भारतीय संस्कृती ही मूलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे संमिश्र आणि सहिष्णू संस्कृती आहे. तिच्यावर कोणत्याही धर्मातील सनातन्यांनी हल्ला केला तर त्याचा निषेध व्हायलाच हवा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, पारशी, ज्यू, जैन, बौद्ध या सर्वच धर्मांमध्ये जसा प्रागतिक विचार मानणारे आधुनिक लोक असतात तसेच कट्टरपंथी, अधू मानसिकतेचे आणि सनातनी वृत्तीचे लोकही आहेत. त्या त्या धर्मातल्या प्रागतिकांनी त्याविरुद्ध आवाज टाकायला हवा. लढायला हवे. संघर्ष करायला हवा.
एमआयएमचे आमदार श्री. वारिस पठाण त्यांच्या मतदार संघातील गणपती मंडळाला भेट द्यायला गेलेले असताना तिथे भाषणात गणपतीबद्दल बोलले, गणपती बाप्पा मोरया म्हणाले तर मुस्लीम सनातन्यांनी त्यावर गहजब माजवला आणि मग आमदारांनी जाहीरपणे माफी मागितली. हे अनुचित घडत असताना जर प्रागतिक मुस्लीम गप्प बसणार असतील तर ते दुर्दैवी आहे. यातनं मुस्लीम समाजाला ब्रॅंड करणार्यांनाच बळ मिळेल. मुस्लीम समाजाची स्पेस आणखी कमी होईल. चार्वाक ते चोखामेळा, नामदेव, ज्ञानेश्वर ते तुकाराम, फुले-शाहू- आंबेडकर,रानडे ते गांधी अशांनी झुंज केली, बंडखोरी केली म्हणूनच हिंदू समाजातला प्रागतिक प्रवाह मोठा झाला. टिकला. त्याला खिळ घालण्याचे प्रयत्न चालू असताना तुम्हाला तुमच्या समाजातल्या असहिष्णूतेबद्दल बोलावे लागेल. अहो, मौलाना अबूल कलाम आझाद उपनिषदांच्या योगदानावर लिहित होते. शेवटी भारत हा एकधर्मिय नाहीये. तो बहुसांस्कृतिक आहे.
इस्लाममध्ये जे जे सांगितलेय ते पवित्र आहेच, त्याबद्दल वादच नाही. प्रश्न आपल्या शेजारी राहणार्या इतर धर्माच्या लोकांच्या भावनांना आपण काही किंमत द्यायची की नाही हा आहे? देशाचा परिसर, माती, निसर्ग, सहजीवन, कला, शिक्षण, संगित, व्यवहार आणि कालानुरूपता या गोष्टी समजून घ्यायच्या की नाही?
१. श्री. हमीद दलवाई यांनी त्यांच्या पुस्तकात एक आठवण लिहिलेली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात कोकणातल्या मुस्लीमांनी "मुस्लीम लिग" या पक्षाच्या शाखेची स्थापना करायचा निर्णय घेतला. ते सगळे दलवाईंच्या वडीलांना भेटले. त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी सर्वांनी त्यांना गळ घातली. मुस्लीम लिगच्या कोकण शाखेचे उद्घाटन चिपळूणच्या मारूतीला नारळ फोडून झाले.
२. अल्लाशिवाय मी कोणालाही मानणार नाही हे विधान तारतम्याने घ्यायचे की ते सतत ताणत बसायचे? बरं मग, अजमेर दर्गा, दिल्ली निजामुद्दीन, हाजी अली, मंगळूर पीर दर्गा, खेड शिवापूर दर्गा अशा शेकडो ठिकाणी असलेल्या पीराला सगळे मुसलमान भजतात, हे बंद केले गेलेय का? मुळात करायचे का? सुफी योगदान नाकारायचे का? कबीर, साई हे सारेच बाद करायचे काय?
३. संत शेख महमद, जैतून बी हे वारकरी परंपरा मानणारे, मग त्यांना मुस्लीम समाजातून बहिष्कृत करायचे काय?
४. इस्लाममध्ये व्याज घेणे हराम असताना मुस्लीम को ऑपरेटिव्ह बॅंका कशा चालतात हो?
५. दारू प्यायला मनाई असताना दारू पिणारे कसे चालतात हो?
६. इस्लाम म्हणजे शांती, मग अतिरेकी, तालीबानी, अंडर वर्ल्डच्या टोळ्यांना, गुन्हेगारांना कसा काय थारा मिळतो हो?
७. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे चित्र असायचे तर गुलाम हैदरच्या [टिपूचे वडील] शंकर पार्वतीचे ही आपली मिलिजुली विरासत आहे.
यादी खूप मोठी करता येईल.
