Monday, June 10, 2019

तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण?
तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? -प्रा.हरी नरके
"आमची घरची खूप गरिबी होती. जगन्नाथ शंकरशेट यांच्या शाळेत माझ्या मोफत शिक्षणाची सोय झाली होती. या शाळेत केशवराव नावाचे एक शिक्षक होते. ते ब्राह्मण होते. मला मोफत शिक्षण मिळत असे याचे त्यांना वैशम्य वाटे. " मोफत शिक्षण फक्त ब्राह्मण मुलांनाच मिळावे, इतरांना नाही" असे ते म्हणत असत. मी आजारी पडल्याने माझा पहिल्या पाचातला नंबर खाली गेला. तेव्हा ते म्हणाले, " फी भर नाही तर शाळा सोड."
दुसर्‍या दिवशी माझे वडील त्यांना भेटले. खुप गयावया करून ते म्हणाले, " माझा मुलगा हुशार आहे, त्याला पुढे शिकू द्या,मी तुमच्या पाया पडतो."
केशवराव फार कठोर होते. ते म्हणाले, "जमणार नाही. तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? चालते व्हा. कसलातरी धंदा शिका."
माझ्या वडीलांच्या डोळ्यात आसवे आली. पण केशवराव नरम झाले नाहीत.
वडील मला घेऊन हेडमास्तरांना भेटले. ते थोर मनाचे होते. त्यांनी केशवरावांना बोलवून घेतले आणि सांगितले, " मी या मुलाच्या वर्गावर अनेकदा गेलो आहे. वर्गातला तो सर्वात हुशार मुलगा आहे. आजारपणामुळे तो या महिन्यात मागे पडला. त्याला वर्गात बसू द्या. शिकू द्या.हा माझा आदेश आहे." तेव्हा त्यांचा निरूपाय झाला.
ते थोर मनाचे मुख्याध्यापक म्हणजे कृष्णशास्त्री गोडबोले.."
-गुरुवर्य कृष्णराव अर्जून केळूसकर, आत्मचरित्र आणि चरित्र, [ लेखनकाळ- १९३४] संपादक, धनंजय कीर, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, १९६१, दुसरी आवृत्ती २०१४, पृ. २८/२९
-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

No comments:

Post a Comment