Wednesday, September 5, 2018

२०० आदिवासी राजपत्रित अधिकारी घडवणारे जाधवगुरूजी -



मुंजवाड ता. सटाणा, जि.नाशिक येथील एक शिक्षक निंबा मुका जाधव,
त्यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला पंचक्रोशीतून हजारो लोक आले होते.

मी बघत होतो, त्यात किमान २०० तरी राजपत्रित अधिकारी होते. ते मंत्रालयातून, विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमाला आले होते. आख्खं गाव सजलं होतं.
एका सामान्य शिक्षकाच्या अमृतमहोत्सवी सत्काराला एव्हढी प्रचंड उपस्थिती, एव्हढा अमाप उत्साह, सुमारे १० ते १२ हजार लोक हे मला एक कोडंच वाटत होतं.

आयुष्यातली सुमारे ३५ वर्षे जाधवगुरूजी नित्यनेमानं दररोज पहाटे घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना झोपेतून जागं करायचे, त्यांना शाळेत घेऊन यायचे. पहाटेच्या प्रसन्न वेळी त्यांचा अभ्यास घ्यायचे. सकाळी ८ वाजता मुलं आपापल्या घरी जाऊन अंघोळ, नास्ता करून परत ९ वाजता शाळेत यायची. प्रत्येकाला अवघड वाटणारा विषय सर त्यांना सोपा करून समजावून सांगायचे. शंकानिरसन करायचे. अभ्यासाची भिती गेली पाहिजे, पुस्तकांशी आणि  निसर्गाशी दोस्ती झाली पाहिजे हे सरांचे सुत्र.

दुपारी ११ ते ५ शाळा भरायची. जाधवगुरूजी गुणी शिक्षक होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. शिस्तीला करडे पण अतिशय मायाळू.

परत संध्याकाळी तासभर खेळ आणि ३ तास ज्यादा अभ्यास सर करून घ्यायचे.

गोरगरिब आदीवासी मुलांची उत्तम तयारी व्हायची. सर पुढं मुलांना स्पर्धा परीक्षेला बसवायचे. त्यांची सर्व तयारी करून घ्यायचे.

पगाराव्यतिरिक्त सर एक पैसाही कोणाकडून घ्यायचे नाहीत.

३५ वर्षात सरांची २०० पेक्षा अधिक मुलं राजपत्रित अधिकारी झाली.
मी सरांना विचारलं, "सर, ही प्रेरणा कोणाची?"

ते हसत म्हणाले, "ही प्रेरणा माझ्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची. अहो, ही गोरगरीब आदीवासी मुलं. अतिशय मेहनती आणि बुद्धीमान. परंतु तांत्रिक सराव कमी पडायचा, अभ्यासाची गोडी नसायची आणि ती नापास व्हायची.
मी ठरवलं, आपण सावित्रीबाई, महात्मा फुले, कर्मवीर, बाबासाहेब यांचं नाव घेतो. मग त्यांना अभिप्रेत असलेलं काम आपण का करू नये?"

त्यांचा सत्कार करताना मला भरून आलं. त्यांना सत्काराला मंत्री, राजकीय नेते, सेलीब्रिटी कोणालाही बोलावणं सहज शक्य होतं. त्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला.

होय, या महाराष्ट्रात असेही शिक्षक आहेत. ऎशी कळवळ्याची जाती! करी लाभाविन प्रीती!

त्यांच्या नातवाची विद्यापिठाच्या एका कार्यक्रमात भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरूजींचं मध्यंतरी निधन झालं.
अशा प्रतिभावंत आणि व्रतस्थ शिक्षकांनीच हा प्रगतीशील महाराष्ट्र घडवलेला आहे.
दिवंगत निंबा मुका जाधवसरांना विनम्र श्रद्धांजली.
-- प्रा.हरी नरके, पुन:प्रकाशित, ५ सप्टेंबर, २०१८

No comments:

Post a Comment