Tuesday, March 28, 2017

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास
जेआरडी टाटा एअर इंडीयाचे चेअरमन होते. एकदा त्यांना कलकत्त्याला जायचे होते. ते बोर्डींग पास घेत असतानाच एक प्रवासी धावतपळत आला. त्याला अर्जंट कलकत्त्याला जायचं होतं. विमानात तर एकही जागा शिल्लक नव्हती. जेआरडींनी आपले तिकीट कॅन्सल केले आणि ते त्या प्रवाशाला द्यायला लावले. त्यानं जाताना जेआरडींचे खुपखुप आभार मानले.
काऊंटरवरचा कर्मचारी जेआरडींना म्हणाला, "सर, तुम्ही तिकीट रद्द करून त्यांना का दिले?"
जेआरडी म्हणाले, "अरे ते संघानिया नावाचे उद्योगपती आहेत. त्यांची आई आजारी आहे. तिला भेटायला तातडीनं कलकत्त्याला पोचणं आवश्यक होतं त्यांना. माझं काय मी नंतरच्या फ्लाईटनं गेलो तरी चालण्यासारखं आहे. शिवाय मी चेअरमन असल्यानं मला तिकीट मोफत आहे. पण ते पैसे भरणार होते. तेव्हा गरजू ग्राहकाला प्राधान्य द्यायचं हे नेहमी लक्षात ठेव."
.............
एकदा जेआरडी दिल्ली-मुंबई फ्लाईटनं प्रवास करीत होते. ते स्वच्छता गृहात जाऊन बराच वेळ झाला म्हणून हवाई सुंदरीला काळजी वाटली. चेअरमन आहेत, शिवाय म्हातारं माणूस आहेत. तेव्हा बघितलेलं बरं म्हणून तिनं जाऊन दरवाजावर टकटक केलं.
जेआरडींनी दरवाजा उघडला, तिनं पाहिलं, त्यांच्या हातात कापडाचे रूमाल होते, ते नीट लावून ठेवत होते.
ते तिला, म्हणाले, "हे बघ ग्राहकांसाठी ठेवलेले हे सगळे रूमाल खाली पडले होते. ते खराब झाले असते ना. म्हणून मी ते परत उचलून ठेवत होतो."
ती संकोचून म्हणाली, "अहो, तुम्ही कशाला असलं हलकं काम करताय? मला सांगायचंत, मी केलं नसतं का?"
जेआरडी म्हणाले," एकतर तू कामात होतीस. आणि काम कोणतंही हलकं वगैरे नसतं. मी चेअरमन असलो तरी शेवटी या कंपनीचा मीही एक भाग आहे, तेव्हा माझ्या घरचं काम करण्यात कसला आलाय कमीपणा?"
...............

No comments:

Post a Comment