आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्यानेच त्याची हत्त्या केली. त्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. पोटच्या पोरीला, गरोदर मुलीला, जातीबाहेर लग्न केल्याची शिक्षा म्हणून जावयाची हत्त्या केल्याची तेलंगणामधली ही घटना संतापजनक आहे. नवविवाहीत अमृता वार्षिणी आपला पती प्रणय याला गमावून बसली. मुलीपेक्षा जात मोठी ही काय मानसिकता आहे?
कोल्हापूरची मेघा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णीच्या हत्त्येची घटनाही फार जुनी झालेली नाही. गेल्या पाचदहा वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या हत्यांना रानटी, जातीयवादातून केलेल्या निर्घृण हत्त्या म्हणण्याऎवजी ऑनर किलिंग म्हणणे हा तर मुर्खपणाचा कळस आहे.
नागराज मंजूळेंनी सैराट या मराठी चित्रपटाचा शेवट तेलंगणा राज्यात हैदराबादला झालेला दाखवलेला आहे. असे आणखी किती सैराट आपल्या आजूबाजूला घडणारेत?
कथासाहित्याचा जन्म भारतात झालेला आहे. पुराणकथा तर अतिशय रंजक, प्रभावी आणि खोलवर संस्कार करणार्या असतात. पुराणातील वांगी [वाणगी] पुराणातच ठिक आहेत असे आपण म्हणत असलो तरी त्यांचा प्रभाव अबोध मनावर पिढ्यानुपिढ्या टिकून राहतो. जाती व्यवस्थेचे पाईक तर सर्वच जातीजमातींमध्ये आहेत. जातीसाठी खावी माती ही वृत्ती सर्वांच्याच हाडीमाशी भिनलेली आहे.
फार पुर्वी पुराणातली मुरलीचरित्र नावाची कथा वाचनात आली होती. जुने किर्तनकार ती कथा सांगत असत.
पैठणला एक अस्पृश्य समाजातला बुद्धीमान मुलगा राहत असतो. तो एका संस्कृत पंडीताच्या घरी गोठा स्वच्छ करण्याचे काम करीत असे. पंडित म्हणत असलेले मंत्र, श्लोक गायाबैलांचे शेण काढताना, गोठा झाडताना त्याच्या कानावर पडत असत. तो मुलगा एकपाठी होता. एकदा ऎकलेला शब्द तो कधीच विसरत नसे. अल्पावधीत त्याला असंख्य मंत्र आणि श्लोक यांचे ज्ञान झाले. तो ते घडाघडा म्हणत असे.
एके दिवशी त्याने आपला गाव सोडला. तो पायी चालत पार नाशिकला गेला. तिथे गोदातीरावर आंघोळ करीत असताना तो म्हणत असलेले मंत्र शेजारच्या भटजींच्या कानावर पडले. त्याचे त्या लहान वयातले स्वच्छ आणि लयदार उच्चार ऎकून भटजी प्रभावित झाले.
त्यांनी त्याची आपुलकीनं विचारपूस केली.
मुलाने घाबरून जाऊन आपली जात चोरली. कुल,गोत्र सारंच बनवून सांगितलं. आपण पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न अशा महामहोपाध्यायांच्या घराण्यातले असल्याचे त्याने खोटेच सांगितले. आपले आईवडील महापुरात वाहून गेल्याचेही पुढे सांगितले. भटजी त्याला आपल्या घरी घेऊन गेले. त्याला जेवायला घातले.
त्याच्या पु्ढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुलगा गुणी होता. बुद्धीमान आणि कर्तबगार होता. म्हणताम्हणता त्याने नाव काढले.
अल्पावधीतच तो मुलगा सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. भटजींनी त्याला आपला घरजावईच करून घेतले.
त्याची पत्नी सुशील होती. तिचे पतीवर प्रेम होते.
मला एकदा माझे सासर बघायचे आहे, मला गावी घेऊन चला असा ती हट्ट करी. तो काहीतरी सबबी सांगून वेळ मारून नेई.
एकदा मात्र त्याची पत्नी हट्टाला पेटली. तिने अन्नपाणी वर्ज्य केले. त्याचा अगदीच नाईलाज झाला.
ते दोघे त्याच्या गावी निघाले.
तो चिंतित होता. आता आपले भांडे फुटणार या भितीने घाबरला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. गुन्हा कबूल करावा तर बायको अंतरेल अशी भिती वाटत होती.
घनदाट जंगलातून जात असताना त्याने एका विहीरीत बायकोला ढकलून दिले आणि तो नाशिकला परत आला.
तुमची मुलगी विहीरीत पाणी पिताना पाय घसरून पडली आणि बुडाली असे त्याने सासू-सासर्यांना खोटेच सांगितले.
त्यांनी अपार शोक केला.
असेच दिवस जात होते.
एके दिवशी त्याची बायको साक्षात सुखरूप हजर झाली. तिला बघून तिच्या आईवडीलांना अपार आनंद झाला. तिचा नवरा मात्र खूप घाबरला.
त्याच्या पत्नीने मात्र त्याला सावरून घेतले. माझा पाय घसरून मीच विहीरीत पडले. यांना पोहता येत नसले तरी यांनी मला वाचवायचे खूप प्रयत्न केले वगैरे कथा तिने तयार करून सांगितली.
त्याचा जीव भांड्यात पडला. तिने आपल्याला वाचवले या जाणीवेने तो भारावून गेला. विहिरीत उगवलेल्या एका पिंपळाला आपण लटकून राहिलो आणि काही दिवसांनी तिकडून जात असलेल्या सैनिकांच्या टोळीने आपल्याला कसे वाचवले याची चित्तथरारक कथा तिने त्यांना सांगितली.
रात्री एकांतात असताना त्याने तिचे पाय धरले. मी चुकलो म्हणून तिची क्षमा मागितली.
तिने नवर्याला माफ केले. पावसाने झोडपले आणि नवर्याने मारले तर तक्रार करू नये असे तिचे संस्कार सांगत होते. ती पतिव्रता असल्याने तिच्या पतीला तिच्या हत्त्येचा गुन्हा माफ वगैरे होता.
आपण तिची हत्त्या करण्याचा प्रयत्न केला तरी तिने उदार मनाने आपल्याला माफ केल्याचे बघून त्याचे डोळे पाणावले. तिला आता सगळे खरेखरे सांगून टाकावे असे त्याला वाटले. त्याला बायकोबद्दल पुर्ण विश्वास वाटू लागला. आपण जात चोरल्याचे त्याने त्याभरात तिला सांगून टाकले.
ती अंथरूणातून ताडकन उठली.
म्हणाली, "माझी हत्त्या तुम्हाला माफ आहे. पण तुम्ही जात चोरलीत हे मात्र कधीच क्षम्य नाही."
तिने नवर्याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला पेटवून दिले. जाळून मारले. संपवून टाकले.
पुढे तिथे उगवलेल्या बांबूंच्या मुरलीतून ही कथा चिरस्थाई झाली.
-प्रा. हरी नरके, १९ सप्टेंबर २०१८
No comments:
Post a Comment