Friday, February 11, 2011

उद्योगपती महात्मा फुले आणि शेअर मार्केट

महात्मा जोतीराव फुले यांचा १२० वा स्मृतिदिन उद्या (रविवारी)  आहे. त्यांच्या राहत्या घरी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले समता परिषदेने हा पुतळा भेट दिला असून अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ असतील. त्यानिमित्त महात्मा फुले यांच्या उद्योगपती आणि शेअर मार्केट या दुर्लक्षित पैलूंवर प्रकाशझोत टाकणारा संशोधक प्रा. हरी नरके यांचा लेख..
महात्मा जोतीराव फुले हे प्रामुख्याने समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही.
जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य करणारे जोतीराव मुळात एक उद्योगपती होते. ते ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवडय़ाचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४१ वर्षांनंतरही मजबूत आहे. त्याचे रहस्य जोतीरावांच्या कंपनीने संचोटीने केलेल्या कामात आहे.
‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार यांनी १८८९ ते १८९३ या काळात मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत बांधली, ते वंजारी समाजाचे होते. ते पुणे जिल्ह्य़ातील (शिरूर) घोडनदीचे होते. याशिवाय मुंबई, पुणे, बडोदे येथे त्यांनी अनेक टोलेजंग आणि देखण्या इमारती बांधल्या.
जोतीरावांचे स्नेही, सत्यशोधक रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा आदींची कामे केली. नरसिंग सायबू वडनाला यांनी भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप बांधले. मुंबईतील अनेक कापडगिरण्यांची बांधकामे त्यानी केली. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे.
जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असे कॉम्बिनेशन फार विरळेच म्हटले पाहिजे.
स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते.kAn Industrial department should be attached to schools in which children would learn useful trades And crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independentlyl ही त्यांची भूमिका होती. दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.
उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!
कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडून दाखवतात.
१) उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.
२) शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.
३) शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात.
जोतीरावांनी ‘शेअर मार्केट’वर उद्बोधक कविता लिहिलेल्या आहेत.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!
लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य!
शेअर्स कागदास पाहून रडती ! शिव्याशाप देती योजी त्यास!
शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग ! होऊन नि:संग मूढा लुटी!
आळशाचा खरा नित्य हाच धंदा! दुरूनच वंदा जोती म्हणे!
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.   

Sunday, February 6, 2011

दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण


दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण
-
प्रा. हरी नरके

या देशात ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघा उच्चवर्णीयांनी धर्मसत्ता, ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि सांस्कृतिक सत्ता यांच्यावरील वर्चस्वासाठी आपसात अनेक लढाया केलेल्या आहेत. शेकडो वर्ष त्यांनी मुत्सद्दीपणे तह किंवा युती करून दलित, आदिवासी, भटके -विमुक्त, इतर मागासवर्गीय आणि स्त्रिया यांना गुलामीत ठेवले आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा!
पुण्यात सध्या सामाजिक कलहाचा राजकीय फड रंगात आलेला आहे. हवेत गारठा असला तरी सामाजिक पर्यावरण मात्र तापलेले आहे. दादोजी कोंडदेव समर्थक आणि विरोधक अशी पुण्याची फाळणी करण्यात आलेली आहे. ह्या प्रश्नावर विवेकी भूमिका घेणारांनाही ब्राह्मणांचे हस्तक ठरवले जात आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कृतीचे समर्थन केले नाही तर बहुजनविरोधी ठरवले जाण्याच्या दहशतीमुळे पुण्यातील तमाम विचारवंत भेदरलेले आहेत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्याविरुद्ध ‘ब्र’ उच्चारणे म्हणजे जगणे असुरक्षित करून घेणे होय. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून हटविण्यासाठी ब्रिगेडने ३१ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. पुण्याच्या कारभाऱ्यांनी तत्पूर्वीच २७ डिसेंबरच्या मध्यरात्री २.१५ वाजता दादोजींची लालमहालातून उचलबांगडी केली. दादोजींची हकालपट्टी अटळच होती. लोकशाहीत वर्चस्वाच्या लढाईचा शेवट बहुमताच्या बाजूनेच होणार! या देशात ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघा उच्चवर्णीयांनी धर्मसत्ता, ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि सांस्कृतिक सत्ता यांच्यावरील वर्चस्वासाठी आपसात अनेक लढाया केलेल्या आहेत. शेकडो वर्ष त्यांनी मुत्सद्दीपणे तह किंवा युती करून दलित, आदिवासी, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय आणि स्त्रिया यांना गुलामीत ठेवले आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असा छान अभिनय केलेला आहे.
धनुर्विद्येत क्षत्रिय अर्जुनाचा कायम प्रथम क्रमांक राहावा यासाठी ब्राह्मण द्रोणाचार्यानी आदिवासी एकलव्याकडून न दिलेल्या शिक्षणाचे ‘वेतन’ म्हणून त्याचा अंगठा कापून घेतलेला आहे. क्षत्रिय रामाने एका ब्राह्मणाच्या तक्रारीवरून शूद्र शंबूकाची हत्या केलेली आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा! छत्रपती शिवरायांवर हिंदुत्ववादी संघपरिवार, सेना-मनसे यांचे वर्चस्व राहणार की ब्रिगेडचे हा खरा कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी ही धुळवड चालू आहे.
जेम्स लेनच्या खोडसाळपणानंतर दादोजींचा समूहशिल्पातील पुतळा तेथून काढून टाकण्यासाठी चर्चेतून मार्ग काढणे शक्य झाले असते. संबंधितांना विश्वासात घेऊन शांतपणे हा पुतळा हालविता आला असता. परंतु सामंजस्याने प्रश्न सुटला असता तर जातीय लढाईला सुरवात झाली नसती. त्यावरून वादंग पेटले नसते तर राजकीय श्रेयही मिळाले नसते आणि मतदारांमध्ये प्रक्षोभ निर्माण करून त्यांचे धृवीकरणही घडवता आले नसते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत अमेरिकन लेखक जेम्स लेन याने अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह लेखन केले. जिजाबाईंचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि समस्त भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या या किळसवाण्या लेखनाचा न्यायालयीन प्रतिवाद करण्याऐवजी या मजकुराची पत्रके छापून ब्रिगेडने गावोगाव वाटली. गावोगाव प्रक्षोभक भाषणे देऊन बदनामीकारक मजकुराची जाहिरात करण्यात आली. अशाप्रकारे जिजाऊ व शिवरायांच्या चारित्र्याचे धिंडवडे लेन, त्याला हा विकृत जोक सांगणारे खबरे आणि ह्या मजकुराला अफाट प्रसिद्धी देणारी ब्रिगेड या तिघानी संयुक्तरीत्या काढले आहेत. हा सामाजिक गुन्हा नाही काय?
इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहिजे. तथापि ते नि:पक्षपाती इतिहासकारांनी पुराव्यांच्या आधारे करावयाचे काम आहे. लोकशाही आणि बहुमताबद्दल आदर असला पाहिजे. मात्र इतिहासातील वादग्रस्त प्रश्न राज्यकर्त्यांनी बहुमताच्या आधारे सोडविण्याऐवजी ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे सोपवले पाहिजेत. लोकशाहीला विद्वानांचे वावडे असते काय? दादोजी हे छत्रपतींचे गुरू नव्हते, असा निर्णय ज्या शासकीय समितीने दिला, तिचे स्वरूप यानिमित्ताने समजून घेतले पाहिजे. त्या समितीमध्ये पदसिद्ध अध्यक्ष आणि सचिव यांच्याव्यतिरिक्त जे तेरा सदस्य होते, त्यातील आठ मराठा आणि उर्वरित सर्व ब्राह्मण नेमण्यात आले होते, हा केवळ योगायोग असेल काय? राज्यात इतर जातींमध्ये इतिहासकार नसतील काय? अशा पद्धतीने दोनच जातींचे लोक घेऊन या प्रश्नाला जातीय वळण कोणी दिले? शालेय शिक्षण व क्रीडामंत्री श्री. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासकारांची ही समिती २ जुलै २००८ रोजी नियुक्त करण्यात आली होती. ज्या संभाजी ब्रिगेडने तक्रार केली होती, त्यांचे पाच प्रमुख पदाधिकारी या समितीवर घेण्यात आले. त्यांचे इतिहासविषयक योगदान महाराष्ट्राला अनभिज्ञ आहे. फिर्यादी ब्रिगेडचे पदाधिकारी बहुसंख्येने समितीत घेतल्यामुळे बहुधा काही तज्ज्ञांनी या समितीच्या कामकाजापासून दूर राहणे पसंत केले. ते सर्वजण नेमके ब्राह्मण होते, हा योगायोग असेल किंवा नसेलही! फिर्यादीच्या हाती न्याय यंत्रणेतील बहुमत देऊन वाद मिटविण्याचा अभिनव मार्ग (ब्रिगेड पॅटर्न) शोधण्यात आला. शासकीय समितीच्या राजमान्यतेची मोहर लावण्यात आलेला हा निर्णय ब्रिगेड तज्ज्ञांचा निर्णय आहे, असा ठपका ठेवायला जागा का करून देण्यात आली? या समितीमध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे, श्री. जयसिंगराव पवार, डॉ. वसंत मोरे, शिवश्री श्रीमंत कोकाटे, (शासकीय आदेशाप्रमाणे यथामूल), श्री. गंगाधर बनवरे, श्री. चंद्रशेखर शिखरे, श्री. प्रवीण गायकवाड, डॉ. अ. रा. कुलकर्णी, श्री. गजानन मेहेंदळे, प्रा. अनुराधा रानडे, शिवशाहीर विजय देशमुख, श्री. निनाद बेडेकर, डॉ. आ. ह. साळुंखे यांचा समावेश होता. शासनाने समितीचा अहवाल छापून उपलब्ध का करून दिला नाही? शासकीय समितीच्या विश्वासार्हतेला ब्रिगेड पॅटर्नचे वळण देऊन हा प्रश्न सुटला काय? समितीचे अध्यक्ष श्री. पुरके यांना ब्रिगेडने ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. ब्रिगेडचे राज्य आले की पूरकेंनाच मुख्यमंत्री नेमू अशी घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी हा पुरस्कार शालिनीताई पाटील यांना देण्यात आला होता. समितीच्या नियुक्तीचा आदेश श्री. सतीश जोंधळे या अवरसचिवांच्या सहीने काढण्यात आला असला तरी समिती राज्यपालांनी एका अध्यादेशाने स्थापन केली होती, असा प्रचार ब्रिगेडतर्फे केला जात आहे.
छत्रपती शिवरायांवर हिंदुत्ववादी संघपरिवार, सेना-मनसे यांचे वर्चस्व राहणार की ब्रिगेडचे हा खरा कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी ही धुळवड चालू आहे.
‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर राज्यशासनाने बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने ती उठवली. सुरुवातीला हा निर्णय बंदीच्या आदेशातील तांत्रीक चुकांमुळे घेण्यात आला. नोटीफिकेशनमध्ये योग्य ते फेरबदल करण्याची संधी सरकारला दुसऱ्यांदा देण्यात आली होती. तिचा फायदा का घेतला गेला नाही? नवीन नोटीफिकेशन काढायला न्यायालयाने मनाई केलेली नव्हती. तांत्रिक मुद्दय़ांवर ही बंदी उठली होती मात्र ती परत घालणे शक्य असूनही घातली गेली नाही. हा खटला चालू असताना ब्रिगेडने खटल्यात पार्टी बनून आपला वकील का दिला नाही? या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात तेव्हा प्रलंबित असलेल्या अपीलात शिवप्रेमी संघटनांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. पुढे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविण्याचा हा निर्णय कायम केला. एखाद्या प्रकाशनावर बंदी घालण्याचा शासन निर्णय हा प्रगल्भ व चिकित्सक असणाऱ्या व्यक्तीसमूहाच्या मतांशी सुसंगत हवा, संकुचित वैचारिक क्षमतेवर आधारित नको, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. ही बंदी उठवण्यातच काही मंडळीना रस होता असे दिसते. प्रकरण मिटवण्याऐवजी चिघळत राहीले तरच मतदारांमध्ये संताप वाढू शकतो आणि मतदारांचे धृवीकरण होऊ शकते.
या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी, ‘‘हे पुस्तक जेम्स लेनने लिहीलेले नसून १४ भांडारकरी भटांनी लिहीलेले आहे.’’ असे ब्रिगेडने घोषित केले. (पहा- दै. मूलनिवासी नायक, पुणे, ११ जानेवारी २०११) ‘‘या चौदा भटांचा पोस्टल अ‍ॅड्रेस शोधून द्या व मोठे बक्षीस मिळवा’’ अशी हेडलाइनच या वृत्तापत्रात देण्यात आलेली आहे. ‘‘हे १४ भट आजही पुण्यात बिनबोभाटपणे हिंडत आहेत. ’’ या १४ भटांना गंभीर स्वरूपाची शिक्षा द्यावी अशी मागणी या दैनिकात वारंवार केली जाते. आणि वाचकांना हल्ल्याची चिथावणी दिली जाते. ( पहा - मूलनिवासी नायक, दि.१ ते ११ जाने. २०११) हे दैनिक ब्रिगेड आणि त्यांची सहकारी बामसेफ यांचे प्रकाशन आहे. या वृत्तपत्रातून जातीय द्वेष पसरवणारा अत्यंत प्रक्षोभक मजकूर सातत्याने प्रकाशित केला जातो. माथी भडकवणाऱ्या अशा प्रचारामुळेच ४ जानेवारी २००४ रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हिंसक हल्ला करण्यात आला होता. भांडारकरच्या १४ जणांनी गुप्त कट करून ही माहिती लेनला पुरवली ही ब्रिगेडची ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ ब्रिगेडच्या गोबेल्स तंत्रामुळे आता बहुजन विचारवंत व नेते उचलून धरू लागले आहेत. सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी लातूरला १० ऑक्टोबर २०१० रोजी ‘कोंडदेव पुतळा हटाव परिषद’ घेतली होती. सत्यशोधक समाजातर्फे घेण्यात आलेल्या या परिषदेत अनेक मान्यवर प्राचार्य, संपादक, विद्वान यांची भाषणे झाली. परिषदेच्या निमंत्रणपत्रकात म्हटले आहे की, ‘‘कोंडदेव (कुलकर्णी) हा शिवाजीचा आहे. हा विनोद आहे अशी माहिती ब. मो. पुरंदरे आणि त्यांचे वैचारिक वारसदार तसेच पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील १४ विकृत तथाकथित विद्वांनांनी जेम्स लेनला दिली.’’ ( च्या जागी या पत्रकात छापलेला शब्द जिजाऊंची बदनामी करणारा असल्याने प्रस्तुत लेखकाने वगळून त्याजागी फुल्या मारल्या आहेत.)
जेम्स लेनने आपल्या पुस्तकात असंख्य लोकांचे आभार मानलेले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय किर्तीचे विद्वान गुंथर सोन्थायमर, डॉ. एलिनॉर झेलीयट, अ‍ॅन फेल्डहाऊस, अेरिना ग्लुस्कोवा आदिंचाही समावेश आहे. डॉ. झेलीयट यांनी दलित चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर केलेले संशोधन जगभर मान्यता पावलेले आहे. सोन्थायमर हे वारकरी चळवळीचे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी महात्मा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करण्याच्या कामी पुढाकार घेतला होता. लेनने पंधरा भारतीयांचा आभारात उल्लेख केलेला आहे. १) मिरा कोसंबी २) डॉ. अ. रा. कुलकर्णी ३) डॉ. राजेंद्र होरा ४) नरेंद्र वागळे ५) डॉ. जयंत लेले ६) वा. ल. मंजूळ ७) डॉ. दिलिप पुरुषोत्ताम चित्रे ८) डॉ. श्रीकांत बहुलकर ९) डॉ. सुचेता परांजपे १०) वाय. बी.दामले ११) रेखा दामले १२) भास्कर चंदावरकर १३) मीना चंदावरकर १४) माधव भंडारे १५) अजगर अली इंजिनियर. प्रत्यक्षात यातील अनेकांचा भांडारकर संस्थेशी कधीही संबंध आलेला नाही. यातील डॉ. होरा हे जैन होते. चित्रे हे सीकेपी तर वागळे, भास्कर चंदावरकर व मीरा कोसंबी हे सारस्वत. या चौदातील सहाजणांचा मृत्यू झालेला आहे. (दामले पतीपत्नी, चित्रे, होरा, कुलकर्णी, चंदावरकर) त्यांना आता फासावर कसे द्यायचे? ब्रिगेड मात्र म्हणते, ‘‘हे चौदाजण आजही पुण्यात हिंडत आहेत.’’
यातील अनेकांचे लेखन, संशोधन आणि अन्य योगदान हे बहुजन-दलित चळवळीला उपकारक ठरलेले आहे. जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान धर्मानंद कोसंबी यांची नात आणि डॉ. डी. डी. कोसंबी यांची समाजशास्त्रज्ञ कन्या डॉ. मीरा कोसंबी, संत तुकारामांचे अभंग इंग्रजीत भाषांतरीत करून तुकारामांना वैश्विक स्तरावर प्रथमच घेऊन जाणारे आणि आयुष्यभर प्रागतिक विचारांच्या पुरस्कारार्थ झुंजणारे चित्रे, फुले-शाहू-आंबेडकरवादी राज्यशास्त्रज्ञ डॉ. होरा, थोर सामाजिक इतिहासकार कुलकर्णी, पुरोगामी छावणीचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते जयंत लेले, दया पवारांच्या ‘बलुतं’ वर चित्रपट काढणारे, घाशीराम कोतवालचे संगीतकार चंदावरकर, बहुजनांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविता यावे, यासाठी ‘पहिलीपासून इंग्रजी’च्या मोहिमेत हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या थोर शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर आदींना लेनचे हस्तक ठरविणे ही कृतघ्नता आहे. सापसाप म्हणून भुई धोपटणे किंवा गैरसोयीच्या जमिनीलाच साप असल्याचे घोषित करून झोडपणे हा अस्मितेच्या राजकारणाचा कळस करणारा ब्रिगेड पॅटर्न आहे.
ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे.
भांडारकर संस्थेबाबत या मंडळीना इतका तिरस्कार आहे की त्या संस्थेशी ज्यांचा संबंध येतो त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाते. दोन वर्षांपूर्वी डॉ. आ. ह. साळुंखे व माझी महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय प्रतिनिधी’ म्हणून भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. २४ ऑक्टोबर २०१० रोजी ब्रिगेडने त्यांच्या मेळाव्यात जाहीर ठरावाद्वारे आम्हा दोघांना राजीनामा द्यायला सांगितले. हा ठराव अद्यापपर्यंत आम्हाला पाठविण्यात वा कळविण्यात आलेला नाही. स्वत:च्या वृत्तपत्रातून त्याला भडक प्रसिद्धी देऊन ‘‘राजीनामा का देत नाही?’’ म्हणून धमकावणे मात्र चालू आहे. विचारांची ही नाकेबंदी म्हणजे नवफॅसिझमच आहे.
साक्षेपी इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी १९९६ साली प्रकाशित केलेल्या ‘श्री राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या खंड १, भाग-१, च्या पृष्ठ क्रमांक ६०४ ते ६३८ वर अस्सल दस्तावेजांच्या आधारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल लिहिले आहे. मेहेंदळे यांची तटस्थता आणि संशोधननिष्ठा वादातीत आहे. मेहेंदळे मराठा नसूनही त्यांनी ही चिकित्सक मांडणी केलेली आहे. आजवर दादोजी कोंडदेव हे ब्राह्मणांचे ‘आयडॉल’ नव्हते. पराक्रमी ब्रिगेडने द्वेषाच्या आधारे दादोजींना ब्राह्मणांचा ‘आयकॉन’ बनवण्याचे महत्कार्य केले आहे.
मेहेंदळे, न. र. फाटक, शेजवलकर, पगडी, ग. ह. खरे, य. दि. फडके, बेंद्रे, कमल गोखले आदींनी संभाजी महाराजांबद्दलचे गैरसमज दूर करणारे लेखन केले. त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात, परंतु त्यांनी हेतूपूर्वक इतिहास बदलला असे म्हणता येत नाही. ब्रिगेडने या साऱ्यांनाच ब्राह्मण म्हणून ‘टार्गेट’ करण्याचा सपाटा लावलेला आहे. मेहेंदळे यांनी शिवचरित्रासाठी केलेला व्यासंग स्तिमित करणारा आहे. त्यांनाही सध्या लेनचे हस्तक ठरवून ‘फासावर लटकवा’ असे ब्रिगेडवाले म्हणत आहेत.
‘६ कलमी शकावली’,‘ ९१ कलमी बखर,’ ‘चिटणीस बखर’ आदींच्या आधारे काही मंडळींनी दादोजींना गुरूस्थानी स्थापित केले. ‘‘मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याठिकाणी दादोजींनी सोन्याचा नांगर फिरवला’’ आदी नोंदींच्या आधारे लालमहालात दादोजी, शिवराय व जिजाऊ यांचे समूहशिल्प २०००च्या आसपास बसवण्यात आले. त्याला कोल्हापूर व सातारा दरबारने तेव्हा उपस्थित राहून आशीर्वादही दिले. आता त्यांची भूमिका बदललेली आहे. त्यावेळी ही राजघराणी राजकीयदृष्टया भाजपा-सेनेबरोबर होती. आता ती विद्यमान सत्ताधाऱ्यांसोबत आहेत, याचा या मतपरिवर्तनाशी अर्थाअर्थी संबंध असेल किंवा नसेलही! हे समूहशिल्प पाहूनच लेनने पुस्तकात बदनामीकारक मजकूर लिहिला असाही दावा ब्रिगेडकडून छातीठोकपणे केला जातोय. प्रत्यक्षात मात्र हे शिल्प लालमहालात बसवण्यात आल्यानंतर आजवर लेन भारतात आलेला नाही.
धनुर्विद्येत क्षत्रिय अर्जुनाचा कायम प्रथम क्रमांक राहावा यासाठी ब्राह्मण द्रोणाचार्यानी आदिवासी एकलव्याकडून न दिलेल्या शिक्षणाचे ‘वेतन’ म्हणून त्याचा अंगठा कापून घेतलेला आहे. क्षत्रिय रामाने एका ब्राह्मणाच्या तक्रारीवरून शूद्र शंबूकाची हत्या केलेली आहे. या दोघांच्या युतीत कायम बळी गेला तो दलित-ओबीसींचा!
लेन हा इतिहासकार नसून तो धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. त्याचे भांडारकर अतिथीगृहावरील वास्तव्य ३ आक्टोबर १९८० ते ६ मार्च १९८१ या काळात होते. त्याला महाभारतावर ग्रंथ लिहिण्यासाठी एक शिष्यवृत्ताी मिळाली होती. त्यानिमित्ताने तो भांडारकरमध्ये आला होता. दी डी नोबिली रिसर्च लायब्ररी प्रकाशनाने त्याचा महाभारतावरील ‘व्हीजन्स ऑफ गॉड’ (नॅरेटिव्ह ऑॅफ थिओफेनी इन दी महाभारत ) हा ग्रंथ व्हिएन्नावरून १९८९ साली प्रसिद्ध केला होता. त्यानंतर पुढील अभ्यासाच्या निमित्ताने तो पुण्यात आला तरी भांडारकरवर राहिलेला नाही. त्याने शिवाजीमहारांजाशी संबधित दोन पुस्तके लिहिलेली आहेत. संस्कृतमधील शिवचरित्रांचा तो अभ्यास करीत होता. परमानंद यांच्या संस्कृत शिवकाव्यावर त्याने इंग्रजीत ग्रंथ लिहिला. त्यात संस्कृत भाषेचे तज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर यांचा संस्कृत महाकाव्यांवर एक लेख आहे. बहुलकर हे बौद्ध साहित्याचे अभ्यासक असून ते सारनाथच्या ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटीयन स्टडीजचे’ चीफ एडीटर आहेत. ते इतिहासाचे किंवा शिवचरित्राचे अभ्यासक नाहीत. त्यांचा व लेनचा संबंध आला तो संस्कृतच्या माध्यमातून. भांडारकर संस्थेने छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ‘बुधभूषण’ हा संस्कृतमधील ग्रंथ (संपादक- एच. डी. वेलणकर) १९२६ साली प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद अलीकडेच संभाजी ब्रिगेडच्या सौ. शैलजा ज्ञानेश्वर मोळक यांनी श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रकाशित केलेला आहे.
ब्रिगेडचा डॉ. भांडारकरांवरचा आणि संस्थेवरचा राग अज्ञान, जातीय आकस आणि दूषित पूर्वग्रहातून आलेला आहे. सर भांडारकर यांनीच लेनला ही माहिती पुरविली असा भ्रम पसरविला जात आहे. ज्यांच्या मृत्यूला ८४ वर्षे झालेली आहेत आणि लेनचे वय ज्याअर्थी ८४ वर्षे नाही त्याअर्थी डॉ. भांडारकर त्याला ही तोंडी माहिती कशी देणार? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि प्रार्थना समाजासोबत आयुष्यभर राहिलेल्या आणि ज्यांचा गौरव खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे त्या प्रागतिक विचारांच्या प्राच्यविद्यापंडीताला झोडपले जात आहे. ‘‘डॉ.भांडारकरांसारख्या हिंदु धर्मशास्त्राचे मंथन केलेल्या थोर विद्वान पुरुषांनी हल्लीची जातीभेदाची पद्धत कृत्रिम, अशास्त्रीय, विषमतामूलक व समाजाच्या प्रगतीला अडथळा आणणारी आहे असे स्पष्टपणे प्रतिपादिले आहे,’’ या शब्दांत डॉ. आंबेडकरांनी त्यांचा गौरव केला होता. (पहा - डॉ. आंबेडकरांचे बहिष्कृत भारत व मूकनायक, पृ.३३८) ‘‘माशांच्या पिल्लांना ज्याप्रमाणे पोहावयास शिकवावे लागत नाही, त्याचप्रमाणे मालीनीबाईला सुधारणेची शिकवण देण्याचे काही कारण नाही. तसे जर नसते तर मालिनीबाईने ही सामाजिक सुधारणेतील अगदी लांबची उडी घेतलीच नसती.’’ असे उद्गार डॉ. आंबेडकरांनी भांडारकरांच्या नातीने केलेल्या मिश्रविवाह प्रसंगी काढले होते. (उपरोक्त, पृ.४८) माशांना पाण्यात पोहायला शिकविण्याची गरज नसते ही प्रतिमा महात्मा फुले शिवरायांसाठी वापरतात, तर डॉ. आंबेडकर भांडारकरांच्या नातीसाठी वापरतात. ‘‘भारतीय समाजसुधारकांच्या यादीत बुद्ध, महावीर, बसव, कबीर, फुले, रानडे, विवेकानंद यांच्या मालिकेत भांडारकरांचा समावेश होतो.’’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोंदवतात. (उपरोक्त, पृ २६२) ब्रिगेडवाले फुले-आंबेडकरांच्या नावांचा गैरवापर करून भांडारकरांना बदनाम करीत आहेत, याचा निषेध चळवळ करणार आहे काय? ब्राह्मण म्हणून मुलाहिजा न करणाऱ्या ज्या शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अनेक ब्राह्मण होते त्यांनाच ब्राह्मणविरोधी म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. सत्यशोधक चळवळ ताब्यात घेऊन तिचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत केले गेले. बहुजन फुले-आंबेडकरी चळवळीच्या जोरावर मिळालेल्या राजकीय सत्तेचे अपहरण करून तिला एकजातीय मुठीत बंदीस्त करण्यात आले. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. फुले आंबेडकरी छावणीची परिभाषा अलगद उचलून घुसखोरांनी शासनकर्त्यांना ते शोषणकर्ते असतानाही शोषितांचे नेते म्हणून डोक्यावर बसविले आहे. हे राजकारण उघडे पाडणाऱ्यांना ब्राह्मणांचे हस्तक ठरविण्याचा हातखंडा प्रयोग केला जात आहे. बामसेफसारख्या कट्टरतावादी संघटना भ्रमित होऊन या मंडळींचे प्यादे बनत असल्याची शंका लोकांना येऊ लागली आहे. गोपनीय आर्थिक व्यवहार, लोकशाही व ज्ञान यांच्याविषयीची घृणा आणि संघपरिवाराप्रमाणे एकचालकानुवर्तित्व यामुळे घसरण सुरू आहे.
आज देशात सनातनी व कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादाविरोधी एक स्पेस तयार झालेली आहे. तिचे नेतृत्व हायजॅक करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाची आरोळी ठोकली जात आहे.
२३ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनने दिलेल्या माफीनाम्यात म्हटले होते की, I did not get it from any Marathi or English book or Sanskrit text and I have it recorded in field notes from 1987, having heard it on the street from an unknown person. It is an unimportant part of my argument. None of the persons mentioned in my preface told me that joke. Nor were any of the institutions mentioned, namely the Bhandarkar Oriental Research Institute ----- nor any of their personnel responsible for the arguments I develop in the work. Again, I must emphasize that this now infamous report of a street joke and all the opinions expressed in the book have nothing to do with the persons now criticized for helping me in my work. The fact that they arranged for me to get books and materials and have helped with translations should in no way make them responsible for my opinions and arguments.
( मला ही माहिती कोणत्याही मराठी, इंग्रजी किंवा संस्कृत पुस्तकातून मिळालेली नसून मी संशोधनाच्या निमित्ताने १९८७ साली फिरत असताना रस्त्यावरील एका अनोळखी व्यक्तीकडून मी हे ऐकल्याची नोंद माझ्या टीपणांमध्ये आहे. हा माझ्या युक्तिवादातील बिनमहत्त्वाचा भाग आहे. मी ज्यांचे प्रस्तावनेतील आभारात उल्लेख केले आहेत त्यापैकी कुणीही व्यक्ती किंवा संस्था, जसे की भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था किंवा इतर संस्थामधील कोणाही व्यक्तीला माझ्या या युक्तीवादासाठी जबाबदार धरणे उचित होणार नाही. मी पुन्हा एकदा जोर देऊन सांगतो की रस्त्यावरील या कुप्रसिद्ध विनोदासाठी आणि पुस्तकामध्ये व्यक्त केलेल्या मतांसाठी सध्या ज्यांच्यावर मला मदत केल्याचे प्रकरणी टीका केली जात आहे त्यांचा काडीमात्रही संबंध नाही. सत्य हे आहे की ज्यांनी मला पुस्तके व इतर संदर्भसाहित्य पुरविण्याच्या कामी आणि अनुवादासाठी मदत केलेली आहे त्यांना माझी मते वा युक्तिवाद यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार धरण्यात येऊ नये.)
तरीही लेनला शिक्षा व्हावी असे न वाटता त्याऐवजी भांडारकर संस्था आणि त्याने ज्यांचे आभार मानलेत त्या पंधरा भारतीयांपैकी चौदा व्यक्तिंना ब्लॅकलिस्ट करावेसे ब्रिगेडला वाटते यामागचे राजकारण समजून घेणे गरजेचे आहे.
ब्रिगेडचे नेते श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी भारतीय जनता पक्षाच्या १५वर्षे आमदार होत्या. आजही त्या पदाधिकारी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांचे श्री. खेडेकर यांच्याशी अत्ंयत ‘मधुर संबंध’ आहेत. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना श्री. खेडेकर शासनाचे कार्यकारी अभियंता म्हणून गडकरींचे ‘किल्लेदार’ होते. हिंदूंचे संघटन करीत अहिंदू द्वेषावर आधारीत वाटचाल करणारा संघपरिवार आणि मराठा संघटन करीत अमराठा द्वेषावर उभा असलेला ‘मराठा सेवा संघ’ यांच्या कार्यपद्धतीत आणि विचारधारेत लक्षणीय साम्य आहे. संघपरिवाराचे साहित्य आणि मराठा सेवा संघाने प्रकाशित केलेल्या १००पेक्षा जास्त पुस्तिका यांचा तौलनिक अभ्यास केला असता असे दिसते की संघाने जेथे जेथे ‘मुस्लिम’ शब्द वापरला आहे तेथे तेथे सेवा संघाने ‘ब्राह्मण’ शब्द घातला आहे. बाकी सारे एकसारखेच आहे! गुजरातमध्ये अफझलखान वधाचे चित्र लावून ‘‘धार्मिक दहशतवाद असा नष्ट केला जातो.’’ असा प्रचार संघाने केला होता. त्यात अफजलखानाच्या जागी ‘कृष्णाजी भास्कर कुलकर्णी’ याचे चित्र छापून ‘‘सांस्कृतिक दहशतवाद असा नष्ट केला जातो’’ असा प्रचार सेवा संघाने केला होता. ‘भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा’ अशी पुस्तिका लिहून खेडेकरांनी महात्मा फुले एका भटजीच्या पोटात नांगर खुपशित असल्याचे मुखपृष्ठावर दाखविले होते. सरसकट सर्व ब्राह्मणांना झोडपण्यामागे त्यातील फुले आंबेडकरवादी, परिवर्तनवादी शक्तींचे मित्र असलेल्यांना बहुजनांचे शत्रू म्हणून बदनाम करणे आणि संघ परिवाराच्या काळया बाजूकडून लोकांचे लक्ष या प्रागतिक शक्तींविरुद्ध केंद्रीत करायला लावणे हा डावपेच यामागे आहे.
ब्रिगेड किंवा बामसेफ या संघटनांचा मी कधीही सदस्य नव्हतो. मात्र त्यांच्या काही कार्यक्रमांना उपस्थित होतो. त्यांना बहुजन समाजाची मान्यता मिळवून देण्यात माझा व डॉ. आ. ह. साळुंखे यांचा हातभार लागलेला आहे. त्यांच्या तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धतीचा मी जवळून अभ्यास केलेला आहे. आज देशात सनातनी व कर्मठ विचाराच्या ब्राह्मणवादाविरोधी एक स्पेस तयार झालेली आहे. तिचे नेतृत्व हायजॅक करण्यासाठी ब्राह्मणद्वेषाची आरोळी ठोकली जात आहे. यामागे संघपरिवाराची लांब पल्ल्याची व्यूहरचना आहे. समझौता एक्स्प्रेस बाँबस्फोट, सुनिल जोशी, इंद्रेश कुमार, प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, असिमानंद आदी प्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे की मुस्लीम मूलतत्तववादी आणि हिंदुत्त्ववादी यांच्या कार्यपद्धतीत अनेक साम्यस्थळे आहेत. ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे. दररोज जातीय विद्वेष पसरवणारा रतीब घालून भोळ्याभाबडय़ा बहुजनांची माथी भडकावली जातात. त्यांना हल्ले करायला प्रवृत्त केले जाते. हे चळवळीचे तालिबानीकरण आहे.
ब्रिगेडचा आंतरिक हेतू त्यांच्या कृती आणि साहित्यातून शोधावा लागतो.
मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा!
दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा!
सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा!
ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!
ब्रिगेडचा हा अंतस्थ कावा आता उघडा पडला आहे. ब्रिगेडला कोंडदेव विरोधी राजकारणातून जी शक्ती आणि प्रसिद्धी मिळाली, तिचा वापर मराठा ओबीसीकरणासाठी करण्यात आला. अमराठाद्वेष हे सूत्र घेऊन, ‘‘जिभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा’’ अशी मांडणी उघडपणे केली गेली. आरक्षण मागणारेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा, अशी मागणी करीत आहेत, ही विसंगती नव्हे काय? डॉ. आंबेडकरांच्या रिडल्सवर बंदी घालण्याची मागणी करणारे ब्रिगेडचेच बंधू आहेत. बाबासाहेबांना निजामाच्या हस्तक म्हणणाऱ्या शालिनीताई यांच्या मार्गदर्शक आणि ‘मराठा विश्वभूषण’ आहेत. खरलांजी हत्याकांडाचे त्यांनी जाहीरपणे समर्थन केले होते. रमाबाई नगर गोळीबार प्रकरणातील आरोपी मनोहर कदम हा स्वजातीय असल्याने शासनाला त्याच्यावर कारवाई करू दिली जात नाही. ओबीसी नेत्यांना मराठाद्वेष्टे ठरवून राजकीय आयुष्यातून उठविण्याचा ब्रिगेडचा कावा असतो. (पाहा - पुरुषोत्तम खेडेकर, रेखांकन) ब्रिगेडने रमाबाई नगर व खरलांजीप्रकरणी कधीही भूमिका घेतलेली नाही.
ब्रिगेड किंवा बामसेफ या संघटनांचा मी कधीही सदस्य नव्हतो. मात्र त्यांच्या काही कार्यक्रमांना उपस्थित होतो. त्यांना बहुजन समाजाची मान्यता मिळवून देण्यात माझा व डॉ. आ. ह. साळुंखे यांचा हातभार लागलेला आहे.
अफगाणिस्थानातील बामेमियांची प्राचीन बुद्धमूर्ती फोडणे, बाबरी मशीद पाडणे, कुमार केतकरांच्या घरावर आणि भांडारकरवर हल्ला करणे आणि शिवरायांचे इमानी सेवक आणि प्रशासक असलेल्या दादोजींचा पुतळा अध्र्या रात्री कटरने कापून त्यांची हकालपट्टी करणे यामागची मानसिकता एकच आहे. लोकशाही, ज्ञानविश्व, संशोधन, विद्वत्ता या साऱ्यांबद्दलची घृणा यातून पोसली जातेय. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. आणि म्हणून चळवळीने याबाबत निर्भयपणे भूमिका घेणे, ही काळाची गरज आहे. मराठा समाजातील अनेकांना चाललेय हे मान्य नाही. काही संभ्रमित आहेत. विवेकी आणि ज्ञानी मंडळींनी आता मौन सोडले पाहिजे. आणि वैचारिक फरफट सहन करण्याऐवजी या अपप्रवृत्तींवर भूमिका घेतली पाहिजे. अशा संकुचित विचारांना फुले-आंबेडकरी चळवळीमध्ये थारा मिळू नये, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे.
harinarke@yahoo.co.in
(प्रस्तुत लेखक हे पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक व प्रमुख असून त्यांचे फुले-शाहू-आंबेडकर या विषयावर ३५ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.