Tuesday, September 18, 2018

बदलत्या ग्रामीण नातेसंबंधांचे पिळवटून टाकणारे चित्रण-



महानगरी जीवनावर मराठीत गेल्या अर्धशतकात फार ताकदीनं लिहिलं गेलंय. त्याचकाळातल्या ग्रामीण जीवनावरच्या धग, बनगरवाडी, माणूस अशांनी झपाटून टाकलेलं होतं. मात्र अलिकडच्या काळात नवं, ताकदीचं, आरपार हलवणारं कमी हाती लागत होतं. इडापिडा टळो, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आगळ, पोटमारा, जू, आलोक यांनी अस्वस्थ केलं होतं. नव्या लेखकांच्या या श्रेष्ठ कथा, कादंबर्‍या सुन्न करतात. त्यात आता मिलिंद जाधव यांच्या हक्कसोडची दमदार भर पडलेली आहे.

आपलं समकालीन ग्रामीण जीवन प्रचंड वेगानं बदलतंय. भौतिक सुबत्ता येतेय. तंत्रज्ञान प्रत्येक हातात पोचलंय. जागतिकीकरणाचे भलेबुरे परिणाम दिसु लागलेत. हातात पैसा आला की बाजारमूल्यं माणसाच्या मानगुटीवर स्वार होतात. तुमचं सगळं जगणंच कब्ज्यात घेतात. आतड्याची, रक्ताची नाती परकी होतात. हाव वाढली की माणसांचे इसम आणि इसमाचे जिन्नस बनतात. आता जगण्याची जुनी परिमाणं कालबाह्य झाली. मोडीत निघालीत.

जाधवांची हक्कसोड आकारानं बारीक चणीची कादंबरी आहे. अवघ्या ९२ पृष्ठांची. पण वेगवान. आरपार भिडणारी. अतिशय परिणामकारक. पार भोवंडून टाकणारी.
आपल्या समाजात लिंगभाव, जात आणि वर्ग ही भेदभावाची, शोषणाची केंद्रं मानली जातात. माय, बहीण, मुलगी म्हणजे मायेचा सागर. पण आता तो आपला भूतकाळ होतोय.
हा सागर केव्हाच आटलाय. लेकीबाळी कोण कोण्हाच्या राहिलेल्या नाहीत असा अनुभव घेणारा महिपत आपल्या पोटात खड्डा पाडतो. खेड्यातल्या जमिनींना सोन्याचा भाव येऊ लागला आणि पुर्वी इतर हक्कात असलेल्या बहिणी भावाइतक्याच जमिनीच्या मालक झाल्या. हे कायद्याचं पाऊल योग्यच होतं. आवश्यकही होतं.

सत्ता, पैसा आणि मालमत्ता ताब्यात आली की पुरूषसत्ताक मानसिकता जशी बेमुर्वतखोर, शोषक बनते तशी आजवर अपार सोसलेली स्त्री होणार नाही असा एक भाबडा आशावाद होता.
हक्कसोड वाचताना त्याचा पार चोळामोळा होतो.

३० वर्षांपुर्वी कोल्हापूरच्या विषमता निर्मुलन शिबिरात बोलताना मी म्हणालो होतो, "स्त्रिया सरकारी नोकरीत आल्या की भ्रष्टाचार कमी होईल." अध्यक्षस्थानी असलेल्या प्रा.लीला पाटील [ना.सी.फडके यांच्या कन्या] खो खो हसल्या आणि मला म्हणाल्या, "तू भाबडा आहेस. आजचा उपेक्षित उद्या जेव्हा सत्तेवर येतो, मग ती स्त्री असो, गरिब असो की जातीनं हलका मानला गेलेला असो, तेव्हा तोही सत्तेच्या भल्याबुर्‍या गुणधर्मांनी वेढला जातो. त्यात झिंगतो. बाळा त्यात स्त्री, पुरूष, जात, वर्ग असला फरक राहत नसतो."

जाधवांनी ही कादंबरी "काडी काडी जमवून हौसेनं विनलेलं आपलं घरटं, आपल्याच पिलांच्या स्वार्थी हातांनी विस्कटलेलं पाहणं ज्यांच्या नशिबी आलंय अशा हरेक मातापित्यांना " अर्पण केलीय.

तुकोबा म्हणतात, आईबाप कसे असतात तर, " ऎशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रिती." पण मुलं कशी असतात तर, "जग हे दिल्या घेतल्याचे." या उक्तींचा होरपळून सोडणारा अनुभव मिलिंद जाधव हक्कसोडमधून वाचकाला देतात.

लोकवाड्मय गृहाची दर्जेदार निर्मिती, सतीश भावसारांचे अप्रतिम मुखपृष्ठ आणि मिलिंद जाधवांची दाहक अनुभव देणारी, भावकल्लोळांचा झंजावात निर्माण करीत वाचकांना एकप्रकारे चांगल्या अर्थाने छळणारी, दमवणारी आणि प्रचंड अस्वस्थ करणारी कादंबरी. मराठीत नवं काहीच लिहिलं जात नाही अशी तक्रार यापुढे तुम्हाला करता येणार नाही.
मिलिंद जाधव हे एक मराठीतलं आश्वासक नाव बनतं आहे.

हक्कसोड, मिलिंद जाधव, लोकवाड्मय गृह, मुंबई, पहिली आवृत्ती- २०१८,पृष्ठे ९२, किंमत रूपये १००/-
लेखकाचा भ्रमणध्वनी-७३८५५ ९९६००, प्रकाशकांचा दूरध्वनी-०२२- २४३७६०४२/२४३६२४७४, इमेल lokvangmaya@gmail.com lokvangmayagriha@gmail.com

-प्रा.हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment