शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले.माणगाव परिषदेत बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सनउत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.
कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्श भेटुन ११ वर्षांपुर्वी दिले.त्यांनी त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ट सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे.त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.
आम्हाला खुप आनंद झाला.
श्री. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ट आय.ए.एस.अधिकारी श्री. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.
पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिक्रुत चरित्रकार लठ्ठे, कीर,जाधव,पवार आदी सर्वांनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खान्डेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.
पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.
या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे.तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, डॉ. कणबरकर यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे