Wednesday, March 8, 2017

"त्या शहीदाची मी बायको हायं रं!"


पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू आणि झुंजार लोकांचं गाव.
अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1980 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारकं उभारण्याचं ठरवलं.
कामेरीत स्मारकाचं काम सुरू झालं.
कंत्राटदारानं काही मजूर कामावर लावलेले होते.
एक म्हातारी आजारी वाटत होती. अंगात खूप ताप होता. तिच्याच्यानं काम होत नव्हतं. तिला त्यानं घरी जाऊन आराम करा, दवापाणी घ्या असं सांगितलं.
म्हातारी म्हणाली, "बाबा दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी माझी चुल पेटंल. मी आज काम केलं नाही तर खाऊ काय? मला काम करू दे बाबा, मी पाया पडते तुझ्या."
म्हातारीचे झोकांडे जात होते. दोनतिनदा ती पडतापडता वाचली.
म्हातारी काम करताना पडली तर अपघात होईल आणि आपल्या डोक्याला विनाकारण ताप व्हायचा, म्हणून कंत्राटदार चिडला आणि त्यानं तिला हात धरून कामावरून बाहेर काढलं.
म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली " लेकरा, अरं, सरकार ज्यांचं स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!"
कंत्राटदार चरकला.
त्याच आजारात बाई लवकरच गेल्या. स्मारक पुर्ण झालेलं त्या बघू शकल्या नाहीत.
होय, त्या शहीद विष्णू भाऊ बारप्टे यांच्या वृद्ध पत्नी होत्या. अन्नाला मोताद झालेल्या. मजुरीवर पोट भरणार्‍या.
9 आगष्ट 1942 ला महात्मा गांधीजींचा "चले जाव" चा नारा आला. कामेरीच्या तरूणांनी हातात तिरंगा घेऊन "वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, ब्रिटीशराज चले जाव" अशा घोषणा देत पोलीस चौकीवर मोर्चा काढला. नेता होते, तरूण विष्णू भाऊ बारप्टे. ब्रिटीश पोलीस अधिकारी जनरल डायरचा भाऊबंध होता. तो भडकला. तुम्हाला काय पायजे? असं त्यानं विचारलं. विष्णू भाऊ म्हणाले, "तिरंगा आणि आझादी." हे घे, म्हणत त्यानं गोळी झाडली. विष्णू भाऊ जागेवरच शहीद झाले. तरूण पत्नी विधवा झाली.
पोलीसांनी तिचाही अपार छळ केला. बाई काही काळ गाव सोडून परागंदा झाल्या. पुढं स्वातंत्र्य मिळालं. बाई गावी परत आल्या. मजुरी करू जगू लागल्या.
स्वातंत्र्य सैनिकांना सरकारनं ताम्रपट दिले. मानधन दिलं. "आपलं माणूस नाही राहिलं, आता त्या ताम्रपटाचा काय उपयोग? फुकटचं मानधन मला नको" म्हणून बाणेदार बाई, मजुरी करून पोट भरायच्या. बाईंनी आयुष्यभर विधवापण सोसलं. अंगावर निभावलं. जवानी जाळीत निभावलं. ती शहीदाची बायको होती.
आजच्या महिला दिनी अशा लढाऊ, झुंझार शहिदपत्नी बायजाबाई बारप्टेंना वंदन!

No comments:

Post a Comment