Wednesday, September 5, 2018

आणि उपराष्ट्रपती पुण्याच्या संस्थेच्या निवडणूकीत पराभूत झाले -


प्रा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती असताना पुण्यातल्या एका संशोधन संस्थेच्या निवडणुकीला उभे होते.
ते निवडणुकीत चक्क पराभूत झाले.
त्यांना फार मोठा धक्का बसला.

एका आंतरराष्ट्रीय सेमिनारच्या निमित्ताने त्यांनी संस्थेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना दिल्लीला निमंत्रित केले.

रात्री उपराष्ट्रपती बंगल्यावर स्वागत समारंभाचे आयोजन करून सर्व उपस्थितांना भोजनाला बोलावले.

जेवन झाल्यावर अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे निवडणुकीतील पराभवाचा विषय काढला.

पदाधिकारी म्हणाले, "तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु तुम्ही देशाचे उपराष्ट्रपती आहात. राज्यसभेच्या कामांमध्ये व्यस्त असाल. तुम्ही आमच्या संस्थेला वेळ देऊ शकणार नाही. आम्हाला संस्थेच्या कामांसाठी पूर्णवेळ देणारा पदाधिकारी हवाय.

तुम्ही निवृत्त झाल्यावर अवश्य पुन्हा निवडणूक लढवा. आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून देऊ. मात्र तेव्हा तुम्ही संस्थेला तुमचा वेळ द्यायला हवा."

उपराष्ट्रपतींना हे खडे बोल सुनावणारे ते पदाधिकारी सत्शील होते. जागतिक किर्तीचे महान संशोधक होते. त्यांचा नैतिक दबदबा एव्हढा होता की दस्तूरखुद्द उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनासुद्धा त्यांचे म्हणणे मान्यच करावे लागले.

-प्रा.हरी नरके, ५ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment