Wednesday, April 6, 2011

वामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद!

 शाळकरी वयात मी फुले-आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो. डा. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, राष्ट्रसेवा दल आदि संघटनांशी माझा संबंध आला. प्रा. गं. बा. सरदार, अनिल अवचट, डा. कुमार सप्तर्षि, नरहर कुरुंदकर, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते आदिंच्या भाषणांचा माझ्या कोवळ्या वयात ठसा उमटला. शाळेत असतांनाच विविध वाद-विवाद , वर्क्तुत्व स्पर्धांच्या निमित्ताने वाचन होत होते. विशेषत: पुणे विद्यार्थी ग्रुहाच्या महाराष्ट्र विद्यालयात असतांना तेथील शिक्षकांच्या संस्कारांतुन वाचन वाढत राहिले. शाळेच्या परंपरेनुसार ईयत्ता आठवी व नववीत असतांना मी लिहिलेल्या शोधपर प्रबंधांचे सर्वदुर
कौतुक झाले. त्यावेळी एका मोठ्या इतिहासकाराने शाळकरी वयातील विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्याच्या भावनेने असावे बहुदा, माझ्या प्रबंधावर अभिप्राय लिहितांना (१९७८) "या मुलामद्धे राजवाडे- केतकर दडलेले आहेत." असे म्हटले होते. या आणि इतरांच्या प्रोत्साहनामुळे आपल्यावरील जोखीम वाढल्याची मला सतत जाणीव रहात आली आहे. मी एम-फिल. करत असतांना बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांची बदनामी करणारे दोन लेख सोबत साप्ताहिकात लिहिले. त्यांना साधार आणि समर्पक उत्तरे देनारे लेख मी अनेक वर्तमानपत्रांतुन लिहिले. त्याचे पुस्तक करावे अशी सुचना पु.. देशपांडे यांनी केली. हे पुस्तक पु.. यांच्याच हस्ते प्रकाशित झाले. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. या पुस्तकाने मी गंभीर संशोधनपर लेखनाकडे वळलो. डा. . दि. फडके यांचा सहाय्यक म्हणुन मला महात्मा फुले समग्र वाड्मयाचे काम करता आले. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले शताब्दि वर्षात त्यांच्या साहित्याचे प्रकाशन करण्यासाठी व त्याचा भारतीय भाषांमद्धे अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समितीवर माझी सचीव म्हणुन निवड झाली. डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे काम आधिपासुन चालू होते. वसंत मून हे त्या समितीचे सचीव होते. ते निव्रुत्त झाले होते. प्यरालिसिसने आजारी होते. त्या काळात मी त्यांचा सहाय्य्यक म्हणुन काम करीत होतो. वसंत मून व य. दि. फडके यांचे आपापसात पटत नव्हते. त्या दोघांसोबत एकाच वेळीस काम करणे हे अत्यंत जिकिरीचे होते. तोल साधतांना फार तारांबळ उडत असे. पुढे मून वारले. त्या समितीची जबाबदारी माझ्यावरच सोपवण्यात आली. माझ्या कार्यकाळात मी डा. बाबासाहेब आंबेडकर:लेखन आणि भाषणे (खंड १७ ते २२) यांचे १० ग्रंथ मी प्रकाशित केले. या कामी मला तत्कालीन समिती सदस्यांचे सहकार्य लाभले. विशेषत: डा. कासारे, गोडघाटे, कांबळे यांचा आवर्जुन उल्लेख केला पाहिजे. महात्मा फुले व राजर्षि शाहू ग्रंथसमितीचे कामही मी पहात होतो. त्याचेही ग्रंथ मराठी-हिंदी-इंग्रजीत प्रकाशित करत होतो. त्यामुळे १०० वर्षे फक्त मराठीतच राहिलेले फुले साहित्य प्रथमच मराठीच्या सीमा ओलांडुन हिंदी-इंग्रजी, बंगाली, तेलगु, कन्नड, उर्दु, सिंधी, गुजराथी, पंजाबी अशा भारतीय भाषांमद्धे पोहोचले. जाणत्यांनी ते डोक्यावर घेतले. या काळात मी भटक्या विमुक्तांच्या आणि आंबेडकरी चळवळीमद्धे सक्रिय होतो. विद्यार्थी दशेत नामांतर आंदोलनात मी प्रदीर्घ कारावास भोगला होता. अनेक सामाजिक संघटना मला व्याख्यानांसाठी बोलवत असत. असेच कधीतरी बामसेफने मला भाषणासाठी बोलविले. बामसेफचे नेते डी. के. खापर्डे यांच्याशी परिचय झाला. माझे लेखन, संशोधन आणि वक्त्रुत्व यांचे ते चाहते होते. त्यांच्या म्रुत्युनंतर बोरकर व मेश्राम यांच्याकडे संघटनेची सुत्रे आली. पाटण्याच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर वामन मेश्राम यांच्या कार्यपद्धती व चारित्र्याबाबत चौकशी समिती नेमुन त्यांना बामसेफमधुन काढुन टाकण्यात आले. मी या संघटनेचा सदस्य नसल्याने सर्वच गटांच्या कार्यक्रमांना जात असे. गेली ९-१० वर्षे प्रामुख्याने मेश्राम गटाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशनांमद्धे दर वर्षी नवा विषय निवडुन मी प्रदिर्घ भाषणे दिली आहेत. यातल्या एका भाषणाचे त्यांनी पुस्तकही प्रकाशित केले आहे. त्याचा हिंदी अनुवादही प्रसिद्ध करण्यात आला आहे. माझ्या भाषणाच्या हजारो क्यसेटस विकल्या जाता असे मला सांगीतले जात असे. २००५ साली बामसेफचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन लंडन येथे झाले. आंतरराश्ट्रीय संघटक मिल्कियत सिन्ग बहेल यांचा आग्रह होता म्हणुन मी त्या सम्मेलनाला गेलो. श्री बहेल यांनी स्वत:च्या घरात माझी निवास व्यवस्था केली. मी या काळात इंडिया ओफिस लायब्ररी, ब्रिटिश मुझियम लायब्ररी, संसद भवन पुराभिलेखागार येथे संशोधन केले. विविध बुद्धविहारांमद्धे व विद्यापीठांमद्धे भाषणे दिली. हा दौरा सहलीसाठी नाही याची मनाशी खुणगाठ बांधून मी सर्व वेळ संशोधनात व्यतीत केला. या काळात कोणत्याही पर्यटन स्थळाला मी भेट दिली नाही. याच काळात डा. . . साळुंखे यांच्यामुळे मी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यक्रमांना जावू लागलो. बहुजनसमाजाव्हे प्रबोधन झाल्याशिवाय महाराष्ट्राचे ख-या अर्थाने प्रबोधन होणार नाही या भुमिकेतुन मी त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असे. विवेकी आणि तारतम्य बाळगणा-या अभ्यास पद्धतीचा वापर करून फुले-शाहु-आंबेडकर यांचे खरे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा माखा प्रयत्न होता. या संघटनांच्या कार्यक्रमांना मी जाणे माझ्या अनेक मित्रांना तेंव्हाच मान्य नव्हते. आर.पी.आय च्या सर्व प्रमुख नेत्यांचा बामसेफ सोबत जाण्याला विरोध होता. त्याची मला भरपुर किंमतही मोजावी लागली. तथापी जे आपल्या विवेक बुद्धीला पटते ते निरपेक्षपणे करत राहणे ही माझी जीवनव्रुत्ती आहे. मी या उपरोक्त संघटनांकडुन प्रवासखर्चाव्यतिरिक्त एक दमडीही मानधन घेतलेले नाही. माझ्या पुस्तकांचे व सी.डीं.चे स्वामित्वधनही मला कधी मिळालेले नाही. माझ्या चरितार्थासाठी मी या संघटनांवर कधीही अवलंबुन नव्हतो. मी केलेल्या संशोधनाचा पुरेपूर वापर नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत यातच मला आनंद होता. अनेकदा माझेच संशोधन स्वता:च्या नावावर सांगण्याचा वा छापण्याचाही प्रयत्न नेतेमंडळींनी केला आहे.दर्म्यान भांडारकर प्रकरण घडले. जेम्स लेनने छत्रपती शिवराय व राष्ट्रमाता जिजावु यांची केलेली बदनामी आमच्या जिव्हारी लागली होती. भांडारकरमधील मंडळींनीच सदर माहिती लेनला दिल्याचे आम्हाला शपथेवर सांगण्यात आले होते. त्यामुळे भांडारकरबद्दल आम्हा तरुणांच्या मनात आकस होता. मी या संदर्भात त्या काळात भाषणे दिली आहेत. माझ्या परवानगीशिवाय आणि मला कल्पनाही न देता ब्रिगेडने ती यु ट्युबवर टाकली आहेतच. मी या काळात केलेले लेखन आपल्यासमोर आहेच. अडिच वर्षांपुर्वी महाराष्ट्र सरकारने माझी व डा. . . साळुंखे यांची शासन नियुक्त सदस्य म्हणुन भांडारकरवर नियुक्ति केली. आम्ही तेथे गेल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा झाला. . ज्या १४ जणांचे लेनने आभार मानले आहेत त्यातील ६ जणांचा म्रुत्यु झालेला आहे.. यातील अनेकांचा भांडारकर संस्थेशी कधीही संबंध आलेला नाही. . ज्यांचा उल्लेख ब्रिगेड व बामसेफ "१४ भट" अश्या शब्दात करतात त्यातील अनेकजण जैन, सी.के.पी., सारस्वत आहेत...होते. यच काळात ब्रिगेडने बहुजनसमाजातील ऐक्य मोडीत काढणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढला. आम्ही सर्वजण दादोजी कोंडदेव व लेन प्रकरणात एकत्र असतांना या आंदोलनातुन मिळालेली शक्ती व प्रसिद्धी यांचा वापर करुन दुबळ्या व सत्ताविहिन भटक्या विमुक्तांना आणि कारु-नारु, बलुतेदार-आलुतेदारांना मंडल आयोगामुळे मिळालेले हक्क अपहरण करुन सत्ताधारी जातीच्या खिशात घालण्याचा डाव खेळण्यात आला. ज्यांनी विश्वासाने आपले सर्वस्व या चळवळीसाठी दिले त्यांचाच बळी घेण्याच्या या कटाला विरोध करणे हे आमचे सामाजिक दायित्व नव्हते कि काय? बामसेफने खरे तर सर्वात आधी या कटाला विरोध करायला हवा होता...परंतू महाभारतात म्हटल्याप्रमाणे "अर्थस्य पुरुषो दास:" ही उक्ति खरी ठरली. ब्रिगेडने मराठा आरक्षणासाठी मेश्राम गटाचा चतुराईने वापर करुन घेतला. त्यांचे ठीक आहे...परंतु मेश्रामांचे हे वागने हे ओ.बी.सी.चा विश्वासघात करणारे नाही काय? ज्या मराठा आरक्षणाला सर्व वैधानिक आयोगांनी विरोध केला आहे, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात निकाल दिलेले आहेत त्याची वकिली ही मंडळी करीत राहिली. त्यासाठी "वाजवा टाळी...हाकला माळी..", "वाजवा तुतारी...हाकला वंजारी...",atrocity चा bomb अशा घोषणा देवून दलित, .बी.सी. भटके-विमुक्त विरोधी राजकारण प्रच्छन्नपणे खेळले गेले. याची धग लागणे अपरिहार्य होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची बदललेली गती आणि दिशा स्पष्ट दिसत असतांना सत्ताधा-यांच्या डावपेचाचा पट जनसामान्यांना उलगडवून दाखवणे आमचे कर्तव्य बनले. तसेच सामाजिक प्रबोधनासाठी, अभ्यास, संशोधन, विवेकी भुमिका ही पुर्वशर्त असते याचे भान मला होते. पण दुर्दैवाने अल्पश: यशाने हुरळुन जावुन मेश्राम आणि खेडेकरांनी शिवराळ भाषा आणि बेफाम आरोपांचा जणु भडीमारच सुरु केला. आपण म्हणजेच फुले-आंबेडकरी चळवळ असे समीकरण आपल्या भक्तांकरवी राबवायला सुरुवात केली. नेत्यांचा इको बनुन सर्वांनी बोलले पाहिजे अशी दमबाजी सुरु झाली, कोणीही स्वतंत्र मते मांडणे हा गुन्हा ठरु लागला. एकचालुकानुवर्तीत्व, गोपनीय आर्थिक व्यवहार, जातीची हिटलरशाही आणि ब्राह्मणद्वेषाची अनियंत्रित मांडणी याचा जाच असह्य होवू लागल्यामुळे या मंडळीपासुन दुर होणे अपरिहार्य बनले. डा. साळुंखे व मी यांच्यामुळे या संघटनांना विश्वासार्हता व प्रतिष्ठा मिळत असल्याने या पुढे त्यांच्या पापाचा भागिदार आपण व्हायचे नाही असे मला ठरवावे लागले. भांडारकरमद्धे आमचे असणे गेली २ वर्षे ज्यांना खटकले नव्हते त्यांनी ६ महिन्यांपुर्वी अचानक जाहीर ठराव करुन भांडारकर सोडण्याचा आम्हाला आदेश दिला. भोळ्या-भाबड्या कार्यकर्त्यांना emotional blackmailing करण्यासाठी भांडारकरचे हत्यार पुढे करण्यात आले. ज्या वैचारिक मतभेदांमुळे मी यांच्यापासुन दुर गेलो त्याकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी भांडारकरची ढाल वापरली गेली. गेली सहा महिने त्यांच्या मुलनिवासी नायक या मुखपत्रातुन किमान १०० वेळा धादांत खोट्या हेडलाईन्स, अग्रलेख, बातम्या व लेखांचा माझ्याविरुद्ध भडिमार करण्यात आला. व्यक्तिगत चारित्र्यहणन आणि अपशब्दांचा मारा बघुन खरे तर कोणीही हबकुन जाईल. मात्र ज्यांच्या सोबत मी ९-१० वर्षे रसद पुरवित मी काम केले ते सर्व ब्रिगेड व बामसेफचे कार्यकर्ते आपण अगतिक असल्याचे सांगत राहिले. या संघटनांमद्धे लोकशाहीचा लवलेशही नसल्यामुळे कोणीही ब्रही उच्चारणे शक्य नव्हते. या मंडळींना कधीतरी सद्बुद्धी सुचेल अशी अपेक्षा ठेवुन मी शांत राहिलो. मी पाठवलेला एकही खुलासा त्यांनी छापला नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडे असनारे हे सौजन्य पाळणे म्हणजे बहुदा चळवळीविरुद्ध वागणे असावे असा तर त्यांचा समज नाही ना? माझ्या संयमाला माझी अगतिकता मानुन नित्य नवे आरोप प्रत्यारोप चालुच ठेवण्यात आले. फुले आंबेडकरी चळवळीतील दिग्गज, शरद पाटील, रावसाहेब कसबे, भालचंद्र मुणगेकर, विलास वाघ, दत्ता भगत, उत्तम कांबळे, सुखदेव थोरात, नरेंद्र जाधव, नागनाथ कोत्तापल्ले आदिंवर अपशब्दांचा मारा करुन सातत्याने बदनामीपर मजकुर प्रकाशित केला जात होताच पण नंतर तो सारा रोख माझ्याकडे वळवण्यात आला. बहुदा त्यांचा अंतर्गत व्यवहार हरी नरकेंना माहित असल्याने त्यांनी तो उघड करु नये यासाठी "बदनाम करा, संशयास्पद बनवा आणि संपवा" ह्या नीतिचा वापर करण्यात आला. चवताळुन सारी यंत्रणा या कामाला लावण्यात आली. इतरांनी जणु हा आमचा अंतर्गत मामला आहे अशी समजुत करुन घेवुन सोयिस्कर मौन पाळले. शिविगाळीला पराक्रम समजणारी ही मंडळी विरोधाच्या नादात फुले-आंबेडकरी मुल्ल्ये बिनदिक्कतपणे पायदळी तुदवत सुटली. एकदा विवेक संपला कि फ्यासिझमचे बिभत्स रुप पुढे येणे अपरिहार्य असते. "वेश्या, भडवा, दलाल, बदमाश, हरामखोर" या शब्दांच्या आरत्या नित्यनेमाने ओवाळण्याचे कर्मकांड सुरु झाले. भक्तांकडुन शिवीगाळ आणि धमक्या यांचे सत्र सुरु करण्यात आले. "शत्रु तो शत्रुच आणि माजी-मित्रही शत्रुच" ही मोहीम हाती घेण्यात आली.
महापुरुषांना वेठीला धरुन खोट्या बातम्या देण्यात आल्या. देवदेवतांचा वापर करुन दंगली घडवणारे आणि महापुरुषांच्या बदनामीची खोटी आवई उठवुन चिथावणी देणारे हे लोक ही जुळी भावंडेच म्हटली पाहिजेत. असे करतांना आपण किती गंभीर सामाजिक गुन्हा करत आहोत याचे भानही त्यांना राहिलेले नाही. सुनियोजित दंगली घडवून सरसकट सर्वच ब्राह्मणांच्या कत्तली करा असा आदेशच खेडेकर यांनी "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" या ग्रंथाच्या प्रुष्ठ क्रमांक ५४-५५ वर दिला आहे. खेडेकरांच्या जिजाई प्रकाशनाचे हे पुस्तक ७व्या मराठा साहित्य सम्मेलनात सांगली येथे १३ नोव्हेंबर २०१० रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. (संदर्भासाठी पहा www.jijaiprakashan.com किंमत रु.२५/-) खेडेकरांनी आपले दादोजी कोंडदेव हे पुस्तक चक्क जेम्स लेनला अर्पण केले आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा खेडेकर या भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्ष आमदार होत्या. भांडारकर संस्थेमद्धे नरके-साळुंखेंनी जाण्याला ज्यांचा विरोध आहे त्यांना यातले काहीच कसे खटकत नाही? तोंडाने सतत बहुजनवादाचा गजर करणा-या खेडेकरांनी शिवराय-दादोजी संबंधातील शासकीय समितीवर ७ मराठा व ५ ब्राह्मण सदस्य घ्यायला लावले. त्यात ब्रिगेडचे ५ जण होते. तक्रारदारांनाच न्यायाधिश बनवण्याची ही जगावेगळी पद्धत म्हटली पाहिजे. बौद्ध, ओ.बी.सी., दलित-आदिवासी, भटके-विमुक्त यातील एकही इतिहासकार...ज्यांना समितीसाठी योग्य वाटला नाही ते तोंडाने बहुजनवादाचा गजर करत असतात यासारखा विनोद तो कोणता?
वरील घटनाक्रम पहाता आजवर मुक साक्षीदार बनलेल्या जाणत्यांना मी हे सांगु इच्छितो कि मी आजवर आतला आवाज ऐकुन विवेकाने वागत आलो आहे. संशोधन, लेखन व भाषणे करतांना कधीही तारतम्य सोडलेले नाही. पुराव्यांच्या आधारे आणि सत्याच्या कसोटीवर घासुन पाहिल्यानंतर जे जे सिद्ध झाले ते ते जनसामान्यांपुढे मांडतांना मी निर्भयपणे कोणाच्याही रागालोभाची पर्वा केलेली नाही. त्याची किंमत मला मोजलीच पाहिजे, त्याबद्दल माझी तक्रारही नाही. अनेक मतभेद असुनही या संघटनांचे काम बहुजनहिताचे आहे असा माझा समज असल्याने माझे संशोधन आणि विचार मांडण्यासाठी मी त्यांसोबत होतो...पण माझ्याच विचार-संशोधनाचा गैरवापर बिनदिक्कतपने सुरु झाल्याने आणि माझ्या पुस्तकांचा व सी.डीं.चा या त्यांच्या बदकर्माच्या समर्थनार्थ वापर होवु लागल्याने मला त्यांच्यासोबत राहणे अशक्य झाले. आणि ज्याक्षणी मी त्यांची साथ सोडली त्याक्षणी त्यांनी माझ्यावर क्रुर हल्ले सुरु केले.
सध्याची ही लढाई खरे तर अत्यंत विषम आहे. कोट्यावधी रुपये निधी मिळवणा-या बलाढ्य संघटना, त्यांचे पुर्नवेळ प्रचारक, भक्त, त्यांचे मुखपत्र विरुद्ध एक सामान्य अभ्यासक असा हा संघर्ष आहे. माझ्या सोबत फक्त सत्य आणि माझा विवेक आहे.
---------प्रा. हरी नरके

harinarke@gmail.com
harinarke@yahoo.co.in