Tuesday, March 28, 2017

दोन तर्‍हा

दोन तर्‍हा
एक नेते पहिल्यांदा जेव्हा राज्यमंत्री झाले, तेव्हा ते मलबार हिलवर एका मोठया पदावरील व्यक्तीला भेटायला गेले. सोबत एक मोठा हार. 2 किलो पेढे, शाल असा सगळा जामानिमा घेऊन ते गेले होते. त्यांनी नेत्यांना हार घातला, शाल पांघरली, पेढे दिले, म्हणाले, "साहेब तुमच्या आशीर्वादानं आज मला हे राज्यमंत्रीपद मिळालं." त्यांनी आभार वगैरे मानले.
सरकारी बंगला असल्यानं प्रोटोकाल म्हणून आता चहा येईल, मग चहा येईल अशी वाट बघितली, पण चहा काही आला नाही.
शेवटी त्यांनी चुळबूळ करून बघितली. आणि मग हिय्या करून म्हणाले, "साहेब आम्ही निघावं का आत्ता?"
तेव्हा ते साहेब शांतपणे म्हणाले, "अहो, तुमचं काम 15 मिनिटांपुर्वीच संपलेलं आहे, तरीही तुम्ही का बसलाय मला माहित नाही. निघा आता, मलाही पुण्याला जायचंय मुलाला भेटायला."
......................
एका केंद्रीय मंत्र्यांच्या सेक्रेटरींचा दिल्लीहून फोन आला.
"अमूकतमूक विषयावर मंत्री महोदयांना तुमच्याकडून काही माहिती हवीय. दिल्लीला भेटायला येऊ शकाल का?"
मी म्हटलं, "मला आवडलं असतं, पण मी आज परदेशात चाललोय. महिना भरानं परत येईन, तेव्हा ठरवू या भेटायचं. चालेल ना?"
ते मंत्रीमहोदयांना विचारून सांगतो म्हणाले.
महिनाभरानं त्यांचा परत फोन आला. म्हणाले," स्वत: मंत्रीमहोदयच पुणे दौर्‍यावर येत आहेत. कधी भेटू शकाल?"
वेळ, ठिकाण सारं निश्चित झालं.
ठरल्याप्रमाणे मी आपली स्कूटर दामटत क्विन्स गार्डनच्या सरकारी विश्राम गृहावर गेलो. तिकडे सामसूम होती.
सामान्यपणे केंद्रीय मंत्री येतात तेव्हा त्यांचा लवाजमा, बडेजाव फार मोठा असतो.
मला वाटलं, बहुधा मंत्र्यांचा दौरा रद्द झाला असणार.
तरीही आलोच आहोत तर स्वागत कक्षात चौकशी करावी म्हणून गेलो. तिथले कर्मचारी डुलक्या घेत होते. मी विचारलं, तर म्हणाले, "मंत्री आलेत. वर एक नंबर व्ही आय पी कक्षात आहेत."
वर जाऊन मी बेल वाजवली. पायजमा, बनियानमध्ये खुद्द मंत्र्यानीच दरवाजा उघडला. स्वागत केलं. चहा विचारला. तेच स्वत: चहा घेऊन आले. मग चहा घेता घेता आमच्या गप्पा झाल्या. ते छोटी वही हातात घेऊन टिपणं घेत होते.
केंद्रीय मंत्री इतका साधा असू शकतो?
एका खासदारांच्या पादुका प्रसादाची साता उत्तराची कहाणी सध्या देशभर गाजत असल्यानं हा अनुभव सहज आठवला.

No comments:

Post a Comment