Thursday, March 9, 2017

मित्र --


एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात त्याची माझी ओळख झाली. बोलायला अतिव लाघवी. प्रचंड वाचन. विशेषत: असंख्य कविता तोंडपाठ. लेखन पकड घेणारं. सिनेमा, नाटक, चित्रकला, शिल्पकला यांची उत्तम जाण.
पर्यावरण चळवळीत काम करण्याच्या निमित्ताने शिक्षण अर्धवट राहिलेलं. पण त्याची खंत म्हणून नाही. सांस्कृतिक अभिरूची अतिशय संपन्न. अनेक कलागुणांचा जणू खजिनाच. हरहुन्नरी. कलासक्त. बेहिशोबी. अव्यवहारी आणि विक्षिप्त. प्रतिभावंत. भारी कविता करायचा. लहान वयात बहुतेक सारा देश फिरलेला. अनेक राज्यात माणसं जोडलेली. स्वयंपाक विशेषत: मासे, मांसाहारी पदार्थ इतका जब्राट करायचा की एखादं हो‘टेल काढलं असतं तर खोर्‍यानं पैसा कमावला असता. मात्र स्वभाव काहीसा सनकी असल्याने आठवड्याला किमान तीन नोकर्‍या बदलायचा. एरवी लोकांना एक नोकरी मिळताना किती त्रास होतो, पण याला मात्र त्याच्या छाप पाडणार्‍या व्यक्तीमत्वामुळे बहुधा सहज नोकर्‍या मिळायच्या आणि म्हणूनच बहुधा तो त्या सहज सोडून द्यायचा. आधीच्या ठिकाणी फोन करावा तर तिथून दुसर्‍या वर्तमानपत्राचा संपर्क नंबर मिळायचा पण दरम्यान त्यानं तीही नोकरी सोडून तिसरीच सुरू केलेली असायची.
घरं भाड्याची असायची. पण नानाविध शौक असल्यानं फुलझाडांच्या शेकडो कुंड्या, वीसपंचवीस कुत्री, दहावीस मांजरं, मासे पाळलेले, असं कायकाय असायचं घरात. कमावलेला सगळा पैसा 24 तासात खर्च करायचाच अशी प्रतिज्ञा. त्यामुळे खिसा कायम खाली. म्हणजे पैसा यायचा पण टिकायचा म्हणून नाही. तो चंचल, त्याचा खिसा त्याहून चंचल.
एक भन्नाट अवलियाच होता तो. वादविवादात त्याचा हात धरणं अवघड. माणसं जमवणं, त्यांना रसिकतेनं खाऊ घालणं याचं त्याला अपार वेड.
एकदा ओळख झाली की समोरचा माणूस त्याच्या प्रेमातच पडायचा. आमचा तर तो कुटुंबमित्रच होता.
त्याची बायको मात्र अगदी दुसरं टोक. स्थितप्रज्ञ. आळशी. उच्चशिक्षित असूनही कामधंदा मात्र काहीही करायची नाही. आजारी असल्यासारखी मलूल आणि उदास असायची. कशातच रस म्हणुन नाही. अगदी विजोड जोडपं.
एकदा आम्ही सहकुटुंब त्याच्यासोबत उत्तर भारताचा प्रवास केला. त्यानं ही ट्रीप इतकी सुरेख आयोजित केली की आम्ही निहायत खुष झालो. मी त्याला म्हटलं, तू नोकरी सोड आणि ट्रॅव्हल कंपनी काढ. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ. त्यानं दुसर्‍या दिवसापासून स्वत:ची कंपनी सुरू केली. अगदी माफक खर्चात तो मध्यमवर्गियांना उत्तर भारत, दक्षिण भारत दाखवायचा.म्हणता म्हणता त्याचा या व्यवसायात जम बसू लागला. तो त्यात रमलाय असं वाटू लागलं.
प्रतिस्पर्धी ट्रॅव्हल कंपन्यांनी त्याला त्रास द्यायला सुरूवात केली.
