Sunday, March 12, 2017

संघ, भाजपा, डावे आणि लोकशाहीवादी


पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 25 वर्षांनंतरच्या भारतात कोणकोणते राजकीय पक्ष असतील यावर 30 वर्षांपुर्वी शरद पवारांचे भाषण झाले होते.
त्यात त्यांनी कांग्रेस, कम्युनिस्ट, भाजपा आणि अकाली दल, डीएमके सारखे काही प्रादेशिक पक्ष यावर विस्ताराने मांडणी केली होती. मात्र पवारांसारख्या चाणाक्ष नेत्यालाही देशात पुढे भाजपाची लाट येईल असे भाकीत करता आलेले नव्हते. आज बिहार,पंजाब, कर्नाटक, ओरिसा, प.बंगाल, तमीळनाडू, तेलंगणा, आंध्र अशी मोजकी राज्ये सोडली तर बहुतेक सगळी मोठी राज्यं भाजपानं काबीज केलेली आहेत. 30 वर्षांपुर्वी ज्या पक्षाचे संसदेत अवघे 2 खासदार होते त्यांचं दोन वर्षांपुर्वी लोकसभेत बहुमत आलं. आणि लवकरच राज्यसभेतही येईल. म्हणजे संपुर्ण संसदेत भाजपाचं बहुमत होईल.
पंजाब,बंगाल,महाराष्ट्र हे स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. बिहारमधून डा.राजेंद्र प्रसाद,सच्चिदानंद सिन्हा, जेपी यात पु्ढे होते.
आज नवा राजकीय इतिहास घडवला जात असताना महाराष्ट्र वगळता ही राज्ये भाजपासोबत का नाहीत?
ज्या कांग्रेसने देशावर अर्धशतक एकहाती हुकमत गाजवली ती आता दोनतीन राज्यांपुरतीच का उरलीय?
हा मोदींचा करिष्मा असल्याचं पत्रपंडीत सांगतात.
हा नोटाबंदीचा विजय असल्याचे महाराष्ट्राचे मा.मु.सांगतात.
बॅंक खाती, शौचालये, गॅस कनेक्शन,कर्जमाफीचा वायदा यांचा हा विजय असल्याचे काही सांगतात.
काही इव्हीएम मशिन्सचा हा चमत्कार असल्याचा आरोप करतात.
हा रा.स्व.संघाच्या 90 वर्षांच्या चिकाटीनं उभारलेल्या सेवाकार्याचा विजय असल्याचा स्वयंसेवक दावा करतात.
पक्ष - संघटना बांधणी, कार्यकर्त्यांचं मोठं बळ, करिश्मा असलेला नेता, लोकांना मोहात पाडील अशी घोषणांची लयलुट करणारे जाहीरनामे आणि रामराज्याची आदर्शभुत स्वप्नं असा सगळ जिंकून देणारा माहोल.
जो देश 80% हिंदूंचा आणि 20% अल्पसंख्याकांचा आहे, ज्यातल्या 29 राज्ये आणि 7 केंद्रशाषित प्रदेशांपैकी किमान [जम्मू काश्मिर, पंजाब, लक्षद्वीप, मेघालय, मिझोराम, नागालॅंड] हे सहा प्रदेश असे आहेत की जिथे अल्पसंख्यांक हेच बहुसंख्याक आहेत. त्यातले मोठे प्रदेश दोन. ज.का. आता मित्रांसोबत भाजपाकडे आहे. पंजाब कांग्रेसकडे गेलाय.
उत्तरप्रदेशात देशातील सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या राहते.त्याखालोखाल मुस्लीम लोकसंख्या पुढील राज्यात आहे.
प. बंगाल, बिहार, महाराष्ट्र, केरळ, आंध्र, आसाम, ज.का., राजस्थान, गुजरात, म.प्र. या अकरातील चार राज्ये वगळता बाकी सर्व स्वतंत्रपणे वा मित्रांसोबत भाजपाकडे आहेत.
ज्या देशात 600 पैकी 100 जिल्हे असे आहेत की ज्यात मुस्लीमांना वगळून निवडणुकच जिंकता येत नाही असे सांगितले जाते. त्यातले सर्वाधिक असलेल्या उ.प्र.मधील अनेक जिल्ह्यात एकही मुस्लीम उमेदवार न देता भाजपाने लोकसभेला 73 आणि आता विधानसभेत पुन्हा 325 आमदार निवडून आणणं हा खरोखरच राजकीय चमत्कार नाही काय? अर्थात निवडणुक जिंकली की सत्याचा विजय झाला आणि हरली की सत्य पराभूत झालं वगैरे टोकं टाळुन काही बघता येईल का?
मुस्लीमांचे लाड केले जातात असा प्रचार केला जातो. त्यांना वगळून आम्ही जिंकू शकतो हे "अमित शहा- नरेंद्र मोदी प्रतिमान" पुढे येतेय.
कांग्रेसची भ्रष्ट आणि खोटारडी राजवट उलथून टाकताना लोक संघपरिवारासोबत का जात आहेत?
कोणाला आवडो अगर न आवडो हिंदूंमध्ये खुला विचार करणारा, सहिष्णु असलेला असा प्रागतिक धारेचा वर्ग खूप मोठा आहे.
इस्लाम हा बंदिस्त धर्म. जगभर वाढणार्‍या अतिरेकी शक्तींमध्ये अनेक घटक असले तरी त्यातले अग्रभागी घटक इस्लामला मानणारे आहेत हे लोकांना दिसतेय.
भारतातला मुस्लीम हा सहजीवनाच्या गंगाजमुना संस्कृतीवर विश्वास ठेवणारा असला तरी बहुसंख्य मुस्लीम समाज धार्मिकता म्हणून बंदीस्त विचारांशी बांधील आहे. तिथे खुलेपणा, चिकीत्सा, टिका यांना शून्य स्थान आहे. देशभरात जे विचारी, प्रागतिक मुस्लीम बुद्धीजिवी लोक आहेत त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएव्हढीही नाही. समाज मात्र नको एव्हढा बंदिस्त आहे. गेले कित्येक वर्षे बघतोय की फे.बु.वर चार दोनही मुस्लीम मित्र असे दिसत नाहीत की जे त्यांच्या समाजाची चिकित्सा करतील, उलट मौन धारण करणारे किंवा वकीली करणारे मात्र असंख्य.
यामुळे हिंदू विरुद्ध मुस्लीम अशा धृवीकरणवादी शक्ती बळकट होत नाहीत काय? संघभाजपाच्या मुस्लीम लांगुलचालनवादी हल्ल्याची धार सामान्यलोक का समजून घेत असतील? या टिकेवरचा त्यांचा विश्वास वाढता असल्यानेच जनमत त्यांच्यामागे जातेय का?
हिंदू लोक परिवर्तनवादी विचारांचा मोठा वारसा असतानाही बॅक टू पॅव्हीलीयन का जाताहेत?
आम्ही आत्मटिका केलीच नाही तर कोणत्या शक्ती वाढतील? याबद्दल काहीजण नाराज झाले तरी चालेल पण आता स्पष्ट बोलावेच लागेल.
जे काम चार्वाक, ज्ञानेश्वर, नामदेव, रविदास,तुकाराम, लोकहितवादी, रानडे, फुले, आगरकर, कर्वे, आंबेडकर, गांधी, साने गुरूजी, विठठल रामजी आदींनी केले ते करणारे हमीद दलावई किंवा त्यांचे अनुयायी यांना आजही मुस्लीम समाजाचे जनसमर्थन का मिळत नाही?
याचा शोध मुस्लीम बुद्धीजिवींनी अवश्य घेतला पाहिजे.
आज देशभर समाजवादी, डावे, लोकशाहीवादी, प्रागतिक यांची राजकीय पिछेहाट होतेय त्यामागे जरूर अनेक कारणं आहेत, प्रामुख्यानं पैसा, मिडीया, जागतिक ताकद, मतदारांचं मानस. मात्र त्यांनी मुस्लीम धर्मचिकित्सा टाळली आणि ते फक्त हिंदुंनाच ठोकत राहिले, अशी लोकभावना बळावतेय. ती योग्य की अयोग्य याचा शोध घेतला जायला हवा.
संघ/भाजपाला टार्गेट करताना किमान फुलेआंबेडकरी विचारवंत तरी या अंगाने आत्मशोध घेतील काय?
...............

No comments:

Post a Comment