Monday, May 21, 2012

व्यंगचित्राचे राजकारण


 रविवार /२० मे२०१२
व्यंगचित्राचे राजकारण
  एका व्यंगचित्रावरून गेले काही दिवस आपले समाजजिवन ढवळून निघाले आहे.एन.सी.ई.आर.टी.या केंन्द्रीय अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करणा-या संस्थेने इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात छापलेल्या एका व्यंगचित्रावरुन गदारोळ माजला आहे.संसदेत खासदारांनी जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हे व्यंगचित्र पुस्तकातुन काढून टाकल्याची प्रथम घोषणा केली आणि नंतर हे पुस्तकच अभ्यासक्रमातुन काढुन टाकले.त्याच्या निर्मितीची चौकशी करण्यासाठी आंबेडकरवादी डा.सुखदेव थोरात यांची समिती नेमण्यात आली आहे.या समितीचा अहवाल येईल तेव्हा ग्रंथाच्या निर्मितीमागील चित्तरकथा कळू शकेल.भारत सरकारच्या या पावलांचा निषेध नोंदविण्यासाठी ग्रंथसमितीचे डा.सुहास पळशीकर आणि डा.योगेंद्र यादव यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यावर खटले भरावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.
जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांनी १९४९ साली ’शंकर्स विकली’त प्रकाशित केलेले हे व्यंगचित्र आहे.स्वता डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पाहिलेले असणार.मात्र त्यांनी त्याला आक्षेप घेलल्याचे दिसत नाही.डा.बाबासाहेब हे अतिशय खिलाडूव्रुतीचे होते. इतरांनी केलेल्या टिकेवर  ते चिडत नसत. स्वागतच करीत. ते स्वताही अनेकांवर तुटून पडत.महात्मा गांधी,कांग्रेस,नेहरू,राम,क्रुष्ण,हिंदू धर्म यावर त्यांनी कडाडून टिका केलेली आहे.या व्यंगचित्राचे ३ अर्थ लावण्यात आलेले आहेत. भारतीय संविधान बनविण्याची प्रक्रिया सुमारे ३ वर्षे चालु होती.हया उशीर होण्याला डा. बाबासाहेब जबाबदार आहेत असे हे व्यंगचित्र सुचवते.संविधान निर्मितीची प्रक्रिया गोगलगायीच्या गतीने चालू असुन डा. बाबासाहेब आणि पंडित नेहरू हातातील आसुडाने तिला वेग देण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. {१}नेहरू हातातील चाबकाने कोणाला मारीत आहेत याबद्दल दुमत आहे. एका गटाला असे वाटते की नेहरुंनी बाबासाहेबांवर हा उगारलेला आसूड आहे.{२}दुसरा गट असे मानतो की नेहरू बाबासाहेबांच्या पाठीशी असून ते बाबासाहेबांप्रमाणेच गोगलगायीला मारीत आहेत.{३}संविधान निर्मितीत बाबासाहेबांचा वाटा सिंहाचा असून त्यातील जमेच्या सर्व गोष्टींचे श्रेय आणि विलंबाचे अपश्रेय हे दोन्ही बाबासाहेबांचेच आहे.
चाबूक दोघांच्याही हातात आहे.नेहरू बाबासाहेबांकडे बघत नसून जमिनीकडे खाली पहात आहेत.ते गोगलगायीलाच मारीत आहेत,हे स्पष्ट आहे.आपण एकाकडे बघत दुस-याला मारीत नसतो.ज्याला मारायचे त्याच्याकडेच माणूस पहातो हे कुणीही सांगू शकतो.असे असताना ह्यावर एव्हढा गदारोळ का माजवला गेला?यामागे काय राजकारण आहे? याची शांतपणे उकल केली पाहिजे.
