लहानपणी शाळकरी वयात मी राष्ट्र सेवा दल, महात्मा फुले समता प्रतिष्ठान व डॉ. बाबा आढाव यांच्यामुळे २८ नोव्हेंबरला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीला गंज पेठेतील फुले वाड्यावर जायचो. तिथं आम्ही इतके कमी लोक असायचो की सगळे मिळून २५ लोकही नसायचे. पुणेकरांना स्मृतीदिनीही जोतीरावांची आठवण होऊ नये याचं मनस्वी दु:ख व्हायचं. हे चित्र आपण बदललं पाहिजे असं वाटत राहायचं. मुंबईला चैत्यभुमीवर ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी उसळलेला जनसागर बघून खूप बरं वाटायचं. नागपूरलाही दिक्षाभुमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनी अशीच गर्दी ओसंडून वाहायची. १४ एप्रिलला पुणे स्टेशनला असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती थवेच्या थवे असायचे. मग फुले वाड्याच्या बाबतीतच उदासिनता का? असा प्रश्न पडायचा. आज मी किमान एव्हढं तरी सांगू शकतो की महात्मा फुले समता परिषदेच्या नेत्यांना मी २७ वर्षांपुर्वी पहिल्यांदा फुले वाड्यावर घेऊन गेलो आणि त्यानंतर दरवर्षी ही उपस्थिती वाढते आहे. आता पुरोगामी चळवळीतल्या बर्याच नेत्यांना वाड्यावर जाऊन यायला हवं असं वाटू लागलंय. आज २८ नोव्हेंबरला काही हजार लोक वाड्यावर अभिवादनाला येत असतात. फुले यांची जयंती का होत नाही हाही प्रश्न मला छळायचा. ३० वर्षांपुर्वी तुमच्यापैकी कोणाला महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम झाल्याचे आठवतेय? नाही ना? अहो, होतच नव्हती तर आठवणार कुठून?
ही प्रथा आधी नव्हती. महात्मा फुले जयंती साजरी करण्याची ही पद्धत अगदी अलिकडे निर्माण केलेली आहे. हा स्फुर्तीदायक उपक्रम सुरू करण्यासाठी गेली ३० वर्षे केलेली धडपड फळाला आलेली बघताना मनस्वी आनंद होतो.
पण त्यासाठी किती रक्त आटवावं लागलं माहितीय? आपल्या देशात एखादी चांगली गोष्टही रुजवायला किती काळ जावा लागतो! त्यासाठी धडपडणारी व्यक्ती अगदी थकून जाते. बर्याचदा नाउमेद होते. निराश होते. पण चिकाटी असेल तर यश मिळतेच.
महात्मा जोतीराव फुले यांच्या महत्वाच्या चरित्रकारांपैकी म्हणजे, पंढरीनाथ सीतराम पाटील, धनंजय कीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.भा.ल. भोळे, प्रा.य.दि. फडके, प्रा.मा.गो. माळी, बा.ग. पवार, प्रा. गजमल माळी यातल्या कोणाच्याही पुस्तकात महात्मा फुलेंची जन्मतारीख दिलेली नाही. त्यांचं १८२७ हे जन्मवर्ष फक्त माहित होतं. तारीख सापडतच नव्हती.
महात्मा फुले यांची जन्मतारीख माहितच नसल्यानं ती पुस्तकात लिहिणार तरी कशी? आणि कुठून?
या महात्म्याचं महापरिनिर्वाण २८ नोव्हेंबर १८९० ला झालं. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी किंवा स्मृतीदिन २८ नोव्हेंबरला गंभीरपणे पाळला जायचा. जिभेला, लेखणीला वळण पडल्यामुळे पत्रकार मित्र स्मृतीदिवस साजरा झाला असं लिहीतात, म्हणतात, जे चुकीचं आहे. स्मृतीदिवस हा दु:खाचा, शोकाचा असतो तो साजरा कसा करणार? तो गंभीरपणे पाळला जातो. असो.
१९६९ साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि प्रा. स.गं. मालसे यांनी महात्मा फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२८ ला झाला असावा अशी एक शक्यता वर्तवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चाही केलेली होती. तथापि यात एक अडचण होती. फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले यांचे जन्मवर्ष १८२७ दिलेले असल्यानं १८२८ ची ही नोंद सदोष वाटत होती. पटत नव्हती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक मार्च १९८९ मध्ये पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. त्यातून सत्यशोधक कमलताई विचारे यांच्याशी माझा परिचय झाला. थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्या त्या सुनबाई. केशवराव सत्यशोधक समाजाचे महाध्यक्ष होते. मी त्यांचं समग्र साहित्य प्रकाशित केलेलं आहे. त्यांनी दुर्मिळ पुस्तकांचा मोठा संग्रह केलेला होता. त्यात आणि इतर असंख्य पुस्तकात मी जोतीराव फुले यांच्या जन्मतारखेचा शोध घेत होतो. अर्काइव्हज, [पुराभिलेखागार], सगळी महत्वाची ग्रंथालये, प्राचीन दस्तावेजांचे संग्रह पालथे घालूनही हाती काही मिळत नव्हतं. मात्र शेवटी विचार्यांच्या कागदपत्रांमध्ये कित्येक महिने शोध घेतल्यानंतर मला हा खजिना सापडला.
१८९१ साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे पहिलं चरित्र मला त्यात मिळालं.
स्मृतीशेष कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र. ते जोतीरावांचे निकटचे मित्र, सहकारी आणि मित्र होते. त्यामुळे हे पुस्तक अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
पानसर्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. ते आपलं नाव भलं मोठं लांबलचक लिहित असत. " महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील."
तर या फुले चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची जन्मतारीख ११ एप्रिल १८२७ ही दिलेली सापडली. महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण माझ्यासाठी अक्षरश: युरेका ! युरेका! असं ओरडण्याचा सुवर्णक्षण होता. आता जयंती सुरू करायची आणि ती रुजवायची, तिला खतपाणी घालून ती वाढवायची असा मनाशी निश्चय केला. कामाला लागलो.
गुरूवर्य डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर, प्रा.गो.पु. देशपांडे या सार्यांशी त्याबाबत बोललो. खात्री करून झाल्यावर त्यांची मान्यता, पाठींबा मिळवला आणि मगच तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांना मी पत्र लिहिलं. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करावा लागला. शासकीय खातरजमा करण्यात बराच वेळ गेला.
महात्मा फुले यांच्या या जन्मतारखेबाबत मी म. टा., तरूण भारत आणि इतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये
डझनावरी लेख लिहिले. व्याख्याने व भाषणांमधून या जन्मतारखेबद्दल बोलत राहिलो. एकच ध्यास फुले जयंती रूजली पाहिजे.
या जन्मतारखेबाबत शासकीय समितीच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली. शासकीय मान्यता मिळवली.
मग तातडीनं सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही जन्मतारीख नोंदवली. मुख्य म्हणजे विधानभवनातील महात्मा फुले पुतळ्याखाली ही नोंद करून घेतली. फुल्यांच्या राज्यभरातील सर्वच पुतळ्यांखाली फुल्यांची ही जन्मतारीख लिहिली जाईल यासाठी प्रयत्न केले.
महात्मा फुले यांची शासनस्तरावर तोपर्यंत मान्यता पावलेली रंगीत तैलचित्रं चुकीची होती. भडक होती.
गोपीनाथराव पालकर, डॅा. बाबा आढाव आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांचा १८८४ चा फोटो मिळवण्यात आला. हा फोटो १९२७ पासून लोकांना माहित होता पण त्यात चित्रकाराच्या चुकीनं फुल्यांना दाढी चिकटवण्यात आलेली होती. पालकरांकडील काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो उत्तमप्रकारे विकसित करण्यात आम्हाला यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. विशेषत: प्रा. गजानन शेपाळ आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे व्यवस्थापक सय्यदसाहेब यांचा नामोल्लेख करायला हवा. त्या फोटोला शासनाची मान्यत मिळवण्याच्या कामी श्री छगन भुजबळ यांचे सहाय्य झाले. २८ नोव्हेंबर १९९३ ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली.
सदर फोटो हजारोपट मोठा करून आम्ही महात्मा फुलेवाड्यात बसवला. त्याच्या आधारे दर्जेदार तैलचित्रे बनवून घेऊन ती फुलेवाडा व नायगावला सावित्रीबाईंच्या स्मारकात लावली.
सातत्याने गेली ३० वर्षे चिकाटीनं पाठपुरावा आणि धडपड, प्रयत्न केल्यानंतर आता कुठं महात्मा फुले जयंती बर्याच ठिकाणी साजरी होऊ लागलेली आहे. ती गावपातळीवर रूजायला हवी.
यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला सर्वांना ती घरातच साजरी करायची आहे. १८९७ च्या प्लेगच्या साथीत रूग्णांना औषधोपचार करताना सावित्रीबाई शहीद झाल्या होत्या. त्या साथीतील शासकीय उपचार कार्याचे छायाचित्र फे.बु. वर अलिकडॆच उपलब्ध झालेले असून ते सोबत जोडलेले आहे.
फुले जयंती धांगडधिंगा, नाचगाणी, फ्लेक्स, डि.जे., उन्मादी जल्लोश, नाचतमाशे असल्या ओंगळवाण्या पद्धतीनं होऊ नये. ज्ञानार्जन, शैक्षणिक उपक्रम, प्रबोधन, संवाद, जनजागरण, साहित्य, कला यांच्या माध्यमातून ही जयंती जनसामान्यांसाठी एक राष्ट्रीय सणउत्सव म्हणून संस्मरणीय व्हायला हवी अशी तीव्र इच्छा आहे. ११ एप्रिल महात्मा फुले जयंती व १४ एप्रिल डॉ. बाबासाहेबांची जयंती संयुक्तरित्या रूजवण्याच्या कामी माझे सन्मित्र डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यामाध्यमातून आम्ही प्रयत्न केले. ते यवतमाळचे जिल्हाधिकारी असताना समतापर्व म्हणून ११ ते १४ एप्रिल आम्ही साजरा करू लागलो. हे समतापर्वही आता तिकडे रूजले आहे.
एकुण काय? बहुजन समाजात एखादं चांगलं काम रुजायलाही खुप काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो. न थकता चिकाटीनं, चिवटपणानं ते करावं लागतं. पण होतं.
आज आपण पाहतोय की प्रतिगामी शक्ती नानाविध अंधश्रद्धा, रूढी, व्रतवैकल्यं, जयंत्या, पुण्यतिथ्या, पुजा, यात्रा, यज्ञ यांच्याद्वारे बहुजन समाजाला गुंगीचं औषद देत आहेत. बलुतेदार - अलुतेदारांना वापरून घेत अहेत. वापरून नंतर फेकूनही देत आहेत. त्यांना माहित आहे की त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी ही उपक्रमशीलता अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते प्रचार, प्रसार, इव्हेंट, पीआर २४ बाय ३६५ राबवत असतात. त्या छावणीत वर्णवर्चस्वावर आधारित उतरंड असते. आदेशावर चालणारे नंदीबैल असतात. स्वकीय, स्वजात, स्वधर्म आणि वरिष्ठ यांच्यासाठी सर्वप्रकारचा त्याग करायची सराईत मानसिकता त्यांनी घटऊन, बिंबवून घेतलेली असते. शेतकरी बैलांचा आंड ठेचतात तशी यांची विवेकबुद्धी ठेचलेली असते. स्त्रिया, अल्पसंख्याक आणि मागास जनसमुह यांच्याप्रती नफरत, देव, धर्म, देश आणि आपदधर्माच्या नावावर सर्व प्रकारचे गुन्हे करायची तयारी, धादांत खोटे बोलण्याचे प्रशिक्षण आणि कावेबाजपणा यांच्या जोरावर हे विषाणू फोफावत असतात. नासक्या आंब्यातले रेशीमकिडे सर्व मोक्याच्या जागा अडऊन बसलेले असल्याने त्यांची बाजू असत्याची, अन्यायाची, कालबाह्य असूनही त्यांचीच सरशी होताना दिसते आहे.
आमच्या पुरोगामी छावणीत बुद्धीमान नेते आहेत. तळमळीचे कार्यकर्ते आहेत. या बाजूला विचार आहे, सत्य आहे, अनुकूल काळही आहे. पुर्वजांचा अतुलनीय त्याग आहे. एव्हढं सारं असूनही पुरोगामी शक्तींची पिछेहाट का होतेय? आम्ही कळकळ, चिवटपणा, सातत्य यात कमी पडतोय का?
माझ्या एका दिवंगत मित्रानं कठोर, कटू आणि अप्रिय वाटेल असं भाष्य पुरोगामी चळवळीवर केलं होतं. तो म्हणतो, " या समतावादी छावणीतील नेत्यांचे इगो आणि त्यांची तत्वनिष्ठा भीषण टोकदार असल्यानं प्रत्येकाला स्वत: सॊडून बाकी सारे तत्वभ्रष्ट वाटतात. उगवलं तर माझ्याच कोंबड्यानं उगवावं, सारं श्रेय मला एकट्याला मिळावं. तसं होणार नसेल तर मग अंधारच राहिलेला बरा. स्वकीय छावणीतील एकमेकांविषयीचा अविश्वास, स्वजनांवरच आगपाखड करणारी मनोवृत्ती, एकीऎवजी फुटीकडेच जास्त कल, लढण्याच्या कोरड्या वल्गना, फक्त गमजा, आणि भाबड्या चर्चा यांनी प्रागतिक छावणी बरबटलेली आहे. या चळवळीतही "डिकास्ट !" झालेली जातीची उतरंड आहे. उच्च जातीतले बुद्धीवादी, नेते इतके आढ्यताखोर असतात की त्यांना वाटते मी खालच्यांना दाद दिली, त्यांच्या कामाची दखल घेतली तर ते शेफारतील, वाया जातील. त्यामुळे मी त्यांच्यावर सतत हल्लेच करायला हवेत, त्यांना मी नाक मुरडतच राहाणं गरजेचं आहे. ते इतके आत्मकेंद्रीत असतात की फेसबुकवरसुद्धा ते खालच्यांची दखल घेणं हराम मानतात.( यालाही अपवाद आहेत, असतात..)" मला ही टिका अतिशयोक्त वाटते. काही प्रमाणात अन्यायकारकही वाटते. पण ती तथ्यहीन नक्कीच नाही. आम्ही आत्मपरीक्षण करायलं हवं.
आमजनता पोकळीत जगू शकत नाही. तिला भरीव असे समतावादी पर्याय द्यावे लागतात. शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंत्या, स्मृतीदिन हे प्रागतिक उपक्रम आहेत. दुर्दैवाने काही मोजक्यांचा अपवाद वगळता आम्हा पुरोगाम्यांकडॆ आहे अतोनात निष्क्रियता. त्यामुळेच आम्ही उपदेशाचे डोस पाजतो, टिकेच्या पिचकार्या उडवतो आणि आत्मनाशाची ओढ असल्यानं दिवसेंदिवस निष्प्रभ होत जातो.
-प्रा. हरी नरके, १० एप्रिल २०२०
............................................
संदर्भ सुची :
*** महात्मा जोतीराव फुले यांचे १८८४ सालच्या अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र
१. महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील, महात्मा फुले यांचे अमर जीवन,१८९१, हे पुस्तक आम्ही, संपादक-प्रा हरी नरके, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३, २०१९ यात समाविष्ट करून अभ्यासकांना उपलब्ध करून दिलेले आहे.
२. संपादक- प्रा हरी नरके, महात्मा फुले - समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
३. संपादक- प्रा हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
४. संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३,२००६,
५. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००६, २०१९
६. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७
No comments:
Post a Comment