Sunday, June 9, 2019

किरांनी चरित्रलेखनासाठी बाबासाहेबांकडे मागितली होती परवानगी-






"आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
मला आपले चरित्र लिहायचे आहे. कृपया मला परवानगी मिळावी.

मी मुंबई म्युनिसिपाल्टीत शिक्षण विभागात काम करतो. मी सामान्य भंडारी कुटुंबातून आलो असून माझे शिक्षण अवघे मॅट्रीक आहे. माझे पुस्तक लिहून झाल्यावर आपण ते मला वाचून त्यात काही चुका, उणीवा किंवा कमतरता असल्यास त्या दुरूस्त्या करून द्या. त्यानंतरच मी आपले चरित्र प्रकाशित करीन."
असे पत्र धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिले होते. पुणे आकाशवाणीतील अधिकारी आयु. जाधव हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या मार्फत किरांनी हे पत्र बाबासाहेबांकडे पोचवले.
बाबासाहेबांनी त्यांना त्वरित उत्तर पाठवले.

" मी सार्वजनिक जीवनात वावरतो. त्यामुळे माझे चरित्र लिहिण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. तुम्ही अवश्य लिहा. मी लोकशाहीवादी आहे. मला कोणत्याही प्रकारची सेनसॉरशीप मान्य नाही. त्यामुळे तुमचे पुस्तक हस्तलिखित स्वरूपात मी आधी वाचणे म्हणजे म्हणजे तुमच्या विचारांना कात्री लावणे होय. ते मी करणार नाही. तुमचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मी नक्की वाचीन. त्यात काही चुकीचे असेल तर तशी जाहीर प्रतिक्रिया देईन."

यावरून बाबासाहेबांचा मनाचा मोठेपणा, मोकळेपणा, उदारता आणि लोकशाहीनिष्ठा यावर प्रकाश पडतो. गरिब भंडारी कुटुंबात जन्मलेले, अवघे मॅट्रीक झालेले, म्युनिसिपाल्टीत लेखनिकाचे काम करणारे कीर पुढे जागतिक किर्तीचे चरित्रकार झाले.

त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत २० पुस्तकं लिहिली. त्यांच्या असंख्य आवृत्त्या निघाल्या. महात्मा फुले, राजर्षि शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सीताराम केशव बोले ही त्यांची चरित्रे खूप गाजली.

"Dr. Ambedkar: Life and Mission " हा ग्रंथ लिहिण्यापुर्वी किरांनी बाबासाहेबांच्या अनेक गाठीभेटी घेतल्या. प्रत्येक महत्वाच्या तपशीलांची त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली. बाबासाहेब व त्यांचे अनेक निकटवर्तीय यांच्याकडून माहिती, कागदपत्रे घेऊन किरांनी हे इंग्रजी चरित्र लिहिले. त्यासाठी कागदपत्रांचा व दस्तऎवजांचा शोध घेण्यासाठी किरांनी वर्षानुवर्षे काम केले. हा ग्रंथ १९५४ मध्ये  प्रकाशित झाला.

बाबासाहेबांनी तो ग्रंथ वाचला. बाबासाहेबांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. उलट त्यांना किरांची ही धडपड बरी वाटली असावी असे किरांनीच मला आमच्या प्रत्यक्ष भेटीत सांगितले. "कृतज्ञ मी कृतार्थ मी" हे किरांचे आत्मचरित्र आहे. त्यात या आशयाचा मजकूर आलेला आहे.

त्यानंतर त्या चरित्राचे मराठी भाषांतर करण्याऎवजी किरांनी आणखी मेहनत घेऊन बाबासाहेबांचे नविन माहितीसह बृहद मराठी चरित्र लिहिले. त्यांच्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी चरित्राच्या [प्रथमावृत्ती १९६६ ] आजवर ४ आवृत्त्या निघाल्या आणि पुढे त्याची ९ पुनर्मुद्रणेही प्रकाशित झाली. या ग्रंथाला अनेक पुरस्कार मिळाले. त्याची बहुतेक सर्व भारतीय भाषांध्ये भाषांतरे प्रकाशित झालेली आहेत.

किरांना डी.लिट. आणि पद्मभुषण हे सन्मान लाभले.

म्हातारपणी लेखन वाचनाने त्यांचे डोळे बिघडले तर ते लिहावाचायला मोठे भिंग वापरत असत. आयुष्यभर चाळीतल्या एका खोलीत राहून किरांनी व्रतस्थपणे ज्ञाननिष्ठा जपली. २३ एप्रिल १९१३ ला जन्मलेले कीर १२ मे १९८४ ला गेले.

बाबासाहेबांना महात्मा फुल्यांचे चरित्र लिहायचे होते.मात्र त्यांच्या प्रचंड व्यस्ततेत ते जमले नाही. तुम्हाला वेळ मिळाला नाही तर मी महात्मा फुल्यांचे चरित्र लिहिन असा शब्द किरांनी बाबासाहेबांना दिला व तो पाळला.
त्यांच्या विचारांवर सावरकरांचा प्रभाव होता. त्यांच्या लेखणातून तो दिसतो अशी त्यांच्यावर टिकाही झाली. मात्र महात्मा फुले, राजर्षि शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सीताराम केशव बोले यांच्या चरित्र लेखनासाठी किरांनी उपसलेल्या कष्टांना तोड नाही. घरात लेखनविषयक कोणतीही पार्श्वभुमी नसताना किरांनी मराठी व इंग्रजीतून लिहिलेली चरित्रे विद्वतमान्य आणि वाचकप्रिय ठरली.

-प्रा.हरी नरके, ९ जून २०१९

No comments:

Post a Comment