दया पवार एक कथा सांगायचे. बहुधा हरी शंकर परसाईंची. एका महानगरातील एका गृहनिर्माण सोसायटीत दोन कुटुंबं शेजारी शेजारी राहात असतात.
सुशिक्षित. आधुनिक. उच्चभ्रू. दोन्ही घरातले पुरूष एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदांवर काम करीत असतात. बायकाही नोकरी करणार्या, नियमितपणे क्लबमध्ये जाणार्या वगैरे असतात.
त्यातल्या एका कुटुंबातल्या तरूणावर दुसर्या कुटुंबातली युवती प्रेम करीत असते. ते दोघेही उच्चशिक्षित इंजिनियर असतात, आय.टी. कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर असतात. एकमेकांना खूप आवडत, जपत असतात. दोघे अगदी अनुरूप, परफेक्ट मॅच वगैरे असतात. ते लग्नाच्या आणाभाका घेतात. संपुर्ण आयुष्य एकत्र काढायचा निर्धार करतात.
मुलगा आपल्या वडीलांना तसे सांगतो. ते भडकतात. त्यांची जात काय, आपली जात काय याचं तरी भान ठेव असं मुलाला खडसावतात. आजवर जातीपातीचं काहीही नसलेले वडील, एरवी आम्ही जातपात काही मानत नाही असे सदैव सांगणारे, जातीय अस्मितेचे देव्हारे आत्ताच कसे काय माजवायला लागले याचे मुलाला कोडे पडते.
मुलगा त्यांचं अजिबात ऎकायला तयार नसतो.
सामाजिकदृष्ट्या मुलगा वरच्या थरातला तर मुलगी खालच्या मानल्या गेलेल्या समाजातली असते.
दोन्ही कुटुंबातल्या पालकांना हे प्रेम, हे लग्न अजिबातच मान्य नसतं.
शेवटी मुलाचे वडील मुलाला एक तोडगा सुचवतात.
हे बघ, धर्मशास्त्र सांगतं, तुमचं लग्न होऊ शकत नाही. पण एक मार्ग आहे. तू तिला पत्नीचा दर्जा देऊ शकत नसलास तरी तू तिला ठेऊ शकतोस.
मुलगा संतापतो.
आम्ही लग्नच करणार असं वडलांना ठणकावतो.
वडील म्हणतात, " मग ठीक आहे. तसेच असेल तर तू तिला पळवून ने. [ त्यासाठी आपल्या भागातल्या आमदाराची मदत तू घे, असं ते त्याला सांगतात किंवा नाही, ते मला आता आठवत नाही. ] आपद्धर्म म्हणून अशा विवाहाला धर्मशास्त्राची मान्यता आहे."
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment