Wednesday, March 15, 2017

पुतळावती

सतत भडकलेली आणि मग्रूर देहबोली!
मला व्यक्ती अभिप्रेत नसून या वृत्तीविरूद्ध माझी तक्रार आहे.
सतत मग्रूर आणि भांडकुदळपणाचे भाव चेहर्‍यावर असलेले नेते मला अजिबात आवडत नाहीत. असले सगळेच नेते डोक्यात जातात. लोकशाहीला ही वृत्ती अतिशय घातक. हिटलर ज्या पिठाच्या गिरणीतले पीठ खायचा तिथलेच पीठ ही मंडळी खात असणार. यांना मार्दव, कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा नावालाही माहित नसतो. जणु हे जुने क्रूर संस्थानिकच.
ही टिका त्यांच्या अनुयायी/भक्त /चाहत्यांना आवडणार नाही पण भारतीय संविधानाने मला दिलेल्या अधिकाराचा ती अविभाज्य अंग आहे. ही टिका व्यक्तीगत नसून विभुतीपुजा आणि हुकुमशाहीवृत्ती याविरूद्ध आहे.
आज परम आदरणीय महिला नेत्या असलेल्या एका भगिनींवर लिहायचे ठरवलेय. क्रमश: इतरांवरही लिहिणारच आहे. खरंतर एका महाप्रदेशावर यांनी अनेकवार सत्ता गाजवलीय. गरिबांच्या मसिहा म्हणुन लोक त्यांना डोक्यावर घेतात. ही कर्तबगारी त्यांची एकटीची नसून ती त्यांना वारशात मिळालीय. त्यासाठी लाखो कार्यकर्त्यांचे श्रम आहेत, अपार मेहनत आणि त्याग आहे. पण बाईंनी सिंहासनावर बसल्याबसल्या एकेका त्यागी आणि समर्पित असलेल्यांची हाकालपट्टी करून पक्ष ही खाजगी मालमत्ता बनवला.
या नेत्यांचे गुगलवर हजारो फोटो आहेत. ते बघताना हे जाणवते की त्यांची देहबोली कमालीची मग्रूर, मिजासखोर आणि सरंजामी मानसिकता दर्शवणारी आहे. त्यांच्या फोटोंमध्ये 1 टक्क्यांपेक्षाही कमीच फोटो प्रसन्न किंवा हसतमुख आहेत. बाकी सारेच समोरच्याला खाऊ की गिळू असले.
ह्या उत्तर भारतीय महिला नेत्यांचे नाव आपुलकीसुचक पण चेहर्‍यावर आपलेपणा नावापुरताही नाही. सतत भांडकुदळपणाचा भाव. आवाज कर्कश्श. सदैव भडकलेल्या पोझमध्ये.
सपाटून पराभव झाल्यानंतर सुद्धा जनतेने आपल्याला का नाकारले याचे आत्मपरिक्षण करायची काडीमात्र इच्छा नाही. या बाईंनी आयुष्यात कधी एखादे पुस्तक म्हणून हातात धरले असेल असे वाटत नाही. आजही या बाई दुसर्‍यांनी लिहून दिलेली भाषणे जाहीर सभांमधून कृत्रिमपणे वाचीत असतात. त्यात सामान्य माणसाविषयीचा कळवळा, आपुलकी, मार्दव यांचा लवलेशही नसतो.
त्यांना स्वत:चे पुतळे उभारण्याचा आणि राजमहाल / हवेल्या बांधण्याचा इतका हव्यास की सारा देश त्यांना पुतळावती म्हणूनच ओळखतो.
ही मिजास, मग्रूरी आणि एकारलेली वृत्ती कोणामध्येही असली तरी ती चुकच.
कायम तारणहार पोझ. त्यांच्यापेक्षा सर्वच बाबतीत सवाई मार्केटींगवाला निवडणुकीच्या रणमैदानात भेटल्यावर पराभव तर होणारच ना?
मागे त्यांच्या अतिशय जवळच्या एका विचारवंत नेत्याला मी महात्मा फुले, बाबासाहेब व सावित्रीबाईंबद्दल काही नवी माहिती दिली व ती संधी मिळाल्यास हायकमांडपर्यंत पोचवा असे सांगितले. ते पटकन म्हणाले, सर आमच्या नेत्यांपुढे आम्ही सारेच माना खाली घालून उभे असतो, त्या सिंहासनावर बसलेल्या असतात आणि त्यांनी जेव्हढे विचारलेय तेव्हढीच माहिती आम्ही त्यांना देतो. त्यांनी न विचारलेले काहीही बोलायची, अगदी एक शब्दसुद्धा बोलायची आम्हाला परवानगी नसते.
ही जर त्यांच्या निकटवर्तीय राष्ट्रीय नेत्याची स्थिती असेल तर मग सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल?
मला हे माहित आहे की ही खरमरीत टिका त्यांच्या अनुयायी/ भक्त / चाहत्यांना आवडणार नाही. मला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच मी हे लिहू शकतो. ही टिका व्यक्तीगत न घेता विभुतीपुजा आणि हुकुमशाहीवृत्ती याविरूद्धची टिका म्हणुन तिच्याकडे बघावे..

No comments:

Post a Comment