निमित्त-##बलुतंचीचाळीशी##
बलुतंनं जगण्याचा निरामय दृष्टीकोन दिला- प्रा.हरी नरके
"हरी, तू बलुतं अवश्य वाच," असं पु.ल. देशपांडे मला म्हणाले. मी तेव्हा शाळेत होतो. हे पुस्तक ज्या दिवशी प्रकाशित झालं त्याच दिवशी त्यांनी वाचलं होतं. आणि भेटेल त्याला ते बलुतं वाचायची जोरदार शिफारस करीत होते.
परवडत नव्हतं तरी बलुतं मी विकत घेतलं. एका दमात वाचलं आणि मुळासकट हादरलो. खूप रडवलं या पुस्तकानं. एखादं पुस्तक आपल्या आयुष्याचा कायमचा भाग व्हावं हे काम सर्वात प्रथम करणारं पुस्तक म्हणजे बलुतं. दगडू मारूती पवार तथा दया पवार, जन्म १९३५ - निधन- २० सप्टेंबर १९९६, तगडा कवी, श्रेष्ठ आत्मकथाकार, निबंधकार, समीक्षक आणि बलदंड कथाकार. बलुतंची पहिली आवृत्ती २५ डिसेंबर १९७८ ला प्रकाशित झाली. बलुतंनं नवी भाषा, मांडणी, कथनशैली आणि बाज निर्माण केला.
हे पुस्तक खूप गाजलं. त्यावर बाजूनं आणि विरोधात गदारोळ माजला.
या पुस्तकानं मराठी साहित्याची इयत्ता वाढवली. समाजशास्त्रीय दस्तावेजांचं दालन श्रीमंत करून दलित साहित्याचा दबदबा निर्माण केला. कसबे, बागूल, ढसाळ, दया पवार ही नावं श्रेष्ठ मराठी लेखक म्हणून गौरवानं घेतली जायला लागली.
आमचा पुण्यातल्या अनेक शाळांमधल्या मुलामुलींचा "दर्पण" नावाचा एक सोशल ग्रुप होता. मी हे पुस्तक वाचायची सर्वांना शिफारस केली. अनेकजण हे पुस्तक वाचून रडले. बदलले. एक हुशार, "संस्कारवाली कन्या" मात्र भडकली. "कित्ती गलिच्छ पुस्तकाय. आमच्या घरात असल्या घाणेरड्या शिव्या चालत नाहीत. किळस आली वाचून, वैतागाय पुस्तक, मी एकदोन पानंच वाचल्नी ठेऊन दिलं बलुत," असं ती म्हणाली.
ती माझ्या खेडवळ उच्चारांची सदैव टवाळी करायची. मला माझ्या गावठी उच्चारांवरून हिणवायची. पण तिला बलुतंचा उच्चार जमत नव्हता. मला खूप भारी वाटलं. शुद्ध उच्चारांची मिजास मारणारांना बलुतं हा शब्दच माहित नसावा याचा मला प्रचंड आनंद झाला. अर्थात मला तसं वाटणं हे तात्कालिक होतं. चूकही होतं, हे पुढं उमगलं.
आम्ही सगळ्यांनीच तिला फैलावर घेतलं. आम्ही सारेच त्यावेळी बलुतंच्या "वर्षा"वात न्हाऊन निघालो होतो.
मुंबई मनपामधल्या एका उच्चपदावरील अधिकार्यांचा फोन आला. म्हणाले, " आम्ही बलुतंची होळी करणार आहोत. समाजाची बदनामी केलीय दया पवारांनी."
मला तर काय दिसली नाही बदनामी. मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही. उलट बलुतंचा फॉर्म रणांगणच्या विश्राम बेडेकरांना "एक झाड दोन पक्षी" साठी वापरावासा वाटला याचं मला अप्रूप वाटतं. बलुतंनं मराठीचं वळण बदललं. खूप सकस, नवं आणि उमदं लेखण बलुतंमधून प्रेरणा घेऊन होत राहिलं.
बलुतंच्या प्रस्तावनेतल्य एका वाक्याने माझा जगण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्यावेळी मी झोपडपट्टीत राहायचो. मध्यमवर्गीय मित्रांना घरी न्यायला मला लाज वाटायची. बलुतंमध्ये दयाकाकांनी लिहिलंय, "आपल्याला कशाला लाज वाटायला हवी? वाटायची तर लाज ज्यांनी आपल्यावर हे गुहाजीवन लादलं त्यांना वाटायाला हवी!" खाडकन डोळे उघडले. एक वाक्य विजेसारखं डोक्यात घुसलं. खूप बळ देऊन गेलं. मनातला न्यूनगंड तात्काळ पळाला. थेट जगणंच बदललं.
पुढे विद्यापीठात शिकत असताना आनंद यादवसर भरवर्गात दलित साहित्याबद्दल वाईट बोलायचे. तर मी त्यांच्याशी सिद्धा पंगा घ्यायचो. बाहेर आल्यावर वर्गातले मित्र म्हणायचे, "तू कशाला त्यांना क्रॉस करतोस? वर्गातली इतर मुलं त्यामुळं आपल्याकडे खुन्नसनं बघतात."
मी त्याची कधीच पर्वा करायचो नाय. आनंद यादव लेखक म्हणून बरे असले तरी प्राध्यापक म्हणून अगदीच सुमार होते. त्यांना ग्रामीण साहित्याचा फार अभिमान असायचा. मलाही ग्रामीण साहित्य आवडायचे. पण दलित साहित्य आणि साहित्यिकांबद्दल यादवसर एकेरी आणि अतिशय हिनकसपणे बोलायचे. दलित साहित्यावर ते सतत कोरडे ओढायचे. एकतर्फी टिका करायचे. आम्हा दलित साहित्यवादी मुलांबद्दल ते जातीय आकसही बाळगायचे. एकदम बुटकी आणि संकुचित शिक्षकवृत्ती. ते वर्गात आम्हाला शिकवताना ४० वर्षांपुर्वीच्या काळ्यापिवळ्या पडलेल्या नोट्स वापरायचे. त्यांनी दलित साहित्यातले फारसे काहीही वाचलेले नसायचे. पण वेदना,विद्रोह, विज्ञान यांच्याबद्दल नफरत असायची. यादव म्हणजे संकुचित गावगाड्याचं अंधारलेलं प्रतिकच जणू. पुणे विद्यापीठाचे दिवस आठवले की मला तिसर्या-चौथ्या श्रेणीतले प्राध्यापक आनंद यादव हमखास आठवतात. यादवसर बलुतंवर फार वाईट बोलायचे.
ग्रंथालीच्या एका कार्यक्रमात दयाकाकांची दोस्ती झाली. भलताच जिंदादिल माणूस. बोलायला, वागायला एकदम रॉयल! मी तर त्यांच्या प्रेमातच पडलो. ते साहित्यावर तासनतास बोलायचे. त्यांचं वाचन अफाट होतं. त्यांची रसिकता चोखंदळ होती. चित्रशैलीतलं त्यांचं बोलणं मनाच्या गाभ्यात झिरपायचं.
ते मासे अतिशय चवीनं खायचे. आम्हालाही खिलवायचे.
साहित्य संस्कृती मंडळात य.दि.सर अध्यक्ष असताना दयाकाका, नारायण सुर्वे, अरूण साधू, श्रीपु, विजयाबाई अशा दिग्गजांसोबत काम करायला मिळालं. खूपखूप शिकायला मिळालं.
दयाकाकांनी एकदा मला कोल्हापूर आकाशवाणीवर य.दि.सरांची मुलाखत घ्यायला लावली होती. ती खूप गाजली होती. यदिसरांच्या कारमधून आम्ही तिघं खूपदा एकत्र प्रवास करायचो. गप्पांचे फड रंगायचे. बलुतंवरच्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, मात्र तो फारसा चालला नाही. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या निमित्ताने काका, य.दि.सर, अरूण साधूसर अशा आमच्या खूप चर्चा व्हायच्या. बैठकांच्या फेर्या व्हायच्या. खूप धमाल आठवणी आहेत त्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथाचे काम अनेक वर्षे रेंगाळले होते. दयाकाका यदिसरांशी बोलले. त्या दोघांनी मला बोलावले. म्हणाले, "उद्यापासून तुम्ही पुण्याच्या फोटोझिंको प्रेसमध्ये जाऊन बसा. दोनतीन महिन्यात गौरवग्रंथ छापून होईल असं बघा."
मी दीडेक महिन्यात ते काम पुर्ण करू शकलो. दयाकाका खूप खूष झाले.
साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रचारात त्यांना खूप धावपळ करावी लागली. त्यातच ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले. खूप जवळचा, कुटुंबातला मार्गदर्शक हरपल्याचं दु:ख झालं.
पुण्याच्या साहित्य संमेलनात त्यांच्या दया या नावावरून फसगत होऊन संयोजकांनी त्यांची व शांताबाईंची एकाच रूममध्ये राहायची व्यवस्था केली होती. काकांना प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र संयोजकांनी त्या निवासव्यवस्थेत दुरूस्ती केली. बहुधा कोणीतरी ही अफवा पसरवलेली असावी.
लक्ष्मण माने आणि दयाकाका फोर्ड फाऊंडेशनची स्कॉलरशिप घ्यायला अमेरिकेला गेलेले असताना त्या कार्यालयात लिफ्टमधून जाताना लिफ्ट फुल झाल्याने लक्ष्मण माने खालीच राहिले. दयाकाकांना स्वागतिकेने विचारले, "व्हेअर इज लॅकस्मॅन मॅन्ये?"
आम्ही त्यांच्या अशा खूप गंमती करायचो. ते खळखळून हसायचे.
ते स्वत:वरच्या टिकेकडॆही खिलाडूपणे बघायचे.
फारच भला, उमदा आणि जिंदादिल माणूस होते दयाकाका!
प्रकाशित साहित्य
कोंडवाडा (कवितासंग्रह)
चावडी (कथासंग्रह)
जागल्या (कथासंग्रह)
धम्मपद (कवितासंग्रह)
पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
पासंग(कथासंग्रह)
बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
विटाळ (वैचारिक)
पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत.
बलुतं, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, सर्वत्र उपलब्ध.
-प्रा.हरी नरके, बलुतंची चाळीशी, १३ सप्टेंबर २०१८
No comments:
Post a Comment