Saturday, October 19, 2019

पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर





पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर- प्रा.हरी नरके
४० वर्षांपुर्वी धडफळेसरांची ओळख झाली. त्यांची थोरली मुलगी श्रुती आमच्या दर्पण या ग्रुपमध्ये होती. मंदार आमचा नेता. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि ऋतावरी ह्या बुद्धीमान आणि गुणी.

तेव्हा हे कुटुंब कसब्यात राहायचे. एकदा त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलावले. जेवताना धडफळेसर आम्हाला नानाविध किस्से सांगून हसवत होते. इतक्या प्रसन्न आणि खेळकर वातावरणातले ते जेवन ४० वर्षे झाली तरी आजही मला लख्ख आठवते. सर अतिशय व्यासंगी, निर्भीड आणि वाकपटू होते. तेव्हा बोलताना एका सनातनी आणि कर्मठ विचाराच्या संघटनेचा विषय निघाला. धडफळे सर स्वच्छ प्रागतिक असल्याने, ते म्हणाले, " माझे असे प्रामाणिक मत आहे की प्रत्येक लहान मुलाला या संघटनेत पाठवावे."

मी अवाक झालो. आणि सरांनी पुढे षटकार ठोकला. " जी मुलं बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असतात ती वयात येताच ही संघटना सोडतात. आणि जे वयात येऊनही तिथेच राहतात ते त्याच [सुमार] कुवतीचे असतात." आमच्या ग्रुपमध्ये एकजण तिथे जाणारा होता. तो अगदी गोरामोरा झाला. आजही ह्या संघटनेकडे बुद्धीमान लोकांची वाणवा आहे. आहेत ते बहुतेक सारे आदेशावर चालणारे भक्त.

सर आम्हाला उत्तमोत्तम ग्रंथ वाचायची शिफारस करायचे. घरातली पुस्तकं वाचायला द्यायचे. श्रुती माझी मैत्रिण असल्याने जरी मी धडफळे कुटुंबाशी जोडला गेलो होतो तरी माझी सरांशी खास गट्टी जमलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये अनेकजण होते. त्यांच्या सर्वांच्या घरी मी जायचो. पण त्या मित्रमैत्रिणींच्या वडीलांशी एव्हढी दोस्ती जमली नाही. जशी आणि जितकी धडफळेसरांशी जमली होती. त्यांच्याशी मैत्र जडले त्याचं कारण सरांचा दिलखुलास, उमदा आणि हजरजबाबी स्वभाव.

१० ऑगस्ट १९३७ साली जन्म झालेल्या धडफळे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर अध्यापनाचे कार्य हाती घेतले. प्राचीन भाषा आणि विशेषतः पाली भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दिवंगत संशोधक लेखक धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर पाली आणि बौद्ध संस्कृतीवर संशोधन करून लेखन करणारे मो. गो. धडफळे एकमेव मानले जातात. त्यांचा महाभारतावरही गाढा अभ्यास होता.

प्रदीर्घ काळ भाषासंशोधनामध्ये काम करत असताना धडफळे यांना देशातील, परदेशातील अनेक संस्था, विद्यापीठांनी सन्मानीत केले. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राचीन भाषांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सात प्रबंध आणि असंख्य शोधनिबंध आहेत. त्यांच्या परदेशातील व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. भाषेमध्ये संशोधन करणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. ते देशविदेशात संशोधनाचे कार्य करत आहेत.

त्यांची कथनशैली लख्ख चित्रशैली होती. ते विद्वान असूनही अतिशय सोपं बोलत. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्वानांना विनोदाचे वावडे असते. धडफळेसरांची मात्र विनोदावर हुकुमत होती.
त्यामुळेच त्यांची जशी लक्ष्मणशास्त्री जोशींशी मैत्री होती तितकीच घट्ट मैत्री पु. ल. देशपांडे यांच्याशी होती.
श्रुती-मंदारच्या लग्नाल त्यामुळे हे दोघेही घरचे कार्य समजून आवर्जून उपस्थित राहिलेले होते.

मी प्राध्यापक व्हावे ही सरांचीच इच्छा. बहुजनांबद्दल सरांना विशेष आत्मियता होती. सरांनी मला भांडारकर संस्थेशी जोडले. प्रा. आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे आणि माझी राज्य सरकारने भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. तेव्हा धडफळेसर बोरीचे मानद सचिव होते. सरांनी या संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. अनेक वर्षे त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. धडफळे-भाटे वाद गाजले. ते लढवय्ये असल्याने कोणालाही वादात ओढायला ते घाबरत नसत.

ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरीही होते.
त्यांची " पाली भाषेतील बौद्धसंत साहित्य" आणि इतर पुस्तकं, विद्वत्ता, संशोधन आणि मौलिकता यांचा मानदंड ठरावीत.

भांडारकरमध्ये त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांच्याकडून संशोधनाची शिस्त, व्यासंग आणि निकोप-निरामय संशोधनवृत्ती यांचे धडे घेता आले.

अभिजात मराठीबाबत मी रंगनाथ पठारेसरांना घेऊन त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर सलग तीनतास आमच्याशी बोलत होते. त्यात शेकडो संदर्भ, युक्तीवाद आणि भाषक प्रवासाचे नमुने होते. वयोपरत्वे अलिकडे ते बोलताना सहजपणे इतर विषयात शिरायचे आणि तिथेही रमायचे. नानाविध विषयांचा ज्ञानकोश म्हणजे धडफळे सर. अतिशय चैतन्यदायी, उर्जादायी विद्वत्ता.

सर बोलायला जसे विनोदी होते तसेच ते कायम निर्भिड आणि टोकदारही होते. भांडारकरच्या एका बैठकीत बोलताबोलता त्यांनी एका भांडकुदळ सदस्याला सणसणीत चपराक लगावली होती. ते म्हणाले, " आपल्या संस्थेचे अध्यक्ष सकाळी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा आणि आणि *** असतात. [***संबंधित सदस्याचे नाव]

ते सदस्य इतके भडकले की त्यांना बोलताच येईना. धडफळेसर पुढे म्हणाले, " माझे हे म्हणणे खोटे असेल तर मी प्रत्यक्षदर्शींची साक्ष काढतो. काढू का?" ते सद्गृहस्थ निरूत्तर झालेले.

अलिकडेच त्यांनी अभिजात मराठीबाबत एक लेख लिहिला होता. त्यांच्या या बदलत्या भुमिकेबाबत त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. पण आता ती कशी करणार?

सर, तुम्ही आम्हाला हवे होतात.

विनम्र आदरांजली.

प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१९

No comments:

Post a Comment