जगाची महासत्ता अमेरिका आज लोळागोळा झालीय. कोरोनाने पिडीत अमेरिका आणि युरोपमधले प्रगत देश बघितले की कणव दाटून येते. अमेरिकन माणसांनो लवकर बरे व्हा हीच मंगलकामना.
एक जुनी गोष्ट आठवली. एका अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये शोधनिबंध वाचण्यासाठी मला निमंत्रण मिळाले होते. युएस व्हीसासाठी फी भरून अर्जाचे सगळे सोपस्कार केले. खूप कागदपत्रे जमवावी लागली. त्यापुर्वी मी बर्याच देशांना जाऊन आलेलो असल्यामुळे, तसेच निमंत्रक संस्था तगडी असल्याने मला व्हीसा मिळणे अवघड जाणार नाही असे मित्रांनी सांगितले होते. मी आशावादी होतो. अमेरिकन एम्बसीमध्ये कागदपत्रे घेऊन भेटायला बोलावण्यात आले. यथावकाश एका खिडकीवर मला बोलावण्यात आले. माझी फाईल बघत अत्यंत मग्रूर चेहर्याचा एक अमेरिकन अधिकारी माझ्याशी कमालीच्या उद्धटपणे बोलत होता.
माझ्या भेटीचा उद्देश, माझ्या दौर्याचा तपशील, तिकडे राहण्याची व्यवस्था काय आहे, याची नेमकी उत्तरं मी दिली.
माझ्या फाईलमधल्या माझ्या आर्थिक स्थिती दाखवणार्या कागदपत्रांकडे त्या अधिकार्याने नजर टाकली आणि त्याच्या डोळ्यात संताप दिसला. तो पुट्पुटत होता. तो मला बेगर म्हणत होता. त्यानं माझी फाईल बाहेर फेकून दिली आणि माझ्या अर्जावर शिक्का मारला रिजेक्टेड.
मला व्हीसा न मिळाल्याचे वाईट नक्कीच वाटले पण तो मला भिकारी म्हणाला याचा अधिक संताप आला.
त्यानंतर विविध नामवंत संस्थांची अनेकदा निमंत्रणे येऊनही मी परत कधीही युएस व्हीसासाठी अर्ज केला नाही. तिकडे माझे अनेक भले मित्र राहतात. ते कष्टाळू आहेत. गुणवंत आणि प्रतिभावंत आहेत. सगळेच अमेरिकन त्या अधिकार्यासारखे असतील असेही नाही. तरिही या लोकांच्या देशात जाण्यावाचून आपले भिकार्यांचे काय अडलेय? असाच प्रश्न मनात येत गेला.
आज कोरोनापुढे हतबल झालेल्या त्या श्रीमंत देशातील अहंकारी लोकांबद्दल अपार कणव दाटून आली. अमेरिकन माणसांनो लवकर बरे व्हा हीच मंगलकामना.
-प्रा. हरी नरके, ०२/०४/२०२०
No comments:
Post a Comment