Sunday, April 12, 2020

महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता आणि संपादक प्रा.हरी नरके








महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता- प्रा. केदार काळवणे

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे समताकेंद्री आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. ते सामाजिक क्रांतिकारक,समाजशिक्षक,सर्जनशील लेखक आणि कृतिशील विचारवंत होते.प्रस्थापित परंपरागत व्यवस्थेविरूध्द रचनात्मक विद्रोही भूमिका घेणारे आणि सनातनशास्र मोडीत काढत नव्या समाजव्यवस्थेची मागणी करणारे थोर समाजसुधारक म्हणून त्यांचे कार्य अक्षर ठरलेले आहे.शोषित समूहांचे नायक म्हणून त्यांनी लढलेले सामाजिक युध्द समानतेचे मूल्य रूजवण्यासाठी मोलाचे ठरले आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेल्या आजच्या सर्व प्रकारच्या लोकशाहीची बीजभूमी ही एकोणिसाव्या शतकातील महात्मा फुले यांचे ऐतिहासिक क्रांतिकार्य हीच आहे.

या क्रांतिकार्याला अनेकविध पैलू आहेत.जातवर्णवर्गस्रीदास्यमुक्तीसाठीचा संघर्ष,धर्मचिकित्सेतून नवधर्मतत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी आणि पर्यायी संस्कृती निर्माणाची पायाभरणी करणारे इहवादी समाजचिंतक म्हणून हे कार्य मानवतेचा परीघ व्यापक करणारे ठरलेले आहेत.त्यांचे जीवन,कार्य आणि साहित्य यात कमालीची एकवाक्यता-एकरूपता होती.म्हणूनच हे लेखन महत्त्वाचे ठरलेले आहे. सार्वकालिक जीवनतत्त्वे आणि वैश्विक मूल्यांचे प्रकटीकरण,समकालीन सामाजिक वास्तवाची जनकेंद्री अभिव्यक्ती,तत्कालीन शोषणाची सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्षात परखड मीमांसा,इतिहास व वर्तमानाचा विवेकवादी अन्वयार्थ,वाचकांवर वैचारिकतेचा सखोल संस्कार करणारे,लेखक व वाचकांना प्रेरक ठरणारे,लेखन परंपरा निर्मिणारे आणि बहुसंख्यांच्या लोकभाषेचा माध्यम म्हणून वापर या कारणांनी हे लेखन अभिजात ठरलेले आहे.त्यांचे सर्व लेखन‘महात्मा फुले समग्र वाड्मय’या ग्रंथात उपलब्ध आहे.

महात्मा फुले यांच्या समग्र वाड्मयाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे १९६९ साली प्रथम प्रकाशन झाले होते.धनंजय कीर व स.गं.मालशे त्याचे संपादक होते.मंडळाच्या वतीने सहा आवृत्त्या प्रसिध्द झालेल्या आहेत.या संपादनात य.दि.फडके यांचाही मोलाचा वाटा आहे.’तृतीय रत्न ‘(१८५५)हे मराठीतले पहिले आधुनिक नाटक,‘पवाडा:छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा’ (१८६९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले बहुजनवादी मराठी काव्यचरित्र,सांस्कृतिक शोषणाची मीमांसा करणारे ब्राम्हणांचे कसब(१८६९) व गुलामगिरी (१८७३) हे गद्यलेखन;भारतीय शेतकर्यांचा आक्रोश प्रथमच मांडणारा‘शेतकर्याचा असूड’(१८८३) हा कथा-निबंधात्मक ग्रंथ आणि सत्य व नितीवर आधारलेल्या वैश्विक धर्माचे तत्त्वज्ञान विशद करणारा‘सार्वजनिक सत्यधर्म’ (प्रकाशन:१८९१)या तत्त्वज्ञान ग्रंथासह अखंडात्मक काव्यरचना व इतर उपलब्ध लेखनाचा अंतर्भाव या समग्र वाड्मयात केलेला आहे.

हे वाड्मय मराठी साहित्यातले अक्षर साहित्य आहे.बहुजनांचे क्रांतिविज्ञान त्यातून साकार झाले आहे.भारतीय शोषित समूहाच्या आवाजाचे अनेकविध स्वर नि स्तर-अस्तर त्यामधून उजागर झाले आहे.जागतिक वाड्मयातही या लेखनाचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित झाले आहे.गेल्या पन्नास वर्षात या ग्रंथाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या.१९९१ साली महात्मा फुले स्मृतीशताब्दी निमित्ताने काढलेली य.दि.फडके संपादित आवृत्ती विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.त्यावेळी पु.ल.देशपांडे, गोविंद तळवलकर,राम बापट,डाॅ.श्रीराम लागू, ना.धो.महानोर,शंकरराव खरात,रा.चिं.ढेरे यांनी रांगेत उभे राहून हा ग्रंथ विकत घेतला होता.२००६ साली निघालेली आवृत्तीही हातोहात संपली.या ग्रंथाची मागणी होत होती.ती मागणी १२ वर्षानंतर २०१८ साली पूर्ण झाली.

महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या समग्र वाड्मयाची सुधारित आवृत्ती २०१८ साली प्रसिध्द झालेली आहे.ही समितीची प्रथमावृत्ती आहे.८६२ पृष्ठांच्या या आवृत्तीचे साक्षेपी संपादन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या लेखन-विचाराचे अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी केलेले आहे.ही आवृत्ती अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे.जवळपास दोनशे पृष्ठांचा अलक्षित व दुर्मिळ मजकूराचा समावेश या आवृत्तीत केलेला आहे.तो फुले अभ्यासक-वाचकाला उपयुक्त ठरणारा आहे.

यात यशवंत फुले यांनी लिहिलेले महात्मा फुले यांचे आद्य चरित्र,त्यांची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी कमिशनर म्हणून केलेले काम, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज,महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार,विश्राम रामजी घोले,केशवस्वामी व्यंकय्या अय्यावरू,रत्नाम्माबाई अय्यावरू यांनी महात्मा फुले यांच्या लेखन आणि कार्यासंबंधी दिलेले अभिप्राय,त्यांच्या मूळ लेखनाच्या प्रस्तावना आदी लेखन समाविष्ट केलेले आहे.या ग्रंथाला प्रा.हरी नरके यांनी एकतीस पृष्ठांचे चिकित्सक संपादकीय लिहिलेली आहे.महात्मा फुले यांच्या समग्र कार्य आणि लेखनाचा अर्करूपी गाभी तीमधून विशद झाला आहे.महात्मा फुले यांचे कार्य समजून घेताना हे संपादकीय मोलाचे ठरते.महात्मा फुले यांच्या कार्याची महत्ता तीमधून ध्वनित झालेली आहे.

प्रा. नरके पहिल्या आवृत्तीपासून या ग्रंथाशी संबंधीत आहे.तसेच त्यांनी महात्मा फुले यांच्या संबंधीचे मौलिक संशोधनही केलेले आहे.त्यामुळे ही आवृत्ती त्यांनी अधिक परिपूर्ण करत अद्यावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.महात्मा फुले यांचे आजपावेतो उपलब्ध असणारे ललित-वैचारिक समग्र लेखन,महत्त्वाचा पत्रव्यवहार, त्यांच्या कार्यासंबंधीची विविध कागदपत्रे,विविध ग्रंथाच्या प्रस्तावना,मूळ छायाचित्रे, तत्कालीन वर्तमानपत्रातील बातम्या, महात्मा फुले यांचा जीवनपट, संदर्भ टीपा,निवडक शब्दांचा कोश आणि संदर्भ सूची यांचा समावेश या ग्रंथात असल्याने हा ग्रंथ परिपूर्ण वाटतो.

महात्मा फुले समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व साहित्य या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे.ही सामग्री विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना साह्यभूत ठरणारी आहे.हा ग्रंथ इतिहास लेखनाचे विश्वसनीय साधन आहे.या आवृत्तीत समाविष्ट केलेला ऐवज ऐतिहासिक दस्तावेज आहे.प्रा.नरके यांनीच महात्मा फुले यांची खरी जन्मतारीख आणि खरे छायाचित्र शोधून काढलेले आहे.महात्मा फुले यांच्या कार्य-लेखनाचा प्रचार-प्रसार मागील तीस वर्षात त्यांनी सातत्याने केलेला आहे.त्यांच्याच प्रयत्नातून महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय  इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, उर्दू, गुजराती अशा तेरा भाषेत अनुवाद  झालेले आहे.इतर नऊ भाषेतील अनुवादाचे काम सुरू आहे.म्हणून त्यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत आवृत्तीला मूल्य प्राप्त झालेले आहे.
   

महात्मा फुले यांचे समग्र लेखन हे विषमतामुक्त समाजनिर्मितीचे तत्त्वज्ञान आहे.‘माणूस’आणि त्याच्या लौकिक सुखाचा शोध या लेखनाने घेतलेला आहे.मानवमुक्तीचा जाहिरनामा म्हणून हे लेखन महत्त्वाचे आहे. श्रेष्ठ मानवी मूल्यांचा जागर या लेखनाने घडविलेला आहे.समकालीन सामाजिक वास्तव आणि इतिहासगत सांस्कृतिक संघर्ष या लेखनातून समोर आलेला आहे.सामाजिक समताविचार हे या लेखनाचे केंद्रसूत्र आहे.शेती,उद्योग,शिक्षण,समाज-संस्कृती, इतिहास, धर्म, साहित्य,भाषा आदी व्यवस्थासंबंधीचे मूलगामी आणि व्यवस्था परिवर्तनाचे मूल्ये असलेले मानवतावादी चिंतन यातून प्रकट झालेले आहे. सामाजिक समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,सत्य,निती,प्रेम आदी वैश्विक मूल्यांचा अविष्कार या लेखनातून झालेला आहे.

परकीय अभिजनांनी(आर्य)येथील मूलनिवासी बहुजनांना अज्ञानी ठेवून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक गुलाम केले.त्यांचे ‘माणूस’म्हणून अस्तित्त्व नाकारून आपले वर्चस्व प्रस्थापित करत शोषण केले.याची परखड आणि चिकित्सक मीमांसा आधुनिक काळात प्रथमच महात्मा जोतीराव फुले यांनी केली.त्यांचे हे समग्र लेखन अभिजनांचा बुरखा फाडणारे आणि बहुजनांना सत्याची जाणीव करून देणारे असे आहे.म्हणूनच आपल्या सांस्कृतिक परंपरेकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे हे लेखन महत्वाचे आहे.महात्मा फुले यांच्या लेखनाची ही समग्रता कोणत्याही काळातील समाजपुनर्रचनेसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

- केदार काळवणे,सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि. उस्मानाबाद. पिन:४१३५०७, ईमेल: kedar.kalwane.28@gmail.com          मो: ७०२०६३४५०२

‘आपलं महानगर’या वर्तमानपत्रातील ‘सारांश’पुरवणीतील आजचा लेख.
••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment