Tuesday, June 18, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वसंत मून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वसंत मून-प्रा.हरी नरके
भारतरत्न आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे समाजक्रांतीच्या विचारांचा वैश्विक ठेवा. त्यांच्या लेखन आणि भाषणांचे २२ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्याशिवाय त्यांच्या सोर्स मटेरियलचे/चरित्रपर मजकूराचे आणखी २ खंड प्रकाशित केलेत ते वेगळेच.

हे क्रांतिकारी साहित्य शासनामार्फत प्रकाशित करण्याचे काम अतिशय मेहनतीचे, जिकीरीचे आणि जोखमीचे काम होते. स्मृतीशेष वसंत मून हे तहसीलदार होते. त्यांनी शासनाकडे डेप्युटेशनवर [प्रतिनियुक्ती] येऊन आयुष्यभर हे काम केले. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांच्यासोबत दहा वर्षे काम करण्याची सुवर्णसंधी मला लाभली. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. ते अतिशय कडक स्वभावाचे व शिस्तीचे आणि कामात संपूर्ण झोकून देणारे होते.

त्यांनी बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषण मालिकेतले खंड १ ते १६ प्रकाशित केले. त्यांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मला बाबासाहेबांच्या लेखन, भाषणे, पत्रव्यवहार आणि छायाचित्रांचे खंड १७ ते २२ चे  एकुण ११ ग्रंथ प्रकाशित करता आले. हा माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. माझी टेल्कोची अधिकारपदावरची नोकरी सोडून मी शासनाची ही जबाबदारी स्विकारली होती आणि ती पुर्ण केली याचा मला अभिमान आहे.

वसंत मून यांनी आपले संपुर्ण आयुष्य बाबसाहेबांवरील संशोधनाला वाहून घेतलेले होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तोवर ते फक्त बाबासाहेबांवर काम करीत होते. पुराव्याशिवाय एकही वाक्य लिहायचे अथवा छापायचे नाही हे त्यांचे ब्रीद होते.

बाबासाहेबांची आजवर शेकडो चरित्रे प्रकाशित झालेली आहेत. त्यातले सर्वात प्रदीर्घ म्हणजे १ ते १२ खंडांचे चरित्र लिहिणारे चां.भ.खैरमोडे हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते. त्यांनी मिशनरी वृत्तीने हे काम केले.
बाबासाहेबांचे संपुर्ण अधिकृत, संशोधित, अद्ययावत आणि विश्वासार्ह चरित्र तुम्हाला वाचायचे असेल तर ते वसंत मून यांनी लिहिलेले आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थेने म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली यांनी ते प्रकाशित केलेले आहे. १९९१ सालचा हा ग्रंथ १८६ पृष्ठांचा आहे. त्याचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झालेले आहेत.

बाबासाहेबांच्या शालेय शिक्षणाबाबत काही कार्यकर्त्यांना पुरेशी माहिती नसते. तर काहींचा संभ्रम असतो.
सुभेदार रामजींनी सातार्‍यातल्या सदर बाजार भागात ते राहत असताना भिवाला वयाच्या ६ व्या वर्षी घराजवळच्या कॅंप स्कूलमध्ये घातले. ही लोकल बोर्डाची शाळा होती. तिथे भिवाचे मराठी पहिली ते तिसरीचे शिक्षण झाले.

त्यानंतर इयत्ता चौथीत म्हणजे इंग्रजी पहिलीत त्यांना सातारा हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. [ आत्ताचे प्रतापसिंह महाराज हायस्कूल] येथे त्यांना ७.११.१९०० रोजी प्रवेश देण्यात आला.

प्रा.हरी नरके, १८ जून २०१९
#आंबेडकर #वसंतमून

No comments:

Post a Comment