शाळेत असताना पुण्याच्या गिता धर्म मंडळाने घेतलेल्या गिता पाठांतर स्पर्धेत मला पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार वितरण समारंभात मंडळाचे अध्यक्ष म्हणाले,
"या मुलाचे आडनाव जरी नरके असले तरी हे लघुरूप आहे. मूळ आडनाव "नरकेसरी" असणार. तेव्हा आजपासून त्याने आडनाव बदलून घ्यावे व नरके ऎवजी नरकेसरी लावावे.
आमचं घराणं वारकरी. पायी चालत देहू, आळंदी, पंढरी करणारं.
चातुर्मासात घरी दररोज संध्याकाळी एक गुरूजी येऊन जाहीर ग्रंथवाचन करायचे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत, नवनाथ, हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, शिवलिलामृत, दासबोध, गुरूचरित्र असं सतत चाललेलं असायचं.
गुरूजी थकल्यावर त्यांचा मुलगा यायला लागला.
श्रावण महिन्यात त्या मुलाकडे खूप निमंत्रणं असायची. त्याची दमछाक व्हायची. श्रीमंत असाम्या झाल्या की मगच आम्हा गरिबांचा नंबर लागायचा. त्यामुळे कधीकधी रात्री अकरा साडेअकरा वाजता तो यायचा. घरातली लहान मुलं भुकेनं रडायची. पण पुजा झाल्याशिवाय जेवन मिळायचं नाही. पाहुणेरावळे बाहेरगावाहून आलेले असायचे ते वैतागायचे. असं दरवर्षी चालायचं.
एका वर्षी रात्रीचे बारा वाजायले आले तरी तो मुलगा आला नाही. माझा मोठा भाऊ संतापला. गावात ओळखीचं एक धार्मिक पुस्तकांचं दुकान होतं. भावानं दुकानदाराला अर्ध्या रात्री उठवलं. सत्यनारायणाची पोथी विकत घेतली.
घरात शिकणारा मीच असल्यानं मला आदेश देण्यात आला. त्या रात्री मी पुजा सांगितली. जमलेले लोक खुष झाले.
आणि रातोरात एका शाळकरी गुरूजीचा जन्म झाला.
गोरगरिब मलाच पुजेला बोलवायला लागले. सरावानं सफाई येत गेली. मग मीपण टणाटण पुजा सांगत फिरायचो.
भलताच भाव मिळायचा. थोरमोठेसुद्धा पाया पडायचे. पुजेचं साहित्य आणि वर आणखी दक्षिणा मिळायची. एका महिन्यात वह्यापुस्तकं, नवे कपडे, सारं काही व्हायचं.
परिसरात माझं नाव होऊ लागलं. दुर्दुरवरून पुजेच्या सुपार्या यायच्या.
बरं, गोरगरिब म्हणायचे, पुजेला अमूक एक वस्तू नाही मिळाली. मी म्हणायचो, काळजी करू नका. मनी भाव आहे ना मग तो पुरेसा आहे. त्यामुळं लोकप्रियता भराभर वाढू लागली. कधी जर आमच्या गुरूजींच्या मुलाला जमणार नसेल तर तोच माझं नाव सुचवायचा.
खरी अडचण श्रावणात नसायची.
ती यायची ते नियमित पोथीवाचन करताना. समोर बसलेल्या श्रोत्यांना श्लोकांचा वा ओव्यांचा अर्थ समजाऊन सांगावा लागायचा. माझा मोठा भाऊ निरक्षर असला तरी त्याचा व्यासंग फार मोठा होता. तो ओव्यांची फोड करून सांगायचा. काहीकाही ओव्या भलत्याच अवघड असायच्या. जाम अर्थबोध व्हायचा नाही. मग काय खूप झटापट चालायची.
समोर बसलेले चाळीसपन्नास श्रोते दिवसभर शेतमजुरी करून थकलेले असायचे. त्यांना झोप अनावर व्हायची. त्यांचे डोळे मिटले जायचे.
कधीकधी तळटिपा, शब्दार्थ बघून काही अर्थ लावावे लागायचे. मग भाऊ थकायचा. तो म्हणायचा आता तूच सांग. मग मी जमेल तेव्हढा अर्थ लावायचा प्रयत्न करायचो.
त्याकाळात चांदोबा हे माझं अतिशय आवडतं मासिक होतं. त्यातल्या बोधकथा, चुटकुले, काही कथा यांचा अशावेळी उपयोग व्हायचा.
शाळेच्या ग्रंथालयातले ग्रंथ आरपार वाचायची सवय लागल्यानं अर्थ सांगण्याचं काम चांगलं जमू लागलं. ऎकणारे अगदी खुष असायचे.
वर्षानुवर्षे काही पोथ्या अनेकवार वाचल्यानं अगदी तोंडपाठ झालेल्या असायच्या.
एकुण अगदी झकास चाललेलं होतं.
डा. बाबा आढाव आणि सामाजिक चळवळीतल्या इतर मंडळींमुळं कुरूंदकर, सरदार, विनोबा, ढेरे, साने गुरूजी, फुले, आंबेडकर, ह.ना. आपटे, नाथमाधव, फडके, खांडेकर, दांडेकर, पुल, शिवाजी सावंत, जीए असं काहीबाही वाचनात यायला लागलं आणि कोश फुटायला लागला.
पुढे पुणे विद्यार्थी गृहात, एका राज्य पातळीवरील गिता लेखन-पाठांतर स्पर्धेत भाग घेतला. आमचे अण्णा म्हणजे डा.ग,श्री.खैर हे गितामहर्षी. त्यांचं सारं वाचलेलं होतं. त्यांना अनेकदा ऎकायची संधी मिळत असे. ते खुपदा घरी बोलवून मायेनं विचारपूस करायचे. शिकवायचे. पाठांतरासाठी त्यांनी एका शास्त्रीजींचं नाव सुचवलं. त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी शिकवायला होकार दिला. संध्याकाळी शाळा सुटली की त्यांच्या घरी जायचो. ठरल्याप्रमाणं आधी घरातली कामं करावी लागायची. किराणा, दळण, भाजीपाला-फळं, पुजेचे हार घेऊन येणं, घरात झाडू मारून फरशी पुसून काढणं, घरातली भांडीधुणी करणं असं दररोज दोन तास काम केलं की मग ते अर्धा तास शिकवायचे. मी खेड्यातून आलेला असल्यानं लहेजा ग्रामीण होता. वळण अगदीच गावठी वगैरे.
शास्त्रीजी चिडायचे. एक उच्चार चुकला की सुरूवातीला चार छड्या अशी शिक्षा असायची. नंतर छड्या वाढत जायच्या. एकदा एका चुकलेल्या उच्चारासाठी चढत्या क्रमाने 52 छड्या खाव्या लागणार होत्या. एकाच दिवशी तेव्हढ्या छड्या खाल्ल्या तर दुसर्या दिवशी धुणीभांडी करताना अडचण होईल म्हणून त्यांनी पुढचे चार दिवस त्या छड्या विभागून दिल्या आणि कोटा पुर्ण केला. पण ते शिकवायचे मात्र मनापासून.
नंतर ते थकले की माझे उच्चार सुधारले माहित नाही, पण छड्या फारशा खाव्या लागल्या नाहीत.
लेखी परीक्षेत मी राज्यात पहिला आलो.
पाठांतराच्या आणि मुलाखतीच्या परीक्षेला तीन शास्त्रीजींचं परीक्षक मंडळ होतं.
मी सभागृहात प्रवेश केला. संयोजक आणि 3 परीक्षक समोर बसलेले होते. माझं नाव विचारलं गेलं.
मी हरी नरके असं सांगताच अंगावर पाल पडावी तसे एक शास्त्रीजी किंचाळले, " शी...शी.. कसली कसली गलिच्छ नावं असतात या लोकांमध्ये. याला आपण मुळात प्रवेशच का दिलाय?"
संयोजक म्हणाले, " अहो, तो लेखी परीक्षेत राज्यात पहिला आलाय."
"काय सांगताय?" म्हणुन शास्त्रीजी माझ्याकडे वळले. " सांग बघू, गितेत तुझ्या आडनावाचा उल्लेख एका श्लोकात आलाय तो तुला माहित आहे का?"
मी हो म्हणालो. त्यांनी तोच श्लोक म्हणून दाखवायला लावला. पुढे अठरा अध्यायातले सातशे श्लोकातले सुमारे 70 श्लोक उलटसुलट क्रमानं त्यांनी मला म्हणायला लावले.
शेवटी ते दमले असणार.
मग इतर दोघांनी मायेनं माझी विचारपुस करीत काही प्रश्न विचारले. त्यांच्या बोलण्यातील जिव्हाळा आणि अगत्य मला सुखावून गेलं.
एकुण पुढचा हा भाग छानच झाला.
आणि निकाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. मी राज्यात पहिला आलो होतो.
पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अण्णा, गितामहर्षी डा. ग. श्री.खैर होते.
संयोजक आणि 2 परिक्षक बोलले आणि शेवटी माझ्यावर ज्यांचं "विशेष प्रेम" होतं ते शास्त्रीजी बोलायला उभे राहिले.
त्यांनी आयोजकांना पहिलीच सुचना केली, ते म्हणाले, "यापुढे फक्त पाठांतर स्पर्धा घेत चला. या लेखी परिक्षेमुळं शुद्ध उच्चार नसूनही दोन्हींच्या बेरजेत काहीजण पुढे जातात आणि त्यांना नाईलाजानं पुरस्कार देणं भाग पडतं. उच्चार जर लखलखीत नसतील तर पुरस्कार दिला जाता कामा नये."
अण्णांनी अचानक विचारलं, "पुरस्कार विजेत्यांपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का?"
मी हात वर केला. सुरुवातीला संयोजक, मला शिकवणारे शास्त्रीजी, माझे सगळे गुरूजन, अण्णा या सगळ्यांचे आभार मानून मी म्हटलं, "होय माझे उच्चार पुरेसे शुद्ध नसावेत. मी खेड्यातून आलोय. शिकणारी पहिलीच पिढी आहे. या देशात अर्थ समजून न घेता पाठांतर करण्याची, पोपटपंचीची परंपरा फार मोठी आहे. पण लेखी परीक्षेमुळंच खरा कस लागतो असं मला वाटतं. आयोजकांनी लेखी परीक्षा घेतली म्हणूनच मी पहिला येऊ शकलो. पण लेखी परीक्षा घेण्यावर एक परीक्षक इतके नाराज आहेत की त्यांनी ती नाराजी जाहीरपणे व्यक्त केलीय. मी पुरस्काराबद्दल आपले सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि हा पुरस्कार घ्यायचं मी नाकारतो. परीक्षकांच्या इच्छेविरूद्ध दिला गेलेला हा पुरस्कार मला नको."
सभेत खळबळ माजली.
अध्यक्ष असलेल्या अण्णांनी त्यांच्या भाषणात त्या शास्त्रीजींची जाहीरपणे खरडपट्टी काढली. पाठांतरापेक्षाही अर्थ समजून घेऊन आकलन करणं किती महत्वाचं ते समजावून संगितलं. या स्पर्धेत या दोन्हींची का गरज आहे तेही स्पष्ट केलं. आणि अण्णा गरजले," शास्त्रीजी, तुम्ही असभ्यपणा केलेला आहे. तुम्ही एकटेच परीक्षक नव्हतात. तुमच्या तिघांच्या गुणपत्रिकेच्या बेरजेत हा मुलगा पहिला आलेला आहे. केवळ लेखीतच नाही. विद्यार्थ्याला त्याच्या आडनावावरून तुम्ही हिणवल्याचं मला संयोजकांनी सांगितलेलं आहे. इतर परीक्षकांकडूनही मी खातरजमा करून घेतलेली आहे. तेव्हा विद्येच्या प्रांतात तुम्ही जातीयवाद आणून चुक केलेली आहे. तुम्ही जाहीरपणे माफी मागायला हवी."
शास्त्रीजी उठले. त्यांनी औपचारिक खुलासेवजा खेद व्यक्त केला.
अण्णा म्हणाले, "बाळा, तुला आता पुरस्कार स्विकारावाच लागेल."
त्या स्पर्धेने आणि कार्यक्रमानं किंवा असं म्हणू या की त्या शास्त्रीमहोदयांनी माझा पुढचा रस्ता बदलून टाकला.
ते तसं ना वागते तर कदाचित मी आज एक किर्तनकार, बुवा, बापू, गुरूजी, प्रवचनकार, महाराज किंवा योगी असलं काही झालो असतो. त्यांच्यामुळे महाराष्ट्र एका बुवा, बापूला मुकला किंवा महाराष्ट्राची असल्या बुवाबापूच्या तावडीतून सुटका झाली.
पण त्या प्रसंगानं बरंच काही शिकवलं. त्यावेळी ग.श्री. खैरांसारखा भला माणूस जाहीरपणे माझ्या बाजूनं उभा राहिला.माणसं मोठी असली तरी अनेकदा भुमिका घ्यायचं टाळतात.
तेव्हा "हरीदास नरकेसरी" होण्यातून वाचलो ते बरंच झालं.

No comments:
Post a Comment