Tuesday, March 28, 2017

भारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 6 :-
भारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब
1. हमीद दलवाईंनी 80 वर्षांपुर्वीची एक आठवण सांगितलेली आहे.
कोकणात चिपळूणला काही मुस्लीम नेते व कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी हमीदभाईंच्या वडीलांना मुस्लीम लिगची शाखा स्थापन करण्याचा आग्रह केला.
ते तयार झाले. मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन करण्यात आले, ते गावच्या मारूतीला नारळ फोडून. ग्रामदैवत म्हणून मारूती आणि कोकणचे प्रतिक असलेला नारळ.
2. अजमेरचा दर्गा असो की आणखी कुठलाही, तिथली जत्रा करण्यात हिंदूच पुढे असतात. अगदी गावोगाव हेच चित्र असते.
3. शिर्डीचे साईबाबा हेही एक महत्वाचे उदाहरण आहेच.
4.संत तुकाराम यांचे समकालीन संत बाबा शेख महंमद हे वारकरी होते.
5. सुफी संगीत आणि संगितातली अनेक घराणी यात, तसेच चित्रपटसृष्टी, खेळ, साहित्य, कला, व्यापार अशा अनेक क्षेत्रात अशी देवाणघेवाण / सरमिसळ झालेली आहे आणि ती सर्व भारतीयांनी मनोमन स्विकारलेली आहे.
"मन तड़पत हरि दर्शन को आज" हे गीत, राग - मालकंस, संगीत- नौशाद, गीत - शकील बदायुनी, गायक- मुहम्मद रफी,
तर दुसरे गीत, "रसुल अल्लाह, कर दो बेडा पार", राग - पुरिया धनश्री, संगीत- मास्टर दीनानाथ मंगेशकर, गीत - मास्टर दीनानाथ मंगेशकर, गायक- पंडित हृदयनाथ मंगेशकर, असा सुंदर मिलाफ एका मित्राने अलिकडेच फे.बु.वर लक्षात आणून दिलेला होता.
6. कोणी कोणाचे काय घेतले याचा हिशोब मांडण्याची आज गरज नसली तरी एक उदाहरण बघितले तरी हा मुद्दा पुरेसा स्पष्ट होईल. आज हिंदुंचा कोणताही कार्यक्रम समई पेटवूनच सुरू होतो. ही समई अरबी व्यापार्‍यांनी भारताला दिली. हिंदूंचा मुळचा लामणदिवा होता. आता ती इतकी हिंदूंची झालीय की तिचे मूळ सगळे विसरूनच गेलेत.
हिंदुंचा रक्षा बंधनाचा [नारळी /राखी पौर्णिमा] सण आता सामान्य मुस्लीम कुटुंबात आवर्जून केला जातो. 
 7. औरंगजेब हा कट्टर बादशहा पण त्याच्या अगदी जवळचे मानले जाणारे अनेक सरदार हिंदू होते आणि छ. शिवरायांच्या अनेक विश्वासू पदांवर मुस्लीम होते.
8. महाराजांचे एक पत्र मोठे बोलके आहे. 
ते म्हणातात, दक्षिण भारताची सत्ता आदिलशहा, कुतुबशाहा आणि शिवाजी राजे यांच्या ताब्यात राहावी आणि औरंगजेबाला सर्वांनी मिळून रोखावे असा राजकीय डावपेच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आखलेला आहे. आजच्या भाषेत याला महायुती किंवा महाआघाडी जे काही म्हणायचे ते म्हणा.
" आपली पातशाही वाढवू यें तितकी वाढवणे, पठाणाची [ औरंगजेबाची ] नेस्तनाबूद करणे. दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे." [ पाहा, छ. शिवाजी राजे, दि.वि. काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, 1950, पृ. 271 ]
8. सोमनाथाचे मंदीर अनेक वेळा मुस्लीम बादशहांनी लुटले. गझनीचा महंमद याच्या स्वार्‍यांचे वर्णन अल्बेरूनी या इतिहासकारानं करून ठेवलंय. हे मंदीर म्हणजे संपत्तीचं कोठार
असल्यानं ते लुटलं गेलं असावं असं त्यावरून म्हणता येतं. नाहीतर दिल्ली आणि आग्रा येथून आलेले मुस्लीम लुटारू रस्त्यातल्या एकाही हिंदू मंदिराला हात लावत नाहीत, ते 1100 किलोमीटर चालत येतात, सोमनाथ लुटतात आणि परत जातात, याची संगती कशी लावणार?
9. शिवरायांनी सुरत लुटली तेव्हा त्यांनी आजच्या किमतीत सुमारे 25 लाख कोटी रूपये किमतीची संपत्ती लुटल्याच्या नोंदी मिळतात.
10. नागपूरचे भोसले आणि इतर मराठा सरदार ओरिसा, बंगाल प्रांतात वर्षानुवर्षे लूट करीत. अगदी 1950 सालापर्यंत लहान मूल जर रडत असेल तर त्याला धाक दाखवण्यासाठी, त्याची आई म्हणायची, "गप्प बस, नाहीतर मराठा [बारगी] येईल" अशी भिती दाखवली जाई.
11. मध्ययुगीन इतिहासात अनेक मतभेदाच्या जागा आहेत. मात्र सर्व राजे आणि बादशहा अशी लूट करीत असत यावर एकमत आहे.
12. ब्रिटीशांच्या कुटील नितिमुळे भारतात हिंदु-मुस्लीम दंगली होऊ लागल्यानंतर 1893 ते 1984 या 91 वर्षात सर्वाधिक दंगली झालेले शहर म्हणजे भिवंडी.
आपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी तिथे हिंदु-मुस्लीम समाजात मोहल्ला कमिट्या स्थापन करून चर्चा, संवाद आणि भाईचारा स्थापन केल्यानंतर गेल्या 33 वर्षात भिवंडीत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. अगदी बाबरी मशिद विवादात 1992/93 साली सारा भारत पेटला असतानाही भिवंडी शांत होती, कारण संवाद असतो तिथे जातीय विद्वेषाला थारा मिळत नाही.

No comments:

Post a Comment