एकदा त्यानं नोंदणी केलेल्या सर्व प्रवाशांची रेल्वे तिकिटं रिझर्व्ह केली तर पोलीसांनी त्याच्या कार्यालयावर छापा मारला.परवाना नसताना जास्त तिकीटं कशी बुक केली म्हणुन ती तिकिटं जप्त केली. त्याला अटक केली.
पोलीस आयुक्त माझे मित्र होते. मी त्यांना विनंती केली. तोवर मलाही माहित नव्हतं की त्यासाठी परवाना काढावा लागतो वगैरे. त्यांनी सांगितलं प्रतिस्पर्धी ट्रॅव्हल कंपन्यांनी टिप दिल्यावरून पोलीसांनी कारवाई केली होती. नियमाप्रमाणं किरकोळ पुर्तता करून त्यांनी त्याची मुक्तता केली.
एकदा त्यानं आमच्या छोट्या मुलीला कमी खर्चात त्याच्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत उत्तर भारताचा दौरा घडवला. तो सोबत असल्यानं आम्हाला चिंता नव्हती. तिचा प्रवास इतका झकास झाला की ती त्याच्या कंपनीवर निहायत खुष झाली. आता प्रत्येक सुट्टीत मी येणार तुमच्यासोबत म्हणुन सांगू लागली.
एकदा मी घरी नसताना तो घरी आला. त्याच्या कंपनीच्या बसला केरळमध्ये अपघात झाल्यानं त्याला काही रक्कम हवी होती. संगितानं घरातली होती नव्हती ती रक्कम त्याला दिली.पण तेव्हढ्यानं भागणारं नव्हतं. गरज मोठी होती. तो म्हणाला, "माझी एक मोठी रक्कम दोन दिवसात येणार आहे. तू असं कर तुझं मंगळसुत्र, बांगड्या आणि कानातलं दे. मी ते गहाण ठेवतो. माझे पैसे आले की लगेच तुझे दागिने सोडवून तुला परत आणून देतो."
माझी आई जुन्या विचारांची होती. तिला कळलं तर ती चिडेल असं संगितानं त्याला सांगितलं. तो म्हणाला, त्यांना सांग,"मंगळसुत्र तुटलं होतं, दुरूस्तीला दिलंय. नाहीतरी मी दोनतीन दिवसात परत सोडवून आणतोच आहे."
संगितानं त्याला सगळे दागिने दिले.
आईनं विचारल्यावर संगितानं तिला तसं सांगितलं. दोनतीन दिवस उलटून गेल्यावर आईला संशय आला.मग संगितानं आईला खरं ते सांगितलं.
माझी आई संगितावर कधी रागवायची नाही. तिचा फार जिव होता सुनेवर. पहिल्यांदाच आई रागावली.बाकी दागिन्यांचं ठिकाय.पण मंगळसुत्र द्यायचं नव्हतं.उद्या माझ्या मुलाला काही झालं म्हणजे कोण जबाबदार? असा तिचा विचार. इतक्यात मी बाहेरगावाहून आलो. आईनं व संगितानं मला घडलेलं सांगितलं. मित्र अडचणीत असताना त्याच्या मदतीला संगिता धावली याचा मला आनंद झाला. तसंही मी तिला लग्नात मंगळसुत्र केलंच नव्हतं. पुढं तिला नोकरीत सहकारी बायका नावं ठेवायला लागल्या म्हणून नाईलाजानं तिच्या मागणीवरून ते केलेलं होतं.
आपली बायको नव्या विचारांची असूनही मी लग्नात तिला मंगळसुत्र केलं नाही हे तिलाही आवडलं नव्हतं असं एकदा तिनं बोलून दाखवल्यावर मलाही आश्चर्य वाटलेलं.
तर आईनं मंगळसुत्राचा लकडा लावलेला.
मित्र तर काही फिरकलाच नाही. त्याकाळात मोबाईल नव्हते. त्यानं जुनं घर बदललं होतं. त्याची कंपनी अडचणीत आल्यानं त्यानं तेही कार्यालय सोडलं होतं.
खूप प्रयत्न केल्यावर त्याचा नविन फोन नंबर मिळाला. मंगळसुत्र लवकरच आणून देतो असं तो म्हणायचा, पण कृती काही होत नव्हती. आईनं त्याला मी माझ्याकडचे पैसे तुला देते, तू मंगळसुत्र सोडवून आणून दे असं सांगितल्यावर तो म्हणाला, "जरा अडचण आहे. गडबडीत सोनारानं मला जास्त पैसे दिलेत. आता तेव्हढे मी परत करणार नाही. सोनारानं एव्हाना ते दागिने विकलेही असतील. आपण आता नविनच करूया."
झालं असं होतं की संगिताच्या बांगड्यांमध्ये सोन्याबरोबरच इतर धातू मिसळलेले होते. सगळंच काही सोनं नव्हतं. तिनं त्याला तसं बजावलंही होतं. खरं तर अशावेळी सोनार तपासूनच घेतात पण आमच्या मित्राच्या बोलबच्चनगिरीला तो भाळला असणार आणि फसवला गेला असणार.
हे त्याचं वागणं चुकीचं होतं.
माझ्या आईला हे अजिबात आवडलं नाही. त्यानं सोनारालाही फसवलं याचा अर्थ तो चांगला माणूस नाही, असा तिचा ग्रह झाला. आईचे लाईक्स आणि डिसलाईक्स फार टोकाचे असायचे. तिनं आता त्या मंगळसुत्राचा नाद सोड आणि नवं कर असं संगिताला सांगितलं. माझ्या आईला तो आवडेनासा झाला. तसाही त्याला व्यसनं फार असल्यानं माझ्या आईचा त्याचावर सूक्ष्म राग होताच. व्यसनी माणूस बघितला की तिची तिडीक उठायची.
बरं, हा मित्रही असा की कर्जबाजारी असूनही दारू, सिगारेट, तंबाखू आणि कायकाय....! व्यसनं करायची तर स्वत:च्या पैशांनी करावीत ना?
एकदा मला दुसर्‍या मित्राकडून समजलं ते दोघं नवराबायको गेले काही दिवस उपासीच आहेत.
पोटात तुटलं.
मी एका दुकानातून दहा किलो तांदूळ आणि इतर सामान घेतलं आणि तडक रिक्षानं त्याच्या घरी नेऊन टाकलं. त्याचा चेहरा उतरलेला होता. दागिने परत न केल्याची त्याला खंत असणार.
दरवेळी तो अडचणीत असला की हक्कानं फोन करायचा, मदत मागायचा.
एकदा तर ते दोघे नवराबायको आमच्या घरी महिनाभर येऊन राहिले. बरं तरी, माझी आई त्याकाळात मामाकडे गेलेली होती. नाहीतर तिनं काही त्याला आमच्याकडं राहू दिलं नसतं.
त्याचं काहीतरी बिनसलं होतं. नोकर्‍या मिळत नव्हत्या.व्यवसायात परत जम बसत नव्हता.त्यानं पुणं सोडलं.
नव्या शहरात नवे उद्योग करून बघितले. बायकोची साथ नव्हती. त्याचं गाडं घसरतच गेलं.
मंगळसुत्र सोडवून न आणता आल्याच्या प्रकरणामुळे त्यानं आमच्याशी पुढंपुढं संपर्कच तोडला.
आणि एके दिवशी वर्तमानपत्रातून समजलं त्यानं नव्या शहरात आत्महत्या केली होती. काळजात खूप तुटलं. त्याचा वेग भन्नाट होता. त्या गतीनं भोवंडून त्याचा बळी घेतला असणार. फार अकाली संपवलं त्यानं स्वत:ला. त्याचे वडील म्हणाले, "अशा माणसांना आपण सारे मध्यमवर्गिय बुर्झ्वा वाटत असतो. जगातल्या सार्‍या लोकांच्या पैशावर आपलीच मालकी आहे असं त्यांना वाटत असतं. तुमचा त्याला आधार होता, म्हणुन मला काळजी नव्हती. मुलगा प्रतिभावंत असला तरी त्याच्या तुफान वेगानं आणि व्यसनांनी त्याचा बळी घेतला असणार!"

No comments:

Post a Comment