Monday, June 24, 2019

मराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्री












मराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्र्यांचे सुचक विधान-
मायमराठीसाठी साहित्यिकांचा एल्गार- प्रा.हरी नरके
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्षे होत आलीत, आणि तरिही मराठीच्या भल्यासाठी साहित्यिक व साहित्यप्रेमींना रस्त्यावर उतरायची वेळ येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या साठ वर्षात प्रथमच विविध २५ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आणि साहित्यिक आज मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटले.
माजी संमेलनाध्यक्ष साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोत्तापल्ले, अ. भा. म. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतुकराव ठालेपाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, विदर्भ साहित्य संघाचे रवींद्र शोभणे, मराठी अभ्यास परिषदेचे प्रा. दीपक पवार, चित्रपट महामंडळाच्या वर्षा उसगावकर, द.म.सा.परिषदेचे विजय चोरमारे, ग्रंथालीचे दिनकर गांगल,खासदार भालचंद्र मुणगेकर आणि अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा.हरी नरके आदींच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ ते ५ असे धरणे आंदोलन करण्यात आले. मराठीचे गोमटे व्हावे यासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी, कवी, साहित्यिक यांचा यात पुढाकार होता.
यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी असे आश्वासन दिले की मराठीच्या अभिजात दर्जाची सर्व पुर्तता झालेली आहे. हा दर्जा मिळवण्याचे काम तुम्ही माझ्यावर सोपवा, मी ते लवकरच करून दाखवतो. त्यांनी पुढे असेही सुचित केले की येत्या २  महिन्यातच मी हा दर्जा मिळवून देतो.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय २००९ सालीच घेण्यात आलेला होता. पण इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळा हा निर्णय जुमानत नव्हत्या.त्यासाठी शिक्षेची तरतुद करणारा कायदा आपण १ महिन्यात वटहुकुमाद्वारे करू असेही ते म्हणाले.
मुंबईत मराठी भवन व्हावे यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही ते म्हणाले.
-प्रा.हरी नरके, २४ जून २०१९

No comments:

Post a Comment