Wednesday, September 5, 2018

गुरूजनांना चारही दिवसांच्या एकत्रित शुभेच्छा - प्रा.हरी नरके



"सर, नमस्कार. मी ****** कॉलेजचा ***** प्राचार्य बोलतोय. तुमचा चाहता आहे. तुमचं खूप नाव ऎकलंय. एकदा आमच्या कॉलेजमध्ये बोलावतो तुम्हाला, वेळ द्या.
सर, तुमच्याकडे एक अगदी छोटं म्हणजे तसं किरकोळ काम होतं."

"नमस्कार. बोला ना!"

"सर, पुढच्या आठवड्यात कॉलेजच्या वार्षिक परीक्षा सुरू होतायत. आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक लईच स्ट्रीक्ट आहेत. त्यांनी कॉपीविरूद्ध धडक मोहीम उघडलीय. परवा त्यांच्याकडे बसलो असताना समजलं की ते तुमचे विद्यार्थी आहेत. त्यांना म्हणावं, अजिबात सोडू नका. प्रत्येक कॉलेज जेरबंद करा.
" एक बारकी रिक्वेस्ट होती बघा. गेली पाच हजार वर्षे त्या *** नी आप्ल्याला शिकू दिलं नाय बघा.

आमच्या कॉलेजात सगळी आप्लीच मुलं असतात. तुम्हाला माहितीच आहे की, आमचे संस्थापक आप्लेच ***वाले आहेत. ते निव्वळ समाजसेवा म्हणून आप्ल्या पोरांसाठी कॉलेज चालवतात. त्यांनी अ‍ॅडमिशन घेतानाच मुलांना शब्द दिलेला असतोय, "कॉपीची सर्व व्यवस्था पुरवली जाईल. पास होण्याची १००% गॅरंटी."
"तेव्हा तेव्हढं आमचं कॉलेज वगळा म्हणावं, कॉपीमुक्त मोहीमेतून. तुमचं ऎकतील एस.पी.!"

" तुम्हाला लाज वाटत नाही सर, मला असलं काम सांगायला?"

"सर, त्यात कसली आलीय लाज? कॉलेजचा निकाल १००% लावीन ह्या अटीवरच मला प्राचार्य केलंय त्यांनी. इतरत्र  ५० ते ६० लाख घेतात प्राचार्याची नोकरी द्यायला. माझ्याकडून त्यांनी अवघे ४९ लाखच घेतेलेत बघा. आमचे संस्थापक आप्ल्या लोकांचा लई कळवळा असलेले आहेत, सर."

"ठीकाय. मी तुमच्या जिल्ह्याच्या एस.पीं.ना नक्की फोन करतो. त्यांना कॉपीमुक्त जिल्हा मोहीम जोरदार चालवायला सांगतो. काहीही झालं तरी तुमचं महाविद्यालय या मोहीमेतून सुटता कामा नये याची दक्षता घ्यायला सांगतो."

तमाम शिक्षक, प्राध्यापक, गुरूजनांना शिक्षक दिन, शिक्षण दिन, गुरूपौर्णिमा आणि शिक्षण संस्थाचालक पाळत असलेला गुरूजन पोळा या चारही दिवसांच्या एकत्रित शुभेच्छा.

-प्रा.हरी नरके, ५ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment