Monday, September 17, 2018

पालीभाषा गौरव दिन-



पालीभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तथागत, त्यांच्या परंपरेतले सगळे विद्वान, आधुनिक भारतातले आचार्य धर्मानंद कोसंबी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनागरिक धम्मपाल, महान पंडीत राहूल सांकृत्यायन, जगदीश कश्यप आदी मान्यवरांना वंदन.

बुद्ध, धम्म, संघ यांचा प्रचार, प्रसार आणि पालीभाषेचे संवर्धन यासाठी धर्मानंद कोसंबींनी आपले आयुष्य वेचले.

जगाचा निरोप घेताना महात्मा गांधींकडे आपली अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी १९४७ साली १ हजार रूपये गांधीजींकडे सुपुर्द केले आणि या पैशातून तरूण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन धम्म व पालीचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेला पाठवा असे सांगितले. गांधीजींनी त्यांना तसे लेखी वचनही दिले. गांधीजींनी आपल्या सहकार्‍यांना लिहिले, " उनके आश्रममें रहने से आश्रम पवित्र होता हैं." त्यांची बुद्धधम्म व पालीबाबतची इच्छा पुर्ण केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

४ जून १९४७ ला कोसंबींनी पवनारच्या गांधी आश्रमात जगाचा शेवटचा निरोप घेतला.
५ जून १९४७ रोजी संध्याकाळच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजी म्हणाले, " जो अपनी डोंडी पीटते -पिटवाते हैं, उन्हे तो हम बहुत चढाते हैं. पर जो मूल सेवक हैं, धर्म की सेवा करते हैं, उन्हें लोग पहचानते भी नही हैं. ऎसे एक आचार्य कोसंबीजी थे. वे हिंदुस्थान के बौद्धविचार और पाली के प्रमुख विद्वान थे. उन्होंने स्वयं फकीरी पसंद की थी. वे प्रार्थनामय थें. ईश्वर करें हम सब उनका अनुकरण करें."

कोसंबींनी ४० वर्षांपुर्वी कलकत्ता विद्यापीठातल्या आपल्या दरमहा २५० रूपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते १९०८ साली त्यासाठी महाराष्ट्रात आले. महाराजा सयाजीराव गायकवाड देत असलेल्या ५० रू. च्या मानधनावर त्यांनी मराठी माणसांना पाली शिकवायला सुरूवात केली. बुद्ध विचारांचा आणि पाली भाषेचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करण्यासाठी ते पुढचे सारे आयुष्य जगले.

कोसंबींनी पालीभाषेचे शेकडो विद्वान तयार केले. हरीनाथ दे, डॉ. जेम्स एच. वूडस, प्रो. लॅनमन, प्रो.चिंतामण वैजनाथ राजवाडे, विनोदकार म्हणून ख्यातनाम असलेले पालीचे विद्वान चिं.वि.जोशी, डॉ. प.ल.वैद्य, प्रो. ना.के.भागवत, भदन्त यू.धम्मजोती, भिक्कू धर्मरक्षित, डॉ. पु.वि. बापट या त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी बुद्धीझम आणि पाली भाषेवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.

भदन्त आनंद कौशल्यायन हे त्यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी कोसंबींच्या "भगवान बुद्ध" या चरित्र ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद केला. हा ग्रंथ श्रीलंकेत गाजला. त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" चा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.

महात्मा गांधीनीं १९२७ साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. तिथे पाली भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोसंबींना निमंत्रित केले. तिथे प्राध्यापक म्हणून
काम करीत असताना त्यांनी आपल्या "हिंदी संस्कृती आणि अहिंसा," "पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म," या ग्रंथामध्ये गांधीजींच्या विचारांची कठोर चिकित्सा केली. रामराज्य, सनातन धर्म, गीता, विश्वस्त या संकल्पानांबद्दलचे आपले मतभेद नोंदवले.

तेव्हाच्या गुजरात पॅटर्नमध्ये मतभेदांचे स्वागत असायचे.


महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात कोसंबींच्या बुद्धीझमवरील ५ भाषणांचे आयोजन केले. महाराज स्वत: सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असायचे. पुढे सयाजी ग्रंथ मालेद्वारे त्यांनी बुद्धीझमवरील असंख्य ग्रंथ प्रकाशित केले.

बडोदा संस्थानात दारूबंदी करावी असा विचार जोर धरू लागला होता. महाराजांनी मात्र तो मुद्दा फेटाळून लावला. "दारूविक्रीद्वारे मिळणारा कर महसूल कुठून आणायचा? असा त्यांनी प्रश्न विचारला. उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सांगा, तरच मी दारूबंदी करतो" असे ते म्हणाले.

ही बाब कोसंबींना आवडली नाही. कोसंबींनी आपल्या भाषणात सम्राट अशोकाने केलेल्या संपूर्ण दारूबंदीचे उदाहरण दिले. कोसंबी म्हणाले, "सम्राट अशोक असं म्हणाला नाही, की उत्पन्न बुडते, मला पर्याय द्या, त्याने ताबडतोब दारूबंदी केली.चांगली गोष्ट करताना उत्पन्नाचा मुद्दा गौण असतो. विचार महत्वाचा असतो."
भर दरबारात सन्नाटा पसरला. सयाजीराव महाराज भर सभेतून उठून गेले. लोक घाबरले. आता कोसंबींची उचलबांगडी होणार, हाकालपट्टी होणार, पुढची भाषणं रद्द केली जाणार असं जो तो बोलू लागला.

दरबारने त्याच दिवशी महाराजांचा हुकूम प्रसिद्ध केला.

"आचार्य कोसंबी यांच्या विचारांशी महाराज सहमत आहेत. आजपासून संस्थानात संपूर्ण दारूबंदी करण्यात येत आहे."

कोसंबींची पुढची भाषणं सुरळीतपणे पार पडली. महाराज जाहीरपणे म्हणाले, " आचार्य कोसंबींचा अधिकार आम्हाला मान्य आहे. त्यांनी आमच्या कानशिलात वाजवली असली तरी त्यानंच आम्हाला जाग आलेली आहे."
महाराज कोसंबींना कायम गुरूस्थानी मानत असत.

तेव्हा गुजरातमध्ये राजधर्म पाळला जायचा. गुरुजनांचा सन्मान केला जायचा. विचारांचा आदर केला जायचा.
-प्रा.हरी नरके, १७ सप्टेंबर, २०१८

No comments:

Post a Comment