आजपासून पूजा बंद- प्रा.हरी नरके
पन्नास वर्षे संसार केल्यानंतर, नातवंडांची लग्न झाल्यानंतर माझ्या आत्याला तिच्या नवर्यानं सोडलं. कारण काय तर बायको मला आवडत नाय.
आत्या तिच्या माहेरी म्हणजे आमच्याकडं येऊन राहू लागली.
वटसावित्री पौर्णिमेला हाच नवरा सात जन्म मिळो अशी प्रार्थना करीत तिनं वडाला फेर्या मारल्या. त्याची मनोभावे पूजा केली.
मी तिला विचारलं," अगं आत्या, त्यानं तुला सोडलं. मग कशाला हवा हाच नवरा सात जन्मं?"
ती म्हणाली, " त्यानं त्याचा धर्म सोडला. म्हणून आपण आपला सोडू नये बाळा."
पुढच्या वर्षी ती पुन्हा पुजेला निघाली.
मी तिला म्हटलं, " अगं, त्यानं तुला सोडून दुसरी बायको केली. आता तिही सात जन्मं हाच नवरा मागणार. तुही मागणार. याचा अर्थ तुला पुढची सात जन्मं हीच सवत मिळणार. बघ बाई!"
आत्यानं ताडकन हातातलं पुजेचं ताट खाली ठेवलं. म्हणाली, " मला सवत नको. आजपासून पूजा बंद."
- कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" या आत्मकथनातून
- प्रा.हरी नरके, १६ जून २०१९
No comments:
Post a Comment