Saturday, April 25, 2020

संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - रा.स्व.संघ 8







संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - प्रा. हरी नरके , द वायर, मराठी 

सारे जग कोरोनाच्या दु:खात असताना काही चतुर मंडळींनी हीच वेळ साधायचे ठरवले. लोक जेव्हा चिंतेत असतात, दु:खात आणि तणावाखाली असतात, तेव्हा त्यांच्या त्या बेसावधपणाचा वापर करून आपला अजेंडा चतुरपणे पुढे रेटणे ही हिटलरची खासीयत होती. आपल्या देशातल्या गावठी हिटलरची चाल पण तशीच !


अरूण आनंद नावाचं एक उच्चभ्रू प्रस्थ आहे. ते ‘इंद्रप्रस्थ’ नावाची एनजीओ चालवतात. तिचे ते सीईओ आहेत. ते पत्रकारही आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा वरच्या वर्तुळात वावर असतो. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती होती. देशभरातील लॉकडाऊनमुळे ती लोकांनी घरातच साजरी केली. तर आनंद यांनी त्यानिमित्त एक व्हीडीओ प्रसारित केला व एक लेखही प्रकाशित केला. विषय – डा.आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशंसक होते, त्यांचे इतके प्रेम होते, की ते म्हणाले, संघ वाढवा, तुमच्याबरोबर मी निवडणुक युती करतो. संघाचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे जीव की प्राण. त्यातल्या एकाला तर त्यांनी आपल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, या पक्षाचे सचिव, निवडणूक प्रमुख आणि प्रवक्ता नेमले. संघाचे सुप्रिमो गोळवलकरगुरूजी आणि डॉ. बाबासाहेब यांच्या भेटीगाठींमध्ये खलबते होत असत. रणनिती ठरे. बाबासाहेब पुन्हापुन्हा संघाच्या शिबिरांना भेटी देत असत. संघाचे कौतुक करीत असत. त्यामुळे संघाचे लाडके बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा लाडका संघ असे घट्ट नाते होते. हे चित्र असे काही रंगवले गेले की आता बाबासाहेब हे संघाचे स्वयंसेवक होते, एव्हढेच सांगायचे बाकी राहिले.

संघाची एक कार्यपद्धती आहे. एकाचवेळी संघ अनेक आघाड्यांवर कार्यरत असतो. म्हणजे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक बाळ गांगल, भिडेगुरूजी, अरूण शौरी हे महात्मा फुले व बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्याचवेळेला दत्तोपंत ठेंगडी, भिकुजी इदाते, रमेश पतंगे संघ समरसतेच्या मनाचे श्लोक लिहित असताना बाबासाहेब आणि फुले यांच्या आरत्याही करीत असतात. त्याद्वारे त्यांना फुले-आंबेडकरांचे अपहरण करायचे असते. तिसरीकडे अफवा पसरवून घराघरात त्यांच्याबद्दल विद्वेशही पेरला जात असतो. अंगलट आलेच तर आम्ही तर त्यांची नावे प्रात:स्मरणीय म्हणून घेत असतो, असे सांगून सारवासारवही केली जाते.

३२ वर्षांपुर्वी बाळ गांगलांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकली. महाराष्ट्र संतापला. संघाने गांगलांचा आपला संबंध नाही, असे घोषित करून टाकले. माझ्या पहिल्या पुस्तकात मी गांगलांची मुलाखत छापलीय. तुम्ही फुल्यावर एव्हढे का संतापलात असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षापासून मी स्वयंसेवक आहे. फुले हा हिंदूराष्ट्राच्या स्थापनेतला मुख्य अडथळा आहे, त्यांच्यामुळे ब्राह्मणांचे पावित्र्य, महात्म्य, गारूड धोक्यात आले, हे संघाने मला पटवले, तेव्हापासून मी फुल्यांना शत्रू क्रमांक एक मानतो. भिडेगुरूजी म्हणतात फुले देशद्रोही होते. म्हणजे ज्याने ब्राह्मण्यावर टिका केली, तो देशद्रोही. एका वाहिनीवर बोलताना जाहीरपणे ते म्हणाले, ‘बाबासाहेब मनूला मानणारे होते. मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब जयपूरला स्वत: हजर होते.’ हा पुतळा जयपूरच्या उच्च न्यायालयात बसला १९८९ ला. डॉ. बाबासाहेब त्यापुर्वी ३३ वर्षे आधीच निधन पावलेले. इतके तर बुद्धीमान हे आंबापुत्र भिडेगुरूजी!

अरुण आनंद म्हणाले, ‘बाबासाहेब संघाचे प्रशंसक होते.’ बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले, ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
” May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. “[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]
“मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.”  हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले बाबासाहेबांचे उद्गार आहेत. हे आर.एस.एस.चे कौतुक आहे का?

आनंद म्हणाले, ‘बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाची १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात संघाचे पिल्लू असलेल्या जनसंघाबरोबर युती केली होती.’ १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-
“As regards other Political Parties, the Scheduled Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S.” [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]

“इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही.” तेंव्हा जनसंघाबरोबर युतीचा प्रश्नच उद्भवत नाही.

आता ही सगळी अस्सल आणि छापील साधने आहेत म्हणून तरी बरे, नाहीतर या लोकांनी काय हैदोस घातला असता माहित नाही.

आनंद यांनी दावा केला, की संघाचे दत्तोपंत ठेंगडी बाबासाहेबांचे लाडके होते. त्यांना बाबासाहेबांनी स्वत:च्या पक्षाचे सचिव नेमले. प्रचारप्रमुख नेमले. प्रवक्ता नेमले. आता आनंद यांनी एव्हढेच सांगायचे बाकी ठेवले की बाबासाहेबांनी ठेंगडींना आपला सर्वोच नेताच [बॉस] मानले.

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) या पक्षाची घटना छापील आहे. ती आम्ही "डॉबाआंलेभा" मालिकेच्या १७ व्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित केलेली आहे. या घटनेनुसार तीच व्यक्ती पक्षाचा सदस्य वा पदधिकारी होऊ शकते, जी अनुसुचित जातीची आहे. ठेंगडी काही अनुसुचित जातीचे नव्हते. शिवाय दुसर्‍या संघटनेचे सभासद असलेल्या व्यक्तीला ‘शेकाफे’चे दरवाजे बंद होते. ठेंगडी या काळात संघाचे, इंटक व रेल्वे व पोस्टल युनियन [कम्युनिस्ट] यांचे पदाधिकारी होते. आता अशा माणसाला नियमाप्रमाणे मुदलात ‘शेकाफे’चा सदस्यच होता येत नव्हते. पदाधिकारी तर फार दूरची बात.

आनंद म्हणतात, ‘बाबासाहेबांनी संघाच्या पुण्यातील शिबिरांना दोनदा भेटी दिल्या, तिकडे बाबासाहेब जेवले, त्यांनी संघाचे कौतुकही केले. इ. इ.’ बाबासाहेबांच्या या भेटीची छायाचित्रे, पत्र्यव्यवहार, त्याच्या बातम्या यांची कात्रणे यातले काहीही संघातर्फे पुरावा म्हणून दिले गेलेले नाही. १९२७ पासून बाबासाहेब जिथे जिथे जात तिथल्या बातम्या त्यांच्या ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये छापल्या जात. संघाच्या शिबिरांना बाबासाहेबांनी जर खर्‍याच भेटी दिल्या असत्या, तर त्याच्या बातम्या निदान ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये तरी आल्याच असत्या ना? अशी कोणतीही बातमी आलेली नाही. संघाचे आणि केसरीचे गुळपीठ होते. बाबासाहेब याच काळात लोकमान्य टिळकांच्या मुलाला श्रीधरला भेटत असत. त्यांचा पत्र्यव्यवहार आहे, बातम्या आहेत, मग संघाच्या भेटीच्या बातम्या निदान केसरीत तरी यायला हव्या होत्या. संघाला मानणारी या काळात निदान डझनभरतरी पुणेरी वर्तमानपत्रे होती. त्यातही खबरबात नाही, असे का? संघाने या भेटींचे पुरावे द्यावेत, ते तपासून ठरवू.

आनंद म्हणतात, ‘संघसुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले आणि त्यांना बाबासाहेब म्हणाले संघ वाढवा.’ प्रत्यक्षात काय घडले होते?

मराठ्यांना रोखण्यासाठी मदत मागायला आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले होते हे खरे आहे. बाबासाहेब तेंव्हा देशाचे कायदा मंत्री होते. मंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. गुरूजी भेटले. त्यांनी मदत मागितली, सहकार्य मागितले, पण रा.स्व. संघ हा " विषवृक्ष" आहे असे, सांगत बाबासाहेबांनी सहकार्य नाकारले.

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन ते बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले होते.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. “पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत, ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवाईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मण राज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही,” अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब – गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री, हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जात-येत असत. गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, “हे ब्राहमण गृहस्थ, हिंदूंचे पोप आहेत. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!” { पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५} या भेटीची जनतामध्ये बातमीही प्रकाशित झाली होती.