हे पुस्तक गेली ६ वर्षे अभ्यासक्रमात शिकविले गेले आहे.मायावती सत्तेवर असताना ते उत्तरप्रदेशात शिकविले गेले.त्याला त्यांनी कधीही हरकत घेतली नाही.रामदास आठवले कांग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असताना जेव्हा संसदेत या पुस्तकावर ५ वर्षांपुर्वी चर्चा झाली तेव्हा त्यांनी पुस्तकाला विरोध केला नाही.केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी सरकारतर्फे तेव्हा हे पुस्तक मागे घेणार नाही असे सांगितले.आज मात्र त्याच पक्षाचे मंत्री कपिल सिब्बल यांनी ते लगेच मागे घेतले.द्रमुकचे लोकही तेव्हा गप्प होते.आज तेही विरोधात पुढे आहेत. राजकीय परिस्थिती बदलली की पुस्तकाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण बदलतो काय?
होय.संसदेत आज सरकार आरोपांच्या जाळ्यात अडकलेले आहे. मायावती,आठवले,द्रमुक हे सारेच अडचणीत आहेत. मायावती,आठवले आदींना लोकांचे लक्ष स्वता:कडे वेधून घेण्यासाठी आणि सरकार व द्रमुकला लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मुद्दा हवाच होता.तो त्यांना मिळाला.सचिन खरात यांच्या संघटनेने डा.पळशीकर यांचे पुणे विद्यापिठातील डा.बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारील डा.आंबेडकर भवनातील कार्यालय तोडले.बाबासाहेबांना अपार प्रिय असलेल्या पुस्तकांची नासधुस केली.पळशीकरांना निळी शाई फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता.विद्यापिठातील काही बौध्द प्राध्यापकांनी स्वताचे कडे करून पळशीकरांचे संरक्षण केले.खरातांचे कार्यकर्ते चेनलवाल्यांना सोबत घेवुनच गेले होते.बाबासाहेबांची मानहानी झाली असे कोणाचे मत असेल तर त्यांनी वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता.बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने जायला हवे होते.आंबेडकरी चळवळ आता प्रगल्भ झालेली आहे.आम्ही बाळ गांगल आणि अरुण शौरींनाही वैचारिक प्रत्युत्तर दिलेले होते.यापुढेही कोणाचाही प्रतिवाद करण्याची आमची क्षमता आहे.हिंसक हल्ले ही बुद्ध-फुले-आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याची रित आहे काय? ह्या हल्ल्याचा मी तिव्र निषेध करतो.ह्या हल्ल्याने बाबासाहेबांचाच अवमान झालेला आहे. आम्ही वैचारिक लढाया करायला सक्षम नाही अशी कबुली यातुन दिली गेली आहे,जी मला मान्य नाही.हा मला आंबेडकरी चळवळींचाच अपमान वाटतो.
हल्ल्याचा निषेध करायला सगळे आंबेडकरी विचारवंत पुढे यायला हवे होते.पण तसे घडले नाही.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे निषेध केला हे चांगले झाले.त्यांनी पळशीकर-यादवांचा राजीनामा स्विकारला जावू नये अशीही मागणी केली.बाकी बरेच जण मुग गिळून गप्प बसले किंवा अवमानावर बोलताना पळशीकर-यादवांना प्रतिगाम्यांचे हस्तक ठरवून मोकळे झाले.हे दोन वेगळे मुद्दे आहेत. मी त्यांची गल्लत करणार नाही.व्यंगचित्रावर बोलण्याचा माझा हक्क सुरक्षित ठेवुन मी काही प्रश्न उपस्थित करु ईच्छितो.
पळशीकर-यादव हे आंबेडकरी चळवळीचे जवळचे मित्र आहेत.पुरस्कर्ते आहेत. त्यांच्यावर प्रतिगाम्यांचे हस्तक असा शिक्क्का मारणे अन्यायकारक आहे.त्यांच्याशी मतभेद होवू शकतात, नव्हे माझेही त्यांच्याशी अनेक मतभेद आहेत.राहतील. पण मी त्यांच्या हेतुंवर शंका घेणार नाही.उलट त्यांच्यासारखे प्रागतिक लोक अभ्यासक्रम ठरविण्यात होते म्हणुन पहिल्यांदाच संविधान निर्मितीचे योग्य श्रेय बाबासाहेबांना दिले गेले.त्यांना तेथुन हटविण्यासाठी उजव्या शक्ती देव पाण्यात घालून बसल्या होत्या.त्या जिंकल्या.एका व्यंगचित्राचा भावनिक "इश्यु" करुन आंबेडकरवाद्यांच्याच काठीने त्यांनी आंबेडकरवादी पुस्तक रद्द करविले.क्या बात है.याला म्हणतात,शांत डोक्याने सापळा लावा,चळवळीतील लोकांचा वापर करून घ्या आणि आंबेडकरवादाला खतपाणी घालणारा अभ्यासक्रम रद्द करवून घ्या.ते पुस्तक न वाचताच रद्द करा अशी मागणी पुढे आली, गदारोळ करण्यात आला,पुस्तक रद्द झालेही.
अभ्यासक्रम तयार करण्याची यंत्रणा आजवर कायम,हिंदुत्ववादी,मार्क्सवादी किंवा गांधीवादी यांच्या हातात राहिलेली आहे.फुले-आंबेडकरवादी तिकडे फिरकुही शकणार नाहीत याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.म्हणुनच पळशीकर-यादव या चळवळीच्या मित्रांचे तिथे असणे गरजेचे होते.एन.सी.ई.आर.टी.चे माजी प्रमुख आणि प्रतिगामी विचारांचे हस्तक  जे.एस.रजपुत यांनी ’यादव-पळशीकर हटाव’ मोहीम हातात घेतली होती.ती मायावती,आठवले आणि महायुतीतील महानुभावांच्या मदतीने फत्ते झाली.
हे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात आज वापरण्याची खरेच गरज होती काय?हे व्यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करते काय?हे व्यंगचित्र पळशीकर-यादवांनी बाबासाहेबांच्यावरिल आकसापोटी मुद्दाम काढुन घेवुन पुस्तकात छापले आहे काय? पुस्तकात हे एकच व्यंगचित्र आहे की सगळे पुस्तकच इतर अनेक मान्यवरांवरील व्यंगचित्रांनी भरलेले आहे?पाठ्यपुस्तकात व्यंगचित्रे वापरुन तो रंजक करावा काय?त्यामुळे मुलांची अभ्यासाची भिती घालवून त्यांच्या मनातील अभ्यासाबद्दलची अढी/दहशत नष्ट करणे योग्य आहे काय? चळवळीला व्यंगचित्रांचे वावडे असावे काय? आम्ही व्यंगचित्र हे व्यंगचित्र म्हणुन पाहुच शकत नाही काय? बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिण्यात पहिला मसुदा सादर केलेला असताना विलंबाला त्यांना जबाबदार ठरविणे योग्य ठरते काय?घटना समितीत ज्यांचे ८० टक्के बहुमत होते ते सत्ताधारी पक्षाचे लोक २ वर्षे चर्चेचे गु-हाळ लावून बसले हा दोष बाबासाहेबांचा कसा?{बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले २९ आगस्ट १९४७ रोजी, आणि त्यांनी तयार केलेला घटनेचा पहिला मसुदा गेझेट आफ इंडियात प्रकाशित झाला २० फ़ेब्रुवारी १९४८ रोजी. त्यावर पुढे सुमारे २ वर्षे चर्चा होवुन घटना २६ जानेवारी १९५० ला अमलात आली.} असे अनेक प्रश्न आहेत.त्याच्या उत्तरांच्या शोधातुनच सत्त्याकडे जाता येईल.पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणुन त्यांच्यावर हेत्वारोप/हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयिस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचेच नुकसान करणारे ठरेल.यापुढे मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकुन पितील.
आजवर इतरांची कठोर चिकित्सा करणारे आणि दुस-यांवर टिकेचे जोरदार आसुड ओढणारेच जर आज हळवे बनुन आम्ही टिका खपवुन घेणार नाही असे म्हणणार असतील तर मग या महाराष्ट्रात यापुढे छत्रपती शिवरायांप्रमाणेच बाबासाहेबांचाही देव केला जाईल ही काळ्या दगडावरची रेघ होय.म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच पण काळही सोकावतोय.विचारी माणसेही भावनिक सापळ्यात कशी अडकतात त्याचा हा पुरावाच नव्हे काय?अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जनक बाबासाहेब हेच मुस्कटदाबीसाठी वापरले जात असताना आम्ही काय करणार आहोत?