सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे सावित्रीबाई व जोतीरावांच्या प्रेरणेने त्यांच्या तालमीत तयार झालेल्या मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई रोडे, तान्हुबाई बिर्जे, लक्ष्मीबाई नायडू अशा अनेक महिला विविध क्षेत्रात आपली लखलखीत मोहोर उमटवून गेल्या
कृ.पां. भालेकरांनी 1877 साली सुरू केलेले दीनबंधु हे वर्तमानपत्र पुढे नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवले.त्यांच्या मृत्यूनंतर ती जबाबदारी त्यांचे सहकारी वाघमारे आणि वासुदेव लिंगोजी बिर्जे यांनी घेतली.
1908 साली प्लेगच्या साथीत बिर्जे गेले.
तेव्हा त्यांच्या पत्नी तान्हुबाई बिर्जे पुढे सरसावल्या. बाईंनी 1908 ते 1913 याकाळात दिनबंधु्चे संपादन केले.
आज पुराभिलेखागारातील त्यांच्या अग्रलेख व लेखांच्या उपलब्ध माहितीवरून बाईंची तीक्ष्ण बुद्धी, स्त्रीप्रश्नांची कळकळ, सत्यशोधक विचारांची बांधिलकी आणि शेती, पाणी, बाई, पुरूषसत्ता, समाज व कुटुंब यावरचे लेखन वाचताना स्तिमित व्हायला होते.
बाईंची कोणालाही माहिती नसल्याची खंत बोचत होती. मी 1990 पासून बाईंवर जमेल तसे लिहित - बोलत होतो.
एका भेटीत मी ही खंत डा.आ.ह.साळुंखे व पुरूषोत्तम खेडेकर यांना बोलून दाखवली.
बाईंच्या स्मृती जागवायला हव्यात हे त्यांना पटले.
भिवंडीला एक परिषद घ्यायचे ठरले.
बाईंची अधिक माहिती आजच्या पिढीला व्हावी म्हणून मी लिहावे व यानिमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित करून त्यात हे द्यावे असे ठरले.
मी भरपूर खपून संदर्भ जमा करून तान्हुबाईंवर लिहिले.
बहुधा हा तान्हुबाईंवरचा पहिलाच प्रकाशित लेख असावा.
भिवंडीच्या या परिषदेला महेश म्हात्रे, कपिल पाटील,ज्ञानेश महाराव आणि इतर अनेक संपादक उपस्थित होते.
स्मरणिका काही होऊ शकली नाही पण खेडेकरांच्या शिवधर्म साप्ताहिकाचा विशेषांक त्यांनी काढला होता. अंक पाहिल्यावर मी उडालोच. कारण माझा तान्हुबाईंवरचा संशोधनपर लेख युगपुरूष पुरूषोत्तम खेडेकर महोदयांनी चक्क स्वत:च्या नावावर छापला होता.
मी चिडलो. मी माझ्या भाषणात जाहीरपणे खेडेकरांचा निषेध केला. माझी संतप्त प्रतिक्रिया बघून ते साळसूदपणाने हसले आणि म्हणाले," हरीभाऊ, लेख तुमच्या नावाने आला काय आणि माझ्या नावाने आला काय, काय फरक पडतो? लेख प्रसिद्ध होणं महत्वाचं.
मी त्यांचे हे म्हणणे तिथल्यातिथे खोडून काढले.
दुसर्याचा लेख स्वत:च्या नावावर छापणे ही अनैतिकताच होय.
त्यांनी स्मृतीचिन्हावर तान्हुबाईंचा एक काल्पनिक फोटोही छापला होता.
तान्हुबाईंच्या हाती तलवार आणि लेखणी दिलेली होती.
हे सारेच मला न पटणारे होते. त्यांच्यापासून दूर होणे हाच एकमेव मार्ग होता.
No comments:
Post a Comment