हिंदूंची सर्वात लोकप्रिय भजनं मुस्लीम गीतकारांनी लिहिलीयत, संगीतबद्ध केलीयत नी गायलीही आहेत. आणि उलटेही झालेले आहे. मोहरम, पीराचा उरूस यात हिंदूही पुढाकार घेतात. हे टिकवायला हवे. संवाद बंद झाला तर अंतर वाढेल. धार्मिक सलोखा लयाला जाईल.
व्यवहार म्हणून गैर गोष्टी खपवून घेतल्या जातात, मग शेजारधर्म म्हणून इतर धर्मियांच्या बाबतीत सहिष्णू राहायचे की नाही? प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या काळात नमाज लाऊड स्पिकरवरून पढली जायची काय? गणपती, नवरात्र आदीतले डीजे गैरच. पण नमाजचे भोंगेही अनावश्यकच. तुमचा धर्म हा तुमचा घरगुती मामला आहे. तो रस्त्यावर आणायची गरज नाही. राज्यघटनेने विवेकाचे आणि धर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दुसर्याच्या विवेकबुद्धीवर जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
एका शासकीय प्रशिक्षण संस्थेत माझ्या एका उच्चपदस्थ मित्राने मुस्लीम समाजाचे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, निवारा, कुटुंब नियोजन आणि सच्चर कमिटीचा अहवाल यावर सर्वदूर प्रबोधन करण्यासाठी २०० कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला मुस्लीम समाजातील हजारो स्त्रिया व तरूणांनी प्रतिसाद दिला. त्यातल्या एका कार्यक्रमाला मंत्रालयातले एक अतिवरिष्ठ मुस्लीम अधिकारी उपस्थित होते. ते वक्त्यांचे आभार मानताना म्हणाले, "कुराणात सगळे काही सांगितलेले आहे. या कार्यक्रमाची गरजच नाही. सामाजिक- शैक्षणिक प्रबोधन हे कुराणाच्या विरोधात आहे. बंद करा हा कार्यक्रम."
आम्ही ज्यांनी ज्यांनी या २०० कार्यक्रमांच्या आयोजनात पदरमोड केलेली होती, त्यांना सर्वांना समारोप कार्यक्रमात बोलू दिले गेले नाही. कारण देण्यात आले, आम्हाला नॉन मुस्लीम चालत नाहीत.
अशाच प्रकारचे उपक्रम ख्रिश्चन, शिख, जैन, बौद्ध यांच्यासाठीही आयोजित केलेले होते. त्यातल्या एका कार्यक्रमाला एक अतिवरिष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू उपस्थित होते. त्यांनी भारतीय संत साहित्यावर पीएच.डी. केलेली होती. एका नॉन ख्रिश्चन वक्त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण त्यांना फार आवडले. त्यांनी त्यांच्या समाजाच्या एका मोठ्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले. मात्र ऎनवेळी तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता हे सांगा असे ते वक्त्यांना म्हणाले. वक्ता म्हणाला, "मी भारतीय संविधान मानतो. जात-धर्म हे माझ्यासाठी दुय्यम आहेत. ते मी कोणालाच सांगत नाही. पाळतही नाही. तुम्ही मला दिलेल्या विषयाशी त्यांचा काहीच संबंध नाही." तर धर्मगुरू म्हणाले, "मला आमच्या सर्वोच्च धर्मगुरूंकडून तुमच्या नावाला संमती घेताना तुमचा जात -धर्म सांगावे लागेल."
धर्मगुरूंनी अगदी ऎनवेळी निमंत्रण रद्द केले.
अगदी प्रेषित महंमद पैगंबरांच्या आधीपासून अफगाणिस्थानात असलेली Bamiyan बामियानची जागतिक वारसा हा दर्जा असलेली विशालकाय बुद्ध मुर्ती तालिबानी अतिरेक्यांनी २००१ मध्ये तोडली. हा पिसाटपणा निषेधार्हच होता.
मलाला युसुफझई या मुलीने तिच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेय की मी आधी स्वात खोर्यातली मुलगी आहे आणि नंतर मुस्लीम आहे.
मुस्लीम समाजातल्या या कट्टर पंथियांच्या वागण्यामुळेच त्याची प्रतिक्रिया म्हणून सामान्य हिंदूही दुरावत गेला आणि आजची सनातनी हिंदूंची चलती वाढली. त्याविरूद्ध आम्ही संघर्ष करीत असताना तुम्ही मुस्लीम समाजातले प्रागतिक लोक तुमच्यातल्या सनातन्यांविरूद्ध बोलणार की मौन धारण करणार?
-प्रा.हरी नरके, २६ सप्टेंबर, २०१८
No comments:
Post a Comment