Saturday, March 18, 2017

तोडगा --

बंड्या आणि खंड्या हे सख्खे भाऊ. अतिशय खोडकर. सतत भांडणारे.
एकदा वाद फारच विकोपाला गेला.
कोणीच मागे हटेना. एक दुसर्‍याचं ऎकेना.
शेवटी आई म्हणाली, बाळांनो," मला तरी एकच मार्ग दिसतोय. तुमचे बाबा सार्‍या जगाची भांडणं सोडवतात, आता तुम्ही त्यांचाच सल्ला घ्या."
दोघेही बाबांकडे गेले. बाबा प्रचंड बिझी होते. पण लाडक्या पोरांचं कामही महत्वाचं.
दोघांनी वादाचा मुद्दा बाबांसमोर मांडला.
खंड्याचं आणि बंड्याचं भांडण एका मुलभूत विषयावर चालू होतं,
हत्तीणीला पिलं कशी होतात?
बंड्या म्हणाला, "हत्तीण डायरेक्ट पिलांना जन्म देते."
खंड्या म्हणे, "अरे हॅट. हत्तीण आधी अंडं घालते आणि मग त्यातून पिलू जन्माला येते."
बाबांनी वादाचा मुद्दा समजाऊन घेतला.
बाबा एका राज्याचे महत्वाचे मंत्री होते. त्यांची सवय म्हणजे कुठलाही वाद आला की आधी तो पुरेसा चिघळू द्यायचा. मग त्यावर एक समिती किंवा आयोग नेमायचा. अहवाल मागवायचा...."
इथं प्रकरण नाजुक होतं. कोणा एकालाच क्लीनचीट द्यायचा विषय नव्हता.
समिती आणि आयोगाचाही उपयोग होण्याजोगा नव्हता.
त्यांनी सखोल विचार केला आणि मुलांना म्हणाले, " बाळांनो, इषय मोठा गहन हाये. खरं तर याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच देऊ शकतात.
पण घरगुती मॅटरमध्ये त्यांना पडायला सांगणं योग्य होणार नाय.
त्याचं कायय की हत्तीण मुळातच डांबीस प्राणी. जणू इरोधी पक्षच म्हणा ना!
आता त्याचं कायय की टर्मवाईज हत्तीण बदलत असते.
एका टर्मला ती डायरेक्ट बाळंत होतीय, आन पिलू जल्माला घालतीया.
पण दुसर्‍या टर्मला यगळं अस्तया. तव्हा ती आदी आंडं घालतीया आन मग त्यातून पिलू जल्माला येताया.
लय वंगाळ सवय,आगदी ब्येक्कार काम. दर टर्मला यगळं मायला."

No comments:

Post a Comment