चातुर्वर्ण्याची प्रस्थापना आणि संवर्धन करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील? दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषय पत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

बरं याच काळात संघाचे काय उद्योग चालले होते, तर संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत घुसले होते.

शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून, हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? यालाच हे संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब यांचा ते सन्मान करीत होते असे म्हणतात का?

(वाचा-) “संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले, की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात.” (संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९)

सुर्यवंशी नावाच्या एका संघ स्वयंसेवकाने लिहिले आहे, की बाबासाहेब घटना सभेत निवडून यावेत यासाठी जनसंघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणले. किती सराईतपणे खोटे बोलतात हे संघीय. मुदलात श्यामाप्रसाद यांनाच काँग्रेसने निवडून आणले होते. त्यांचा अन्य कुणीही सदस्य नव्हता. बाबासाहेब प्रथम निवडून आले, ते बंगालमधून. जोगेंद्रप्रसाद मंडल हे बाबासाहेबांचे तिथले आमदार होते. त्यांनी बाबासाहेबांना घटना परिषदेवर निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. पुढे बाबासाहेबांचा हा मतदार संघ पाकीस्तानात गेल्याने बाबासाहेबांचे सदस्यत्व गेले. पण पुण्याचे बॅ. जयकर हे काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांनी उभे राहावे अशी विनंती राजेंद्र प्रसाद व वल्लभभाईंनी त्यांना केली. याकाळातील सगळा पत्र्यव्यवहार उपलब्ध आहे. ही गोष्ट आहे, जुलै १९४७ ची. तेंव्हा जनसंघ नव्हताच, आणि त्यामुळे त्यांचा कोणी सदस्यही नव्हता.

खुद्द माझ्याबद्दलसुद्धा या सूर्यवंशींनी काही भन्नाट शोध लावलेत, म्हणे मी संघाच्या कार्यक्रमांना गेलो आणि तिथे संघाचा गौरव केला. साफ खोटे. मी आजवर संघाच्या एकाही कार्यक्रमाला गेलेलो नाही. गौरवाचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही.

माझे महात्मा फुल्यांवरील [ संघाच्या बाळ गांगलचा प्रतिवाद करणारे ] पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला माझ्या पिंपरीच्या घरी नवले नावाचे एक गृहस्थ भेटायला आले. ते म्हणाले, महात्मा फुले शताब्दी निमित्त आम्ही मुंबईत एक वैचारिक चर्चासत्र घेतोय, तुम्ही फुल्यांवर पेपर वाचा. मी गेलो. पेपर वाचला. आयोजक संस्थेचे नावही तोवर मी ऎकलेले नव्हते. त्यांनी त्याची पुस्तिकाही छापली आहे. माझा पेपरही त्यात आहे. पुढे त्यांनी असेच दुसरे चर्चासत्र नाशिकला घेतले. तिथेही मला बोलावले. मी म. फुल्यांवर बोललो. मात्र तेंव्हा मला संशय आला. मी खोदून खोदून माहिती काढल्यावर कळले, की ‘समरसता मंच’, या नावाने वावरणारी ही मंडळी संघाशी संबंधित आहेत. माझ्यापासून खरी माहिती दडवून ठेऊन माझी फसवणूक केल्याबद्दल मी त्यांना फटकारले आणि त्याउप्पर त्यांना माझ्या दारातही उभे केले नाही, या गोष्टी फुले शताब्दी वर्षातल्या म्हणजे ३० वर्षांपुर्वीच्या आहेत.

आता तर हे लोक माझ्याच तोंडात संघाचे मी कौतुक केल्याचे शब्द घुसवू लागलेत! या खोटारडॆपणाचा, बुद्धीभेद अभियानाचा आणि फुले-आंबेडकरांचे अपहरण करण्याच्या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो. मी संघाशी संबंधित असतो, तर संघाचे सरकार महाराष्ट्रात असताना राज्य शासनाच्या मागासवर्ग आयोग, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती, भाषा सल्लागार समिती, बालभारती, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन, या सर्व संस्थामधून देवेंद्र फडणवीस सरकारने मला काढून टाकले असते काय?

प्रा. हरी नरके, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’, या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.

रविवार विशेष  April 26, 2020 12:43 am

https://marathi.thewire.in/rss-fake-story-and-dr-babasaheb-ambedkar

No comments:

Post a Comment