Tuesday, September 18, 2018

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेवाले चिपळूणकर गेले --




श्री वि वि चिपळूणकरसर राज्याचे शिक्षण संचालक असताना मी १९७८ साली त्यांना प्रथम भेटलो.
तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिकत होतो. आमच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रथेप्रमाणे मी "पुणे दर्शन" नावाचा प्रबंध लिहिला होता.
त्यासाठी मी सहा महिने प्रवास, संशोधन केलेले होते. सरांनी त्यांच्या लेटरहेडवर पानभरून कौतुक करणारे पत्र मला पाठवले.
राज्याच्या शिक्षण संचालकाने एका शालेय विद्यार्थ्याचे एव्हढे कौतुक करण्याचा हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.

१९७९ साली मी टेल्कोच्या वसतीगृहात राहात होतो. तिथे एक गटई कामगार [चर्मकार] चप्पल दुरूस्तीचे काम करीत असे. त्याचा मुलगा तिथेच खेळत असे. त्याला शाळेत का घालत नाही? असं मी विचारल्यावर तो म्हणाला, "गुर्जी म्हनूलाले, गावाकडनं पोराच्या जल्माचा दाखला आणा म्हणुनश्यानी. गावाला गेल्तो तर तलाठी म्हण्ला, सोधायला येळ लागल. पुन्यांदा ये. आता म्या हाव अमदपूरचा. त्या तिकूडल्या मराटवाड्यातला. दाकल्यासाटी खर्च करायची आप्ली ऎपत नाय बगा."

गुरूवारी आम्हाला साप्ताहिक सुट्टी असायची. मी स्वत: मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो. पण ते म्हणाले, " जन्मदाखला आणला तरच प्रवेश मिळेल."

मी सेंट्रल बिल्डींगमध्ये जाऊन शिक्षणसंचालक असलेल्या चिपळूणकरांना भेटलो. त्यांनी सर्वच शाळांसाठी परिपत्रक काढले. ज्यांचे पालक निरक्षर असतील, स्थलांतरीत असतील अशा मुलांसाठी जन्मदाखल्याची अट शिथिल करण्यात येत आहे."
तो चर्मकार मुलगा शिकू लागला. पुढे इंजिनियर झाला. सध्या तो टेल्कोत [ टाटा मोटर्समध्ये] अधिकारी आहे.

सरांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी गुणवत्ता अभियान सुरू केले. मी त्यात अनेकदा व्याख्याने देत असे.
सरांनी नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी त्यांची जयंती सुरू केली. कित्येकदा आम्ही सोबत जात असू.
पुढे सावित्रीबाईंचे भव्य स्मारक उभे करण्याच्या कामाची माझी प्रेरणा चिपळूणकरसरच होते.
सरांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू केली. हजारो गरिब,होतकरू, गरजू मुलींच्या शिक्षणाला त्यातनं चालना मिळाली.

एकदा एका मदरशात सरांसोबत कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे संयोजकांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या सभेत चक्क "दत्ताचा" फोटो लावलेला होता. भगवान दत्ता पालक योजना असा त्यांचा समज होता.

आम्ही खूप हसलो. सरांनी तिथे मला सावित्रीबाईंवर बोलायला लावले.
सरांमुळेच मी सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले. त्याचा इंग्रजी अनुवाद दिल्लीच्या एन.सी.ए.आर.टी.ने प्रकाशित केला.

मी त्यांना गंमतीने म्हणायचो, "सर, तुम्ही चिपळूणकर असूनही सावित्रीबाईंचा वारसा कसा सांगता?"
सर हसायचे आणि म्हणायचे, " अरे मी, विष्णूशास्त्रींच्या छावणीतला नाही बाबा. माझा वारसा त्यांच्या वडीलांचा म्हणजे जोतीरावांचे मित्र असलेल्या कृष्णशास्त्रींचा आहे. बेटेसे बाप सवाई होता.
सावित्रीबाईंना शाळा चालवायला आपल्या वाड्यातली जागा देणार्‍या शनिवार पेठेतल्या अण्णासाहेब चिपळूणकरांचा माझा वारसा आहे.  सावित्रीबाई न होत्या तर माझी आई ना शिकती. माझी आई ना शिकती तर मी कसला इथवर येतो? हे सारे त्यांचे उपकार आहेत."

आज सकाळी सरांचे दु:खद निधन झाले. विनम्र आदरांजली.
-प्रा.हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment