’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?... मी दलित आहे... एकेकाचं थोबाड रंगवलं असतं...’ अशी काव्यमय सुभाषिते आज धुळवडीच्या पार्श्वभुमीवर जन्माला घातल्याबद्दल राज्य सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
कांबळे यांनी जातीय विधान करून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असाही आरोप केला जातो. तथापि ब्राह्मणांच्या भावनांना स्वत: ब्राह्मणच फारसे महत्व देत नाहीत असे आमचे पुण्यातील वार्ताहर कळवतात. भावना दुखावण्याचे पेटंट या समाजाने स्वखुषीने केव्हाच मुळामुठेत [विसर्जित केल्याची] बुडवून टाकल्याची ऎतिहासिक नोंद भारत इतिहास संशोधक मंडळात सापडली आहे.
"मंत्रीमहोदय हे पुण्याचे आहेत. भाषेच्या वापराबद्दल त्रिवर्षीय प्रशिक्षित/ संस्कारीत असल्यानेच ते विशेष दक्ष असतात. पुण्याची भाषा विदर्भ, मराठवाड्यातील मंडळींना समजली नसल्यानेही काही घोळ झाले असावेत आणि त्यामुळे लोक चिडले असावेत. पुण्यात श्रीमुख, मुखचंद्रमा, प्रियवदन, चेहरा अशा प्रिय शब्दांना प्रतिशब्द [समानार्थी शब्द ] म्हणून थोबाड, मुस्काड, कानफाट आदी "अतिप्रिय" शब्द वापरले जातात. या शब्दांमध्ये असलेला गोडवा, त्यातली आपुलकी महत्वाची. आपले विरोधक आपल्याला इतके "परमप्रिय" आहेत की आपण त्यांच्या तोंडाला रंग लावून त्यांना रंगीबेरंगी केले असते, त्यांचा मुळचा मेकप बिघडणार नाही अशी खबरदारी घेत त्यांना रंगरंगोटी केली असती असे श्री कांबळे यांना म्हणायचे होते." असा खुलासाही पुण्याच्या एका भाषातज्ञांनी केलेला असल्याचे मा.मु.कार्यालयाने निदर्शनास आणून दिले आहे.
मंत्रीमहोदयांची ही भाषा हिंसक असल्याचाही एक क्षीण आरोप पुढे आला आहे.
तथापि आज देशभर धुळवड असल्यानं मंत्रीमहोदय रंगवण्याबद्दल बोलत होते, आणि त्यासाठी ते मा.मु. यांच्या खास सुचनेवरून पर्यावरणपुरक रंगांचा शोध घेण्याच्या मोहिमेवर आज लातूरला आले होते.
तथापि आज देशभर धुळवड असल्यानं मंत्रीमहोदय रंगवण्याबद्दल बोलत होते, आणि त्यासाठी ते मा.मु. यांच्या खास सुचनेवरून पर्यावरणपुरक रंगांचा शोध घेण्याच्या मोहिमेवर आज लातूरला आले होते.
कांबळेंच विधान शाश्वतधर्म म्हणून जातीवाचक वाटलं तरी ते आपदधर्म म्हणून तसं नाही.शिवाय "ब्राह्मण घाबरट असतात" हे आपले विधान त्यांनी [करण्याआधीच] मागे घेतलेले असल्यानं आता त्याचं कोणीही भांडवल करू नये, असा आदेशही खुद्द मा.मु. कार्यालयातर्फे निर्गमित करण्यात आल्यानं त्यावर पडदा पडलेला आहे.
"सध्या सगळे विरोधी पक्ष निवडणुक पराभवाचा शोक, आत्मचिंतन आणि होळी/धुळवडीत मग्न असल्यानं काही विरोधी नागरिक मात्र या शब्दांवरून अन्यथा राजकारण करीत असल्याचे सीबीआयला आढळून आलेले आहे." असंही सरकारी सुत्रांकडून सांगण्यात येतं.
लवकरच निवडणुकोत्तर मंत्रीमंडळ फेरबदल होणार असल्यानं श्री कांबळे यांची जागा खाली करून घेणे सोयीचे ठरावे यादृष्टीने केलेले हे विधान असावे असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विधानभवनात शेतकरी कर्ज माफीवरून अधिवेशनादरम्यान वातावरण तापलेले असताना त्याऎवजी हा खमंग मसाला पुरविण्याची सुचना त्यांना संसदीय कार्य मंत्र्यांकडून करण्यात आली असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
No comments:
Post a Comment