाचलो बाबा. नाहीतर तुझ्यामुळे माझी बदली पार भंडार्‍याला झाली असती.
त्यानंतर नेहमी ते माझी विचारपूस करायचे. आधीमधी चहाही द्यायचे. एकुण शासकीय ग्रंथालयात माझा वट वाढला होता.
मात्र ही केवळ पुस्तक वाचण्याच्या गोडीनं घडवलेली किमया होती.
मुदलात पु.लं.ची नी माझी भेट पुस्तकांनीच तर घडवली होती!
- प्रा.हरी नरके

{छायाचित्रात दिसत आहेत- सौ.सुचेता निंबवीकर आणि त्यांचे पती श्री. श्रीकांत निंबवीकर }



No comments:

Post a Comment