Wednesday, March 15, 2017

आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे


छत्रपती शिवाजी महाराज हे एक असामान्य प्रतिभेचे, द्रष्टे, योद्धा असलेले राष्ट्रपुरूष होते.
त्यांच्या नानाविध पैलूंवर आजवर अनेकांनी प्रकाशझोत टाकलेला आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या वैचारिक छावण्यांमधील इतिहासकारांनी, नेत्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे.
महात्मा फुले, म.मो.कुंटे, कृ.अ. केळुस्कर, एस.एन.सेन, रविंद्रनाथ टागोर, श्री. अ. डांगे, नरहर कुरूंदकर, दि.वि.काळे, ग.ह.खरे, गजानन भास्कर मेहेंदळे, अ.रा.कुलकर्णी, गोविंद पानसरे, बाबासाहेब पुरंदरे आणि इतर अनेकांनी त्यांच्याबद्दल लेखन केलेले आहे.
रयतेचा राजा, आरमार उभे करणारा राजा, गडकोटांचे महत्व ओळखून त्यांची बांधणी करणारा राजा, पर्यावरणाचे रक्षण करणारा राजा, अशी कितीतरी महत्वाची अंगे असलेला हा महापुरूष.
परवा अभिनेते नाना पाटेकर एका वाहीनीवर राजांबद्दल बोलत होते. राजांनी कधीही कोणालाही जात विचारली नाही, ती त्यांच्या मनातही आली नाही असे काहीसे ते बोलत होते.
सर्वसाधारणपणे हे खरेच आहे. त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम केले.
पण महापुरूष झाला तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा या असतातच. आजुबाजूच्या समकालीन जाणीवा त्यांच्यावरही परिणाम करीत असतातच.
महारांजाचा पत्रव्यवहार बघताना त्यांनी रयतेच्या देठासही हात लावू नये अशी सक्त ताकीद दिलेली दिसते.
स्त्रियांचा सन्मान करताना जर चुक झाली तर ते कोणालाही शिक्षा करायचे.
महाराजांच्या पत्रातील खालील विधाने आपण समजून घेतली पाहिजेत.
1." मराठा होऊनी ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतिजा तोच पावला."[पृ.260]
2. "मराठीयांची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा?" [पृ.263]
3. "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?" [पृ.265]
4. "कुणबिया कुणब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून कीर्द करीसील."[ पृ.267]
5. "जे काही आपल्या जातीचे मराठे लोक आहेती ते आपले कटात घेऊन कुतुबशाहाशी त्यांची रुजुवात करावी, दौलत देवावी, .... आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे हे आपणांस उचित आहे." [पृ.271]
6. "तुमचा आमचा वडीलांपासुन दावा वाढत आला तो आम्ही मनांतून टाकून, नि:कपट होऊन, तुम्ही मराठे लोक,कामाचे, तुमचे बरे करावे ऎसे मनी धरून...फर्मान पाठविला आहे."[पृ.272]
याचा अर्थ महाराज जातपात पाळत होते असे नव्हे पण तेव्हा समाजात असलेल्या जातजाणीवेचा राजकारणासाठी ते वापर मात्र करुन घेत होते हे स्पष्ट व्हावे. क्र.5 व 6 चे पत्र त्यांनी मराठा सरदार मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे.

महाराज "मराठा" हा शब्द दोन्हीं अर्थांनी वापरतात.
1. मराठा = सर्व मराठी माणसे, 
2. मराठा = मराठा ही जात. 
मूळ संदर्भ पाहिला की कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते कळते.
शिवरायांनी मराठा सरदार मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले पत्र "मराठा जात" या अर्थाचेच आहे. हे पत्र राज्याभिषेकानंतरचे म्हणजे मार्च 1677 मधले आहे.

ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असा जाब ते विचारतात याचाच अर्थ तसा मुलाहिजा आधी /आजुबाजूला होत असणार.
नाना पाटकर आदींच्या नावे आजकाल मेसेज पुढे पाठवण्याची पद्धतच पडलेली आहे. हा मात्र त्यातला प्रकार नव्हे. वाहीनीवर ती परतपरत दाखवली जात असल्याने कोणीही पाहून खात्री करून घेऊ शकतो.
...................
[सर्व संदर्भ:- छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, 1971]

No comments:

Post a Comment