Monday, September 24, 2018

सत्यशोधक समाजाचा १४५ वा वर्धापन दिन-






पुरोहिताला लग्नाला बोलवा न बोलवा, दक्षिणा मात्र द्या - पुणे न्यायालय

महात्मा जोतिराव फुले आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
ही आधुनिक भारतातली ग्रामीण भागापर्यंत पोहचलेली पहिली सामाजिक, शैक्षणिक चळवळ होती. "सर्वसाक्षी जगत्पती, नकोच त्याला मध्यस्थी!" हे या समाजाचे ब्रीद होते. निर्मिक आणि माणूस यांच्यामध्ये दलाल किंवा मध्यस्थ नको हे मुख्य सूत्र होते.

सत्यशोधक समाजात कबीराचे दोहे म्हटले जात. त्यांच्या बीजक या क्रांतिकारी ग्रंथातला विचार सत्यशोधक प्रमाण मानित असत. संत तुकाराम आणि वारकरी समाज हा या संघटनेचा कणा होता. स्थापनेनंतर अवघ्या तीन महिन्यात पुण्यात सत्यशोधक पद्धतीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. बायकांचे अधिकार स्थापन करण्याची प्रतिज्ञा या लग्नात वधूवर घेत असत. कमी खर्चात, साध्या पद्धतीने आणि हुंडा न देता घेता ही लग्नं होत. भटजीला न बोलावता नातेवाईक व मित्र हे लग्न लावत असत. २५ डिसेंबर १८७३ ला पहिलं सत्यशोधक लग्न लागलं. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.

पुण्यातला पुरोहितवर्ग संतापला. त्यांनी विवाहसोहळा उधळण्याची धमकी दिली. पोलीसांच्या बंदोबस्तात हे लग्न लागलं. सत्यशोधक लग्नांची चळवळ वणव्यासारखी राज्यात पसरू लागली. ओतूरच्या बाळाजी कुशाजी डुंबरे पाटील या मराठयाने आपल्या २ मुलींची लग्नं या पद्धतीनं लावली म्हणून ओतूरचे रामचंद्र सदाशिव जोशी व इतर ग्रामभटजी कोर्टात गेले. आमची दक्षिणा बुडाली, आमचा धार्मिक हक्क धोक्यात आला, कोर्टाने आम्हाला सहा रूपये भरपाई मिळवून द्यावी असा दावा करण्यात आला. [ केस नंबर ८३१/१८८४, जुन्नर कोर्ट, महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र सरकार, मुंबई, २०१३, पृ. ४१९-२० ] न्यायाधिशांनी आठ आणे भरपाई म्हणून मंजूर केले. यात जोतिरावांसोबत आणखी नऊ जणांवर हा खटला भरलेला होता. त्यात सत्यशोधक समाजाच्या बलुतेदार, अलुतेदार, दलित, आदीवासी सदस्यांचा समावेश होता.

यातला विरोधाभास म्हणजे भटजींची भाषा धर्म बुडाल्याची होती पण ते भरपाई मात्र रूपयांमध्ये मागत होते!

फुल्यांनी या निकालाला आव्हान दिले. पुण्याच्या जिल्हा न्यायालयाने लग्नाला भटजीला बोलवा अगर न बोलवा पण दक्षिणा मात्र घरपोच करा असा निकाल दिला.
त्याविरूद्ध फुले उच्च न्यायालयात गेले आणि जिंकलेही. ५ जानेवारी १८९० ला हा निकाल लागला. भटजीला लग्नाला न बोलावल्यास दक्षिणा देण्याची गरज नाही असा उच्च न्यायालयाचा निकाल होता. न्या. का. त्रिं. तेलंग आणि न्या. सर विल्यम सार्जंट यांनी हा निकाल दिलेला होता. सत्यशोधक लग्नं आणि हा जोशी वतनाचा विषय पुढे खूप गाजला.

५३ वर्षे त्यावर वाद झडले. तो मुद्दा मुंबई विधीमंडळासमोरही आला. भटजीला लग्नाला न बोलावता दक्षिणा द्यायची असेल तर मग जे लोक आपल्या घरी आपल्या हाताने आपली दाढी करतात त्यांनी दाढीचे पैसे नाव्ह्याच्या घरी पोचवावेत अशी भुमिका सत्यशोधकांनी विधीमंडळात घेतल्यावर ३ ऑगष्ट १९२६ ला जोशी वतन कायद्याने रद्द झाले.

सत्यशोधकांची लढाई ब्राह्मणांविरूद्ध नव्हती. त्यांची लढाई सांस्कृतिक-धार्मिक वर्चस्वाविरूद्ध, गुलामीविरूद्ध होती. त्यांच्यासोबत भिडे, चिपळूणकर, गोवंडे, भवाळकर, जोशी, वाळवेकर, भांडारकर, मांडे असे कितीतरी ब्राह्मण शेवटपर्यंत होते. फुल्यांनी आपल्या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून भांडारकरांची सही घेतली होती तर मृत्यूच्या आधी लिहिलेल्या कवितेत त्यांनी वाळवेकरांचे विशेष आभार मानले होते. एका ब्राह्मण मातापित्यांचा, [विधवेचा] मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता. त्याला आपला वारस नेमले होते. दासप्रथा मानणार्‍या ब्राह्मणांची आणि त्यांच्या बहुजन अनुयायांचीसुद्धा सावली आपल्या प्रेतावर पडू देऊ नये असे त्यांनी मृत्यूपत्रात स्पष्टपणे लिहिले होते.

सत्यशोधक चळवळीने वास्तूशांत, नामकरण, दशक्रिया यांना सत्यशोधक पर्यायही दिले होते. वास्तूशांत करताना ज्या मजूरांनी बांधकाम केले त्यांचा सत्कार करावा, त्यांना गोडाधोडाचे जेवन द्यावे असे फुले सांगत होते. सामान्य लोक पोकळीत जगू शकत नाहीत. त्यांना पर्यायी संस्कृती, उपक्रम, कार्यक्रम द्यावे लागतात, ते सत्यशोधक समाजाने दिले होते म्हणूनच तो लोकप्रिय झाला होता. स्त्री-पुरूषसमता, ज्ञान व कौशल्यांची निर्मिती, प्रचार, प्रसार, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप हा सत्यशोधक चळवळीचा पंचसुत्री कार्यक्रम होता. प्रवृतीविरोधी असलेली ही चळवळ ब्राह्मण्यांऎवजी व्यक्तीद्वेषी, ब्राह्मणविरोधी बनवणार्‍या बहुजन राजकारण्यांनी पुरोहितांशी मागच्या बाजूने युती करून सत्यशोधक चळवळ संपवली.

बहुजनांच्या हातात सत्ता आल्यावर इथल्या बहुजन राज्यकर्त्यांनीच पुरोहितांशी हातमिळवणी करून हे सगळे सत्यशोधक पर्याय नष्ट केले. तोंडाने फुल्यांचे नामस्मरण करीत त्यांनी फुल्यांना हायजॅक केले होते. हा पहिला युतीचा किंवा आघाडीच्या राजकारणातला धार्मिक-सांस्कृतिक धडा होता.

गणपती उत्सवाच्या काळात फुल्यांनी गणपतीबाबत लिहिलेले अखंड संदर्भापासून सोडून काही क्रांतिकारी लोक फे.बु.वर टाकत होते आणि पाहा फुले कसे गणपतीच्या विरोधात होते, ह्याची दवंडी पिटत होते. यामुळे काय साध्य होणार? तर फुल्यांना मानणारे ओबीसी, बहुजन, अनु. जातींचे जे लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत ते महात्मा फुल्यांवर फुली मारणार! हेच तुम्हाला हवेय काय? तुमची विवेकबुद्धी काय माती खायला गेलीय का? तुमचा हा भंपक क्रांतिवाद जरा काबूत ठेवला तर सत्यशोधक चळवळीवर उपकार होतील.

आपल्या कृतीचा परिणाम न बघता, लिहिणारे, बोलणारे, लोकांपासून फटकून राहून, अतिरेकी क्रांतिकारी भुमिका घेणारे हे बामसेफी, ब्रिगेडी लोक आज परिवर्तनाचे खरे स्पीडब्रेकर बनलेले आहेत. ते व्यक्तीगत, संघटनात्मक स्वार्थासाठी महात्मा फुल्यांचा गैरवापर करीत आहेत. दुसरीकडे हे एकांडे लोक जागतिक क्रांती करायला निघतात पण यांच्यासोबत त्यांचे कुटुंबियही नसतात.


वर्षभर आम्ही प्रबोधनाचे कोणते कार्यक्रम देतो? कोणते पर्याय या सामान्य लोकांना देतो? प्रत्यक्षात आम्ही काहीच करणार नाही पण ओबीसी कसे प्रतिगामी आहेत याची मात्र चवीनं चर्चा करणार! तुम्ही त्यांना प्रतिगामी छावणीत ढकलत असता याची तुम्हाला जाणीव तरी असते काय?

भटजी ज्या सामान्यांनी नाकारला होता, त्यांच्याच वंशजांचे आज भटजींशिवाय पानही हालत नाही. कारण भटजी सातत्याने काम करणार,सगळी खरीखोटी हत्यारं वापरणार,  आणि आम्ही मात्र १००% निष्क्रीय राहणार. तोंडाने फक्त फुले-शाहू-आंबेडकरांचा नामजप करायचा, वातावरण ब्राह्मणविरोधी करायचे आणि सनातन्यांशी हातमिळवणी करून स्वत:ची राजकीय सत्ता शाबूत ठेवायची असा फुलेद्रोह या बहुजन राज्यकर्त्यांनी केल्यामुळेच सत्यशोधक चळवळीचा आज र्‍हास झालेला आहे. अर्धवट किंवा अर्धसत्य मांडणी करून हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अतिरेकी क्रांतिकारक या चळवळीचे अधिकच नुकसान करीत आहेत.
-प्रा.हरी नरके, २४